आजीची भाजी रानभाजी – औषधी गुणधर्म असलेली कवळी भाजी !

रानभाज्या आरोग्याचा खजिना असून त्यांची ओळख करून देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत चालू केलेल्या या मालिकेत आजची भाजी आहे कवळी !                           

(भाग १२)

याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/943214.html

औषधी गुणधर्म असलेली कवळी भाजी

१. कवळी भाजी

ही पावसाळ्यात उगवणारी एक महत्त्वपूर्ण रानभाजी आहे. महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागांत, ही भाजी तिच्या औषधी गुणधर्मांमुळे ओळखली जाते. कवळी भाजी साधारणपणे पावसाळा चालू झाल्यानंतर ८ दिवस ते २ आठवड्यांच्या आत डोंगराळ भागांत किंवा शेतात आपोआप उगवते. ही भाजी शिजवून खाण्यासाठी योग्य असते. अनेक घरांमध्ये कुलदेवतेच्या पूजेनंतर ही भाजी देवाला नैवेद्य म्हणूनही अर्पण केली जाते. कवळीची पाने लांबट आणि पन्हट स्वरूपाची असतात. या भाजीला बाजारातही चांगली मागणी असते; कारण ती सहज उपलब्ध नसते आणि तिच्यातील औषधी गुणधर्मांमुळे लोक ती आवर्जून खरेदी करतात.

श्री. प्रशांत आनंदराव सातपुते

ही केवळ एक रानभाजी नसून, ती अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. तिच्या विविध भागांचा उपयोग पारंपरिक औषधोपचारात केला जातो. कवळीच्या मुळांना अनमोल औषधी गुणधर्म असल्याने बाजारात त्यांना मोठी मागणी असते. या भाजीच्या मुळाला ‘सफेद मुसळी’ असेही संबोधले जाते. ही मुसळी अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरली आहे. कवळीच्या मुळामध्ये ‘सॅपोनिन्स’ हा उत्तेजक घटक असतो, ज्याचा उपयोग शक्तीवर्धक म्हणून केला जातो.

कवळीच्या मुळांचा उपयोग कावीळ, दमा, लघवीची जळजळ, अतिसार आणि पोटदुखी यांसारख्या आजारांवर केला जातो. हे गुणधर्म तिला एक प्रभावी औषधी वनस्पती बनवतात. ही भाजी लहान मुलांना दूध पचनासाठी आणि दूधवाढीसाठी उपयुक्त आहे, असे मानले जाते. त्यामुळे ज्या मातांना दूध कमी येत असेल, त्यांच्यासाठी ही भाजी लाभदायी ठरू शकते. शुक्रजंतुपोषक आणि मधुमेही लोकांसाठी गुणकारी मानली जाते. तिच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास साहाय्य होऊ शकते.

कवळी भाजी ही केवळ एक चवदार रानभाजी नसून ती अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. निसर्गाच्या देणगीचा योग्य वापर करून आपण अनेक आरोग्य समस्यांवर मात करू शकतो. तिच्या औषधी गुणधर्मांमुळे कवळी भाजीला आपल्या आहारात आणि पारंपरिक औषधोपचारात एक महत्त्वाचे स्थान आहे.

– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.

याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/944052.html