आजीची भाजी रानभाजी – तंतुमय ‘बांबू’

पावसाळ्यात विविध गुणधर्म असणार्‍या अनेक वनस्पती उगवतात, त्यातील अनेक वनस्पती या खाण्यायोग्य असतात. विशेषत: आदिवासींनी या शोधून काढल्या आहेत. अनेक पिढ्यांपासून त्या जपल्याही आहेत. या रानभाज्यांना ओळख मिळवून त्यांची लागवड, उत्पादन, विक्री अशी साखळी निर्माण करून शेतकर्‍यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास साहाय्य मिळणार आहे. आज ‘बांबू’ या रानभाजीची माहिती येथे देत आहे.                             

(भाग ९)

याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/941815.html

बांबू

१. तंतुमय ‘बांबू’ 

आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या ‘थ्री सिस्टर्स’ राज्यांमध्ये पर्यटकांना प्रामुख्याने जागोजागी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पांढरे कोंब भरून ठेवल्याचे आढळते. हे बांबूचे लोणचे असते. या राज्यांमध्ये खास करून आदिवासींच्या जीवनाजवळ नेणारी खास ‘खरोली’ थाळी इथे मिळते. या थाळीमध्ये सर्व रानभाज्यांचे पदार्थ असतात. बांबूच्या कोवळ्या कोंबापासून भाजी, लोणचे असे पदार्थ पर्यटनाच्या निमित्ताने चाखायला हरकत नाही.

श्री. प्रशांत आनंदराव सातपुते

 

बांबू ही खूपच तंतुमय, तसेच ही क्षारयुक्त वनस्पती असल्यामुळे शरिराला तंतू आणि क्षार दोन्ही मिळतात. बाळंतपणात गर्भाशयाची पूर्ण शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतिणीला देतात. या भाजीमुळे भूक आणि पचनशक्ती दोन्ही वाढते. बांबू पिकला की, खोडाच्या पेरात एक स्राव जमा व्हायला लागतो. त्यास ‘वंशलोचन’ म्हणतात. हे दम्यावरील उत्तम औषध आहे. बांबूच्या मुळांचा रस स्थूलता आणि मधुमेह विकारांवर रामबाण उपाय आहे.

१ अ. भाजी करण्याची पद्धत

कोंब आल्यावर त्याची साले काढून तो बारीक चिरून रात्रभर पाण्यात घालून ठेवायचा. दुसर्‍या दिवशी सकाळी हे पाणी काढून टाकायचे आणि नव्या पाण्यात कोंब घालून कुकरच्या ३ शिट्टया काढायच्या. त्यामधील पाणी काढून टाकायचे. कढईत तेल तापवून जिरे, मोहरी, हिंग, हळद, बारीक चिरलेला कांदा, थोडी चणाडाळ आणि चवीपुरते मीठ घालून फोडणी करावी. कांदा शिजला की, तिखटासमवेत वाफवलेले कोंब घालायचे. गुळ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेवून एक वाफ काढावी. हवे असल्यास ओले खोबरेसुद्धा यामध्ये घालता येते.

– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.

यापुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/942969.html