Bangladesh ‘Jizya’ Tax :  बांगलादेशात हिंदूसह अन्य धर्मियांवर ‘जिझिया’ कर लावण्याची मागणी

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात रहाणार्‍या मुसलमानेतरांना  ‘जिझिया कर’  (जिझिया कर म्हणजे मुसलमानेतरांच्या रक्षणासाठी त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेला कर.) द्यावा लागेल. मुसलमान ‘जकात’ (मुसलमानांनी त्यांच्या संपत्तीचा काही भाग धर्मादाय करण्यासाठी दान करणे) देतात, त्यामुळे समान हक्क हवे असतील, तर हिंदूंनी जिझिया भरावा. हेच शरीयत कायद्यानुसार योग्य आहे, असे वक्तव्य जमात-ए-इस्लामी या राजकीय पक्षाच्या एका नेत्याने एका सार्वजनिक सभेत पुन्हा एकदा केली. यापूर्वीही त्यांनी अनेक वेळा असे वक्तव्य केले होते. या गंभीर विधानावर देशातील अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. याचा निषेध केलेला नाही किंवा स्पष्टीकरणही दिलेले नाही. त्यामुळे ‘यामागे काही षड्यंत्र आहे का ?’, अशी चर्चा आहे.

सूत्रांच्या मते, ही मागणी केवळ धार्मिक नियमांच्या नावावर होत नसून यामागे एक पूर्वनियोजित कट आहे. यामध्ये हिंदु, बौद्ध आणि ख्रिस्ती धर्मियांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल करणे, दुसर्‍या दर्जाचा नागरिक बनवणे आणि त्यांना धार्मिक भेदभावाच्या आधारे मुख्य प्रवाहातून वगळणे, हा मुख्य उद्देश आहे.

हिंदूंना द्यावा लागणार दुहेरी कर ?

हिंदूंना धार्मिक कर म्हणजे ‘जिझिया’ कर भरावा लागेल

जर ही मागणी सरकारी स्तरावर मान्य झाली, तर बांगलादेशातील हिंदूंना नियमित करांव्यतिरिक्त एक वेगळा धार्मिक कर म्हणजे ‘जिझिया’ कर भरावा लागेल. यामुळे समाजात ध्रुवीकरण, तणाव आणि धार्मिक संघर्ष वाढू शकतो.

संपादकीय भूमिका

इस्लामी देशात अल्पसंख्यांकांना कोणतेही अधिकार नसतात, तर त्यांचा धार्मिक छळच केला जातो. दुसरीकडे कथित धर्मनिरपेक्ष भारतात अल्पसंख्यांकांना (विशेषतः मुसलमानांना) डोक्यावर बसवले जाते आणि बहुसंख्यांना चिरडले जाते !