आजीची भाजी रानभाजी – भोकराच्या फळांची भाजी आणि लोणचे

‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा, रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयाने चालू केलेल्या या मालिकेत आजची भाजी आहे भोकर…

(भाग १६)

याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/945359.html

भोकराचे फळ

आज पन्नाशीत असणार्‍या पिढीने बहुतेकांनी बालपणी पतंग बनवण्यासाठी, वह्या-पुस्तकांची फाटलेली पाने चिकटवण्यासाठी, बांधावर उभ्या असणार्‍या पिकलेल्या गोडसर, चिकट भोकरांचा वापर केलेला आहे. काही ठिकाणी या भोकरांना बारगुंड, गुंदन अशीही स्थानिक नावे आहेत. भोकराचे फळ स्नेह नवसंग्राहक आहेत. कृमीनाशक, कफोत्सारक आणि खोकल्यापासून आराम देणारे आहे. मूत्रवर्धक, कोरडा खोकला, छाती आणि मूत्र नलिकेचे रोग, पित्तप्रकोप; दीर्घकालीन ताप, तहान न्यून करणे, जखम आणि व्रण भरण्यासाठी भोकरीचे फळ उपयुक्त आहे. साल, संग्राहक पौष्टिक आहे, तसेच स्तंभक असल्याने फुप्फुसाच्या सर्व रोगांत उपयुक्त आहे. सालाचे चूर्ण बाह्य उपाय म्हणून खाजेवर आणि त्वचारोगावर वापरतात.

श्री. प्रशांत आनंदराव सातपुते

१. भाजी करण्याची पद्धत 

भोकराची कोवळी पाने निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. पानांचे देठ काढून टाकावेत. पाने बारीक चिरून घ्यावीत. तेलात चिरलेला कांदा आणि मिरच्या परतून तांबूस होईपर्यंत तळून-भाजून घ्याव्यात. नंतर चिरलेली भाजी आणि भिजवलेली मूगडाळ घालावी. हळद, मीठ घालून सर्व भाजी चांगली परतून घेऊन थोडे पाणी घालून ती शिजवून घ्यावी.

२. फळांची भाजी करण्याची पद्धत 

भोकराची कोवळी फळे धुऊन चिरावीत. बिया काढून टाकाव्यात आणि परत फळे चिरून घ्यावीत. तीळ, खसखस, थोडे भाजावे. ओले खोबरे किसून घ्यावे. नंतर तीळ, खसखस, खोबरे, लसूण, आले ‘मिक्सर’मध्ये बारीक करून ओला मसाला सिद्ध करावा. तेलात चिरलेला कांदा भाजून घ्यावा. त्यात चिरलेली फळे घालावीत. हळद, तिखट, मीठ घालून भाजी परतून घ्यावी. ओला मसाला घालून ती परतावी आणि नंतर भाजी शिजवून घ्यावी.

३. भोकराचे लोणचे 

भोकराची कोवळी फळे धुवून चिरावीत. त्यातील बिया काढून टाकाव्यात. गरजेप्रमाणे फळांच्या फोडी कराव्यात. काही पद्धतीमध्ये फळे न चिरता लोणच्यासाठी अखंड वापरली जातात. फोडींना मीठ लावून चोळावे. तेल गरम करून त्यात मोहरीडाळ, मिरची पावडर, मिरे पुड, हिंग पावडर, मेथी पावडर, हळद टाकून फोडणी करावी. फोडणी थंड झाल्यानंतर मीठ लावलेल्या फोडींवर ती ओतावी. सर्व मिश्रण चांगले मिसळून घ्यावे. आवश्यकता असल्यास लोणच्याचा मसाला घालावा. हे सर्व बरणीत भरावे. झाकण बंद करून काही दिवस ठेवल्यानंतर लोणच्याचा वापर करावा.

काय वाचक मंडळींनो, आठवली का भोकर..तांबूस, पिकलेली गोडसर, चिकट असणारी.. मग पुन्हा याचा आस्वाद घ्या आणि बालपणात रममाण व्हा…

– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/945900.html