प्रत्येकाने राष्ट्र टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! – अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी आणि शिक्षणतज्ञ

लेखक अभिजित जोग यांच्या ‘भारत : सत्य, सत्व, स्वत्व’ या पुस्तकाचे ठाणे येथे प्रकाशन !

ठाणे, १० ऑगस्ट (वार्ता.) – इस्लामिक आक्रमण हे सरळसरळ तलवारीने मोडून टाकणारे होते; परंतु ब्रिटीश आक्रमण जास्त सर्वंकष आणि खुनशी होते. ब्रिटिशांनी आपल्यालाच आपल्या संस्कृतीची मोडतोड करण्यासाठी आपापसात फोडले आणि लढवले. ते लढण्यासाठी पैसा अन् सेना आपल्याकडूनच उभ्या केल्या. देशाला लुटण्याचा तो विषारी वारसा अजूनही चालूच आहे. असाच खुनशी डाव त्यांनी जगातही वापरला. आपला देश ब्रिटिशांच्या कह्यात कसा गेला, याचा सर्व भारतियांनी अभ्यास करायला हवा आणि त्याच्या संतापाची लाज बाळगत आपले राष्ट्र टिकवायला प्रयत्न करायला हवे, असे उद्गार माजी सनदी अधिकारी आणि शिक्षणतज्ञ अविनाश धर्माधिकारी यांनी येथील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात काढले. येथील श्रीराम व्यायामशाळेच्या सभागृहात ८ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ६ वाजता येथे लेखक अभिजित जोग यांच्या ‘भारत : सत्य, सत्व, स्वत्व’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. ‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासा’च्या वतीने या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी माजी सनदी अधिकारी, शिक्षणतज्ञ अविनाश धर्माधिकारी, लेखक आणि अभिनेते दीपक करंजीकर, श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे सचिव डॉ. अश्विन बापट, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, अध्यक्ष उत्तम जोशी आणि अन्य मान्यवर, नागरिक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सूत्रसंचालन मिलिंद भागवत यांनी केले.

सांस्कृतिक धारणेपासून अनभिज्ञ राहिल्यामुळे विविध आक्रमणे होत आहेत ! – दीपक करंजीकर, लेखक आणि अभिनेते

आत्मबोध आणि शत्रूबोध लक्षात घ्यायला हवे. शत्रूबोधाने आपल्याला चहू बाजूंनी वेढलेले आहे. यावर दिवसातून १ घंटा तरी काम करायला हवे, ते शारीरिक व्यायामाइतकेच आवश्यक आहे. सांस्कृतिक धारणा किंवा वारसा यांसह असंख्य गोष्टींपासून अनभिज्ञ राहिल्यामुळे विविध प्रकारची आक्रमणे आपल्यावर आजसुद्धा चालू आहेत. यावर आपण काहीही न केल्यास आपले पुढे काही होऊ शकेल, असे मला वाटत नाही.

भारताची खरी ओळख पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला ! – अभिजित जोग, पुस्तकाचे लेखक

ऋषिमुनींचा देश म्हणजे ब्राह्मणांचा देश’ असे हिणवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र असे अजिबात नाही. आपल्याला जे सांगितले गेले की, शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, हे १०० टक्के चुकीचे आहे. शूद्र लोकांनी अतिशय उत्कृष्ट ग्रंथ लिहिले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या वैचारिक क्षेत्रावर असलेल्या काही लोकांच्या प्रभुत्वामुळे भारताला आत्मवंचनेचा सामना करावा लागला; पण भारत हे पराभूत राष्ट्र नसून हा तत्त्वज्ञ ऋषींचा देश आहे. या देशाला समृद्ध वारसा असून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवा. भारताची खरी ओळख मी पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.