आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) सुधाकर चतुर्वेदी यांचे अपहरण करत केले भीषण अत्याचार !

 

श्री. सुधाकर चतुर्वेदी व श्री. विक्रम भावे

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात हिंदुत्वनिष्ठ श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना आतंकवादविरोधी पथकाने कह्यात घेतले होते. नुकतेच ३१ जुलै या दिवशी या प्रकरणाचा विशेष न्यायालयाने निकाल दिला असून त्यात श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना निर्दाेष म्हणून घोषित करण्यात आले. या बाँबस्फोट प्रकरणात श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना आतंकवादविरोधी पथकाने कशा प्रकारे अडकवले आणि त्यांचे अपहरण कसे केले, याविषयीची माहिती त्यांच्याच शब्दांत देत आहोत.

१. आतंकवादविरोधी पथकाच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकाने भ्रमणभाष करून बोलावणे

२३.१०.२००८ या दिवशी माझा भ्रमणभाष वाजला. आलेला क्रमांक नवीन होता. ९९२३३५४१८५ असा तो क्रमांक. तो घेतल्यावर पलीकडून आवाज आला, ‘मी आतंकवादविरोधी पथकाचा साहाय्यक पोलीस निरीक्षक (ए.पी.आय.) बागडे बोलत आहे. मला तुम्हाला आताच्या आता भेटायचे आहे.’  त्यांनी मला ‘देवळाली कँप भागातील गुप्ता पेट्रोलपंपाजवळ या’, असे सांगितले. मी काही केलेच नव्हते, त्यामुळे कसली भीतीच नव्हती. खोलीला कुलूप लावले आणि गुप्ता पेट्रोलपंपाजवळ जाऊन पोचलो.

२. पेट्रोलपंपावर बोलवून गाडीत कोंबले !

पेट्रोलपंपावर पोलिसांची एक जीप उभी होती. मी त्या गाडीच्या दिशेने जाऊ लागलो. तेवढ्यात ४-५ गावगुंडांनी मला पकडले आणि एकाने मला शिव्या देत माझ्या कानाखाली मारली. त्या सुन्नपणातून बाहेर येईपर्यंत त्यांनी मला पोलिसांच्या गाडीत कोंबलेही होते. पुन्हा शिव्या हासडत तोच माणूस म्हणाला, ‘XXXXX, बाँबस्फोट करता काय ? आता तुझ्या XXX बाँब लावतो, सगळी XXXX आठवेल तुला XXXX.’ त्यांनी मला जीपच्या मागील भागात खाली टाकले होते. त्यांनी माझे हात-पाय बांधले. हे होत असतांना लाथा आणि शिव्या यांचा वर्षांव होतच होता. तोंडात कधी बोळा कोंबला गेला होता, ते कळलेही नव्हते. मी बेशुद्ध होऊन गेलो.

३. अमानुष मारहाण चालूच

जाग आली, तेव्हा डोळ्यांसमोर मिट्ट काळोख होता. अंग ठणकत होते. मग लक्षात आले की, माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे आणि काल रात्री पोलिसांनी मला पकडून मारलेले आहे. कुणीतरी माझ्या डोळ्यांवरची पट्टी सोडली. ‘तू आता पोलीस ठाण्यात आहेस. कबुली (संमती) देऊन टाक, नाही तर मरशील’, असे एक पोलीस बोलला. शरिराच्या कुठल्या कुठल्या भागातून कळ येत आहे, हेही कळत नव्हते. डोक्याचा असह्य ठणका चालू असतांनाच कानावर शब्द पडले, ‘साल्याची अशी XX मारू की, कोर्टात (न्यायालयात) कबुली (संमती) जबाब द्यायला, हा तयार झाला पाहिजे.’ तेवढ्यात ४-६ गुंडांसारखीच दिसणारी माणसे आली. माझे हात-पाय बांधलेलेच होते. दोघांनी माझे पाय धरले आणि फरपटतच कुठे तरी घेऊन जाऊ लागले. डोके घसटत होते. समोर एक पोलीस अधिकारी बसला होता. त्याच्या डोळ्यांत जरब होती, तो ‘परमबीर सिंग’ होता. अर्थात् हे नाव मला नंतर कळाले.

मी काही बोलणार, इतक्यात तो अधिकारी खुर्चीतून उठला आणि माझ्या खांद्यावर त्याच्या बुटाचा पाय दाबत गुरगुरला, ‘तू आता ‘ए.टी.एस्.’च्या ताब्यात आहेस. सांग कुणी तुला साहाय्य केले बाँब बनवायला ? कालपासून आता प्रथमच मला काही बोलायची संधी मिळत होती. ‘निदान हा तरी ऐकेल’, या भोळ्या आशेने मी कळवळलो, ‘साहब, कलसे किस बमकी बात हो रही है, मुझे नही समझ रहा । साहब, मैने कोई बम नही बनाये, मुझे कुछ समझमें नही आ रहा ।’

४. घराच्या चाव्या आणि कागदपत्रे काढून घेतले !

माझे बोलणे त्या अधिकार्‍यांना आवडले नाही. अचानक त्यांचा पाय मागे आला आणि माझ्या खांद्यावर पुन्हा एक लाथ बसली. मी तसाच मागे आपटलो. तो अधिकारी ओरडला, ‘हरामजादा, सोला साल्याची चामडी !’ हात-पाय बांधलेल्या अवस्थेतील मी भूमीवर पडलो होतो आणि हे ४-५ जण मला जनावरासारखे तुडवत होते. त्या प्रश्नामधून मला कळाले की, नुकत्याच मालेगावमध्ये झालेल्या स्फोटाविषयी माझी चौकशी चालू आहे. त्या मारहाणीत एका क्षणाला माझ्या अंगावरचे सगळे कपडे त्यांनी फाडून टाकले. माझ्याकडील सर्व साहित्य, ज्यामध्ये माझ्या खिशातील पाकीट, वाहन परवाना, गाडीची आणि घराची किल्ली, पैसे सर्व काही त्यांनी ताब्यात घेतले.

५. खोट्या कागदपत्रांवर बळजोरीने स्वाक्षर्‍या करण्यास भाग पाडणे

काही काळानंतर मला मारणार्‍या अधिकार्‍यांची नावे मला नंतर त्यांच्या संभाषणातून समजली. सचिन कदम, अरुण खानविलकर, कृष्णा सावंत आणि सुनील यादव हे ते अधिकारी होते. त्यांनी कित्येक कोरे कागद माझ्यापुढे ठेवून बळजोरीने त्यावर मला स्वाक्षर्‍या करण्यास भाग पाडले.

६. ‘इंडिया बुल्स’च्या विमानाने भोपाळला नेणे आणि पुढे श्री. समीर कुळकर्णी यांना ‘ए.टी.एस्.’ने अटक करणे 

२४.१०.२००८ या दिवशी माझ्या मुसक्या बांधून या अधिकार्‍यांनी मला एका वाहनात कोंबले आणि ते मला मुंबईमधील विमानतळावर घेऊन गेले. सचिन कदम, राजन गोळे, विवेक वाकुंड, सुनील यादव, कृष्णा सावंत आणि संजय पाटील हे पोलीस अधिकारी माझ्यासह होते. त्या वेळी संग्रामसिंग या खोट्या नावाची कागदपत्रे सिद्ध करून ते त्या नावाने मला कुठेतरी घेऊन चालले आहेत, हे माझ्या लक्षात आले. विमानाच्या दर्शनी आणि आतल्या भागावर ‘इंडिया बुल्स’ असे लिहिले होते. मी स्वतः, ‘ए.टी.एस्.’चे अधिकारी, विमानचालक  आणि त्याचे २ सहकारी यांखेरीज विमानात कुणीही नव्हते. ‘राजा भोज विमानतळ, भोपाळ’ असा नामफलक मी पाहिला.

२५.१०.२००८ या दिवशी त्यांनी मला भोपाळच्या कोलार मार्गावर नेले. त्यांनी तेथील स्थानिक सार्वजनिक दूरध्वनीवरून मला श्री. समीर कुळकर्णी यांच्याशी बोलण्यास भाग पाडले. हबीबगंज रेल्वेस्थानकावर थांबलेल्या श्री. समीर कुळकर्णी यांच्यावर झडप घालून ‘ए.टी.एस्.’च्या अधिकार्‍यांनी त्यांना पकडले आणि मारत मारत मुसक्या बांधून गाडीत कोंबले. ‘इंडिया बुल्स’च्याच विमानाने आम्ही परत आलो.
मला २३.१०.२००८ ला कह्यात घेतले आणि मला ४.११.२००८ या दिवशी माटुंगा पोलीस ठाण्यात कोठडीत डांबले.
– श्री. विक्रम भावे, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.
(साभार : ‘मालेगाव बाँबस्फोटामागील अदृश्य हात’ या पुस्तकातून)

हिंदुत्वनिष्ठांना भरपाई कोण देणार ?

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचा निकाल १७ वर्षांनंतर लागला. या प्रकरणातून सर्व हिंदुत्वनिष्ठ संशयित निर्दाेष सुटल्यानंतर प्रश्न असा निर्माण होतो की, ते बाँबस्फोट कुणी केले ? हे शोधणे पोलीस अन् अन्वेषण यंत्रणा यांचे काम आहे. गेली १७ वर्षे या हिंदुत्वनिष्ठांनी जे भोगले किंवा त्यांना भोगावे लागले वा त्यांचा छळ केला गेला, याची भरपाई व्यवस्थेतील कोण देणार ? कपाळावर ‘आतंकवादी’ असल्याचा शिक्का मिरवत न्यायाच्या प्रतीक्षेत ज्यांनी १७ वर्षे घालवली, ही भरपाई त्यांना कोण देणार ?
हा प्रश्न व्यवस्थेला प्रत्येक हिंदूने विचारला पाहिजे.
– श्री. विक्रम भावे