अपूर्ण झोप आणि व्यायाम न करणे यांमुळे शरिरावर होणारे परिणाम अन् त्यावरील उपाय !

‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्‍या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. या लेखमालेतून आम्ही व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन करून व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा प्रयत्न करणार आहोत. या लेखात आपण ‘अपूर्ण झोप आणि व्यायाम न करणे यांमुळे शरिरावर होणारे परिणाम अन् त्यावरील उपाय !’, यांविषयी जाणून घेऊया.

भाग १

लेख क्र. ७३

१. झोपेच्या त्रासामुळे शरिरातील संप्रेरकांचा (‘हॉर्मोन्स’चा) समतोल बिघडून शरिरावर गंभीर परिणाम होणे

‘सध्या अनेकांना झोपेचा त्रास आहे. काहींना झोप मुळीच लागत नाही, तर काहींची झोप खंडित होते. यामागे शारीरिक, मानसिक इत्यादी कारणे असू शकतात. याची कारणे काहीही असली, तरी त्याचा शरिरावर चांगला परिणाम होत नाही. कधीतरी एक दिवस झोप न्यून झाली किंवा व्यायाम चुकला, तर फारसे बिघडत नाही; पण असे करण्याची सवय लागली, तर शरिरातील संप्रेरकांचा (हॉर्मोन्सचा) समतोल बिघडून शरिरावर त्यांचा गंभीर परिणाम होतो.

२. आठवडाभरातील झोपेची न्यूनता सुटीच्या एका दिवसात भरून काढणे अशक्य !

आपल्याला कामाची तातडी असल्यास आपण प्रतिदिन न्यून झोप घेऊन ‘सुटीच्या दिवशी किंवा काम पूर्ण झाल्यावर झोप घेऊ’, असा विचार करतो, म्हणजे आपण झोप ‘उधार’ ठेवतो. असे करून आपल्याला ‘अनेक दिवसांची झोप आपण एका दिवसात भरून काढू’, असे वाटू शकते; पण शरीर तसे काम करत नाही. सततच्या झोपेची न्यूनता, म्हणजे शरिरासाठी एक आपत्तीच असते.

३. काही दिवसांच्या व्यायामाची न्यूनता नंतर एका दिवसाच्या व्यायामाने भरून काढता न येणे

श्री. निमिष म्हात्रे

‘आपल्याला आज वेळ मिळाला नाही, तर उद्या व्यायाम करूया, उद्या जमले नाही, तर परवा करूया, नाही तर तेरवा’, असे होत असते. एका दिवसात मागील काही दिवसांचा व्यायाम भरून काढता येत नाही. या संदर्भात एक उदाहरण पाहूया. एखादा दुकानदार प्रतिदिन दुकानावर का जातो, तर त्याला प्रत्येक दिवसाची कमाई प्रत्येक दिवशी मिळत असते. समजा तो ४ दिवस दुकानावर गेला नाही. तो केवळ ५ व्या दिवशी दुकानावर गेला, तर त्याला मागील ४ दिवसांची कमाई भरून काढता येणार नाही, तसेच व्यायामाचे आहे. एक दिवस व्यायाम न केल्यास त्याच्या लाभांपासून आपण मुकतो आणि व्यायामाची न्यूनता वाढत जाते.

४. शरीरस्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी संप्रेरकांची आवश्यकता असणे

शरीरस्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी विविध अवयवांचे सुरळीतपणे कार्य होणे, हे काही रासायनिक मध्यस्थींमुळे शक्य होते. त्यांना संप्रेरक (हॉर्मोन्स) म्हणतात. या संप्रेरकांच्या समतोलानेच सर्व अवयव योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी कार्यान्वित होऊन शरीर सुदृढ रहाते. ‘शरिराचा आंतरिक समतोल’ हा पूर्णपणे या संप्रेरकांचे प्रमाण आणि वेळा यांवर अवलंबून असतो.

५. अपूर्ण झोप आणि व्यायाम न करणे यांमुळे काही संप्रेरकांमध्ये पालट होऊन शरिरावर विपरित परिणाम होणे

संप्रेरकांच्या कार्याचे आपल्या दिनचर्येशी पुष्कळ जवळचे नाते आहे. त्यामुळे संप्रेरक स्रवण्याच्या वेळा किंवा प्रमाण चुकल्यास शरिराला बरेच दुष्परिणाम भोगावे लागतात. झोप आणि व्यायाम न झाल्यास ‘कॉर्टिसॉल’, ‘घ्रेलिन’, ‘लेप्टिन’ इत्यादी संप्रेरकांमध्ये काय पालट होतो ? त्याचा शरिरावर काय परिणाम होतो ? त्याविषयी पाहूया.

५ अ. ‘कॉर्टिसॉल’

१. झोप आणि व्यायाम न्यून असेल, तर ‘कॉर्टिसॉल’चे प्रमाण वाढणे : सामान्यत: ‘कॉर्टिसॉल’चे प्रमाण सकाळी अधिक असते आणि संध्याकाळी न्यून होते. यामुळे सकाळी जाग येते आणि रात्री झोप लागते. (२५.६.२०२५)

झोप आणि व्यायाम अल्प असेल, तर ‘कॉर्टिसॉल’चे प्रमाण रात्रीही अधिक रहाते. त्यामुळे मन शांत रहात नाही आणि झोप लागायला उशीर होतो. ‘सायकोन्यूरोएन्डोक्रिनॉलॉजी’ ‘जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार ‘शिफ्ट ड्युटी’ (रात्री किंवा दिवस अशा पालटत्या पाळीने काम करणे) करणार्‍यांमध्ये सकाळ-संध्याकाळचा संप्रेरकांचा समतोल बिघडलेला आढळतो.

२. शरिरावर होणारे परिणाम : ‘कॉर्टिसॉल’चे प्रमाण वाढल्यामुळे चिडचिड होते, पोटाच्या भागात चरबी साठते (सेंट्रल ओबेसिटी) आणि रोगप्रतिकारक शक्ती न्यून होते.

५ आ. ‘घ्रेलिन’ आणि ‘लेप्टिन’ (Ghrelin & Leptin)

१. झोप आणि व्यायाम न्यून असल्यावर ‘घ्रेलिन’ प्रमाणाबाहेर वाढणे अन् ‘लेप्टिन’ न्यून होणे : सामान्यतः ‘घ्रेलिन’ जेवणापूर्वी स्रवल्याने भूक वाढते, तर जेवणानंतर ‘लेप्टिन’ स्रवल्याने पोट भरल्याची जाणीव होते. झोप आणि व्यायाम न्यून असेल, तर ‘घ्रेलिन’ प्रमाणाबाहेर वाढते अन् अवेळी स्रवते. त्यामुळे अधिक आणि अवेळी (रात्री) भूक लागते. ‘लेप्टिन’ न्यून होते. त्यामुळे पोट भरल्याची जाणीव होत नाही. ‘पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स’ या ‘जर्नल’मधील माहितीनुसार ५ घंट्यांपेक्षा न्यून झोप घेणार्‍यांमध्ये ‘घ्रेलिन’ वाढते आणि ‘लेप्टिन’ न्यून होते.

२. ‘घ्रेलिन’ प्रमाणाबाहेर वाढणे आणि ‘लेप्टिन’ न्यून होणे’ यांचे शरिरांवर होणारे परिणाम : ‘घ्रेलिन’ प्रमाणाबाहेर वाढणे आणि ‘लेप्टिन’ न्यून होणे यांमुळे सतत खाण्याची इच्छा होणे, वजन वाढणे, रक्तातील साखर अन् चरबी (कोलेस्टेरॉल) वाढते. ‘घ्रेलिन’ महिलांमध्ये प्रजननाशी संबंधित कार्यही करतो, तरी याच्या असमतोलामुळे सध्या अनेक महिलांना अल्प वयातच ‘पॉलिसिस्टिक ओव्हेरीअन डिझीज’, ‘प्री मेन्स्ट्रयुअल सिंड्रोम’ आणि तत्सम प्रजननाशी संबंधित रोग होत आहेत.

(क्रमश : ३ ऑगस्ट या दिवशी)

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (२५.६.२०२५)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/942172.html