सामूहिक व्यायाम केल्यामुळे मैत्री, तसेच कौटुंबिक आणि सामाजिक नाती सुधारतात !

‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्‍या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. या लेखमालेतून आम्ही वैयक्तिक व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन करून व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा प्रयत्न केला. ‘आपल्या दैनंदिन कृतीमुळे उदा. जेवणे, अभ्यास करणे, वस्तू वापरणे इत्यादींमधून आपली इतरांशी जवळीक वाढते, संबंध सुधारतात, तसेच संघभावना वाढते’, हे लक्षात घेऊन या लेखात आपण ‘सामूहिक व्यायाम केल्यामुळे मैत्री, तसेच कौटुंबिक आणि सामाजिक नाती सुधारतात !’, यांविषयी जाणून घेऊया.   

(लेखांक ७७)

१. सामूहिक व्यायाम केल्यानेविश्वास आणि आपुलकी वाढवणारे ‘ऑक्सिटॉसिन’ संप्रेरक वाढते ! 

व्यायाम चालू केल्यावर पहिल्या १० मिनिटांतच शरिरात ‘ऑक्सिटॉसिन’ हा संप्रेरक (हार्माेन) स्रवतो. ‘ऑक्सिटॉसिन’ हे ‘बॉन्डिंग हॉर्मोन’ अर्थात् जोडणारे संप्रेरक म्हणून ओळखले जाते. यामुळे व्यक्तीमध्ये विश्वास, सहानुभूती आणि सहकार्य यांसारख्या सामाजिक भावना वाढतात. ‘न्यूरोसायकोथेरपी’ या ‘जर्नल’मध्ये (मासिकात) दिलेल्या एका संशोधनानुसार एकटे व्यायाम करण्याच्या तुलनेत सामूहिक व्यायाम करतांना शरिरात ‘ऑक्सिटॉसिन’चे प्रमाण अधिक वाढते.

२. सामूहिक हालचालींतील संयोगामुळे ‘समूहभावना, संघटन आणि सामाजिक साहाय्य करणे’, या गुणांची वाढ होते ! 

‘जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकोलॉजी’मध्ये दिलेल्या एका अभ्यासानुसार जेव्हा लोक एकत्र चालतात, ‘जॉगिंग’ करतात किंवा योगासने करतात, तेव्हा सामूहिक हालचाल मेंदूला ‘एकजूट’ अनुभवण्यास भाग पाडते. यामुळे ‘लोक एकमेकांशी जोडले आहेत’, अशी भावना निर्माण होते. त्यामुळे ‘समूहभावना, संघटन आणि सामाजिक साहाय्य करणे’, या गुणांची वाढ होते.

श्री. निमिष म्हात्रे

३. ‘कोर्टिसॉल’ संप्रेरकाचे प्रमाण संतुलित राहिल्यामुळे व्यक्ती अधिक संयमी, सहनशील आणि शांत होते ! 

‘कोर्टिसॉल’ संप्रेरक आपल्याला तणावाशी सामना करण्यासाठी सिद्ध करते. त्याची पातळी अधिक किंवा अल्प असणे हानीकारक असते. ‘सायकोन्यूरोएन्डोक्रिनॉलॉजी’ या ‘जर्नल’नुसार सामूहिक व्यायाम केल्यावर ‘कोर्टिसॉल’ची पातळी संतुलित रहाते. त्यामुळे व्यक्ती अधिक संयमी, सहनशील आिण शांत रहाते. यामुळे सामाजिक गोंधळ, भांडणे किंवा कटुता यांमध्ये घट होते.

४. ‘एंडॉर्फिन’ आणि ‘डोपामिन’ वाढल्यामुळे होणारे लाभ

व्यायाम केल्यामुळे मेंदूमध्ये ‘डोपामिन’ (प्रेरणा आणि आनंदासाठी उपयुक्त) आणि ‘एंडॉर्फिन्स’ (वेदना न्यून होण्यासाठी आणि उत्साह वाढवण्यासाठी उपयुक्त) ही रसायने वाढतात. ही रसायने व्यक्तीला शांत, समाधानी आणि सकारात्मक संवाद करण्यास सिद्ध करतात. त्यामुळे पुढील लाभ होतात.

अ. नातेसंबंध अधिक सुदृढ होतात.

आ. वाद आणि अपसमज टळतात.

इ. सामूहिक कार्यात सहभाग वाढतो.

ई. सामाजिक स्वीकृती आणि लोकप्रियता वाढते.

उ. मानसिक आरोग्य लाभून सामाजिक स्थैर्य येते.

५. कुटुंबातील सर्व व्यक्तींनी एकत्रित व्यायाम केल्यामुळे घरात समजूतदारपणा, प्रेम आणि सहकार्य वाढते ! 

जेव्हा घरातील सर्व जण एकत्रित चालायला जातात, खेळ खेळतात किंवा व्यायाम करतात, तेव्हा त्यांचा एकमेकांशी संवाद वाढतो आणि ते एकमेकांना समजून घेतात. एका अभ्यासानुसार ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुले आणि पालक यांनी एकत्र व्यायाम केल्यामुळे त्यांच्या घरात समजूतदारपणा, प्रेम अन् सहकार्य वाढल्याचे आढळले. जेव्हा मुले पालकांच्या समवेत व्यायाम करतात, तेव्हा त्यांचे भ्रमणभाष पहाण्याचे प्रमाण न्यून होते आणि ते घरातही समाधानाने रहातात.

६. मित्रांसह व्यायाम केल्यामुळे मैत्री अधिक घट्ट होते ! 

मित्रांनी एकत्रित व्यायाम केला किंवा ते चालायला गेले, तर त्यांच्यामध्ये संवाद वाढतो. एका संशोधनानुसार एकत्रित व्यायाम करणार्‍या तरुणांना मित्र आणि कुटुंब यांच्याकडून अधिक पाठिंबा मिळतो. आणखी एका अभ्यासासानुसार ‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यायामामुळे आत्मविश्वास वाढतो, मैत्रीची नाती घट्ट होतात आणि त्यांना समाजाशी जुळवून घेणे सोपे जाते’, असे सिद्ध झाले आहे.

७. सामूहिक व्यायाम केल्यामुळे व्यक्ती अधिक समाजाभिमुख होऊन त्याची सामाजिक प्रतिमा सुधारते ! 

स्थानिक ठिकाणी ‘चालणार्‍यांचे गट, योगासने वर्ग, हास्य गट’ सिद्ध होतात. यांमधून लोक एकमेकांशी जोडले जातात. एका अभ्यासानुसार ६० वर्षांवरील महिलांनी एकत्रित व्यायाम केल्यामुळे त्यांच्यातील एकटेपणा न्यून होऊन आपलेपणा वाढला. एकत्रित व्यायाम केल्यामुळे मानसिक आरोग्यही सुधारते आणि व्यायाम करणेही आनंददायक वाटते. अशा पद्धतीने व्यायामामुळे व्यक्ती अधिक समाजाभिमुख होऊन तिची सामाजिक प्रतिमा सुधारते. ’

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (२५.६.२०२५)