लोकमान्य टिळक यांच्या स्वप्नातील भारत लवकरच विश्वगुरु बनेल ! – नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

  • ४३ व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण

  • १ ऑगस्ट या दिवशी १०५ वी पुण्यतिथी साजरी

 

श्री. नितीन गडकरी

पुणे, २ ऑगस्ट (वार्ता.) – लोकमान्य टिळक हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्रोत आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणून त्यांचा उल्लेख होतो. ते एक ‘रोल मॉडेल’ (आदर्श पुरुष) आहेत. त्यांचे व्यक्तीत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व उत्तम होते. टिळकांच्या काळात जे राष्ट्रकारण होते, ते राजकारण होते. समाजकारणातून राष्ट्रकारण ही राजनीती किंवा धर्मनीती, हे खर्‍या अर्थाने लोकमान्य टिळकांचे ब्रीद होते. लोकमान्य टिळकांना स्वराज्य हवे होते, त्याचे रूपांतर सुराज्यात व्हायला हवे, असे त्यांचे स्वप्न होते, ते सुराज्य लवकरच निर्माण होईल. भारताला महाशक्ती, विश्वगुरु बनवणे हे टिळकांचे स्वप्न होते. ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करू, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

लोकमान्य टिळक यांची १ ऑगस्ट या दिवशी १०५ वी पुण्यतिथी झाली. या निमित्ताने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना देण्यात आला. टिळकांची पगडी, मानपत्र, ३ पुस्तके, टिळकांची छोटी मूर्ती, ‘गीता रहस्या’चे पुस्तक आणि ‘केसरी’ वृत्तपत्राचे मानक असे पुरस्काराचे स्वरूप होते. हे पुरस्काराचे ४३ वे वर्ष आहे. या वेळी ‘टिळक स्मारक ट्रस्ट’चे अध्यक्ष रोहित टिळक यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मुख्यमंत्री फडणवीस यांची भाषणे झाली.

नितीन गडकरी म्हणाले,

१. लोकमान्य टिळकांसारखे थोर नेते राष्ट्रभक्त, क्रांतिकारक आणि समाजसुधारक संत एवढे मोठे कार्य केले. जर आमच्या देशाकरता या सगळ्यांनी बलीदान केले नसते, तर आज काय इतिहास मिळाला असता ? स्वदेशी, स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भर भारत हे लोकमान्य टिळकांचे स्वप्न होते.

२. राजकारणामध्ये स्पष्ट बोलणे, खरे बोलणे काही चालत नाही; परंतु नेत्यांनी सकारात्मक राहून आत्मविश्वासाने सत्य बोलले पाहिजे. राजकारणात काहीतरी आपण खोटे बोलू, असे नाही.

३. लोकमान्य टिळकांसारख्या अनेक थोर लोकांनी आपले जीवन देशाला समर्पित केले, बलीदान केले. त्यांनी जीवनाचे सर्वस्व अर्पण केले. त्यांच्यामुळे आजचा दिवस आम्हाला बघायला मिळाला.

४. आपण कुणीही पूर्ण नाही. सर्वजण अपूर्ण आहोत. तरीही आपण काम करत राहिले पाहिजे.

५. आपला देशाची विश्वगुरु बनण्याची क्षमता आहे. इतिहास, संस्कृती पुष्कळ मोठी आहे. आज संपूर्ण जगाच्या कानाकोपर्‍यात आयुर्वेद पसरलेला आहे. आपण सगळ्यांनी सकारात्मक राहून या स्वप्नांच्या पूर्तीचा प्रयत्न केला पाहिजे. सकारात्मकता, आत्मविश्वास ठेवा; परंतु अहंकार ठेवता कामा नये.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,

१. नितीन गडकरी यांचे व्यक्तीमत्त्व हे वैश्विक आहे. जगाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात जाऊन तिथल्या लोकांच्या नवनवीन कल्पना घेऊन त्या प्रत्यक्षात उतरण्याची क्षमता त्यांच्यात आहे.

२. त्यांच्यावर ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ आणि आईने केलेले संस्कार त्यांनी जोपासले आहेत. तेच संस्कार त्यांना सातत्याने उत्तम समाजकार्याची प्रेरणा देतात.

३. कोणतीही कृती, प्रकल्प हा गुणवत्तापूर्ण झाला पाहिजे, असा नितीनजी यांचा आग्रह असतो. एखाद्या अधिकार्‍याने भ्रष्टाचार केला, तर त्याला त्याच्याच भाषेत बोलतात. हे सर्व तेच करू शकतात.

संपादकीय भूमिका

लोकमान्य टिळक यांना अपेक्षित असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येक भारतियाने कृतीशील व्हावे !