आजीची भाजी रानभाजी – शीतल काटेमाठ

रानभाज्या या खर्‍या तर आरोग्याचा खजिना असतात. अशा रानभाज्यांची ओळख करून देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत चालू केलेल्या या मालिकेत आजची भाजी आहे शीतल काटेमाठ ! 

(भाग ११)

याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/942969.html

१. शीतल काटेमाठ

काटेमाठ ही एक औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती तिच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. ही वनस्पती स्वभावतः थंड असून मूत्रविसर्जनात साहाय्य करते. पचनक्रिया सुधारण्यास साहाय्य करते आणि भूक वाढवणारी आहे. ताप न्यून करण्यास आणि पित्तप्रकोप अन् रक्तविकार यांवर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त आहे. दम्यासारख्या श्वसनविकारांवरही ही वनस्पती लाभदायक आहे.

मूळव्याध आणि मासिक पाळी यांच्या विकारांवर काटेमाठ गुणकारी आहे. गर्भाशयाचे कार्य सुधारते आणि गर्भधारणेची शक्यता वाढवते. ‘इसब’ या त्वचारोगावर काटेमाठाची पाने वाटून लेप केला जातो, ज्यामुळे दाह न्यून होतो. काटेमाठाची पाने आणि मुळे उकळून लहान मुलांना रेचक म्हणून देतात. मुळे जंतुनाशक म्हणून वापरली जातात, तसेच दूध वाढवण्यासाठी काटेमाठाचे खोड आणि पाने तुरीच्या डाळीसमवेत उकडून देतात. काटेमाठ ही एक बहुउपयोगी औषधी वनस्पती असून ती विविध आरोग्य समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणून वापरली जाते.

श्री. प्रशांत आनंदराव सातपुते

१ अ. भाजी करण्याची पद्धत १ : भाजी प्रामुख्याने सुकी आणि पातळ भाजी अशा २ प्रकारांत बनवतात. सुकी भाजी बनवण्यासाठी कोवळी पाने आणि कोवळ्या फांद्या वापरल्या जातात. प्रथम पाने निवडून स्वच्छ धुवून घ्यावीत. कांदा आणि मिरच्या चिरून घ्याव्यात. तेलात चिरलेले कांदे गुलाबी होईपर्यंत परतावेत. नंतर मिरच्यांचे तुकडे आणि लसूण पाकळ्या फोडणीत टाकाव्यात. त्यानंतर त्यात भाजी घालावी. आवश्यकतेनुसार पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून भाजी शिजू द्यावी. भाजी परतून अर्धवट शिजल्यावर चवीनुसार मीठ घालावे. भाजी शिजल्यावर ओले खोबरे आणि कोथिंबीर घालावी.

१ आ. भाजी करण्याची पद्धत २ : पातळ भाजी करतांना भाजीची कोवळी पाने, पाने आणि देठ निवडून घ्यावेत. तुरीची डाळ प्रथम शिजवून घ्यावी आणि त्यात मीठ, हळद घालून चांगली घोटावी. तेलात मोहरी, मिरच्यांचे तुकडे, लसूण पाकळ्या टाकून फोडणी द्यावी. नंतर त्यात भाजी घालून परतून घ्यावी. दोन-तीन वाफा आल्यानंतर शिजवलेली तुरीची डाळ ओतावी. आवडीनुसार वा चवीनुसार गुळ, आमसूल घालूनही भाजीला चांगली उकळी येऊ द्यावी. चविष्ट भाजीचा आस्वाद घ्या.

– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.

याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/943651.html