
१. रुग्णालयाने चाचण्या अल्प दरात करण्याचे आमीष दाखवणे आणि शस्त्रकर्मासाठी त्वरित निर्णय घेण्यास भाग पाडणे
‘एप्रिल २०२५ मध्ये माझ्या पत्नीला शारीरिक त्रास होत होता; म्हणून माझ्या मुलाने वाशी, नवी मुंबई येथील नामांकित रुग्णालयात पत्नीची पडताळणी केली. त्यात रक्त चाचणी, ‘ईसीजी’ काढणे (हृदयालेख काढणे), ‘२ डी-इको’ चाचणी (ध्वनीलहरीच्या साहाय्याने हृदयाचे कार्य पहाणे) आणि ‘स्ट्रेस टेस्ट’ (पट्ट्यावर चालून हृदयाचे कार्य पहाणे) या चाचण्या केल्या अन् हृदयरोतज्ञांचे मार्गदर्शन झाले. हे केवळ १ सहस्र ६५० रुपयांत झाले. आधुनिक वैद्यांनी ‘अँजिओग्राफी’ (हृदयातील रक्तवाहिन्यांतील अडथळे शोधण्यासाठी करावयाची चाचणी) करण्यास सांगितले. ही चाचणी करतांना ‘हृदयाच्या एका रक्तवाहिनीमध्ये ९० टक्के ब्लॉक (अडथळा) आहे आणि त्वरित ‘अँजिओप्लास्टी’ (हृदयाकडे रक्त वाहून नेणार्या रक्तवाहिन्यातील अडथळा दूर करण्यासाठी केलेले शस्त्रकर्म) करण्याची आवश्यकता आहे’, असे सांगितले. पत्नीच्या ‘अँजिओप्लास्टी’साठी २ लाख १५ सहस्र रुपये व्यय झाला. यावरून ‘रुग्णांच्या चाचण्या अल्प दरात करण्याचे आमीष दाखवून काही रुग्णांकडून भरमसाठ पैसे मिळवणे’, असा रुग्णालयाचा व्यवसाय चालू आहे’, अशी शंका येते.
२. रुग्णालयातील सुखसुविधा आणि मार्गदर्शन, तथाकथित आपत्कालीन परिस्थिती निर्माण करणे, तसेच विमा आस्थापनांनी वैद्यकीय उपचारांचे पैसे देणे इत्यादी प्रलोभनांच्या आहारी रुग्ण जात असणे
अल्प पैशांत एवढ्या चाचण्या होतात; म्हणून मीसुद्धा चाचण्या करून घेतल्या. रक्त आणि ‘२ डी-इको’ या चाचण्या साधारण आल्या. मी ‘स्ट्रेस टेस्ट’ करतांना ६ मिनिटे व्यवस्थित चाललो. मला सकाळी आणि संध्याकाळी प्रतिदिन ४० मिनिटे साधारण अडीच कि.मी. सहजतेने चालण्याचा सराव आहे. हृदयरोगतज्ञ मला म्हणाले, ‘‘वयाच्या मानाने चाचण्या चांगल्या असल्या, तरी ‘स्ट्रेस टेस्ट’मध्ये चालतांना काही कालावधीनंतर तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा न्यून पडत आहे तुम्ही अँजिओग्राफी लवकर केलेली बरी ! ती होईपर्यंत तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी चालण्याचा व्यायाम बंद करा. बाहेर एकटे कुठे जाऊ नका. रक्त पातळ करण्यासह जीवनसत्त्व (व्हिटॅमिन्सही) वाढवणारी औषधे घ्या.’’ यांवरून ‘अँजिओप्लास्टी करावी लागेल’, असे वाटले.
रुग्णालयातील वातावरण, सुखसोयी, तेथील मार्केटिंग करणारे तज्ञ, आर्थिक मार्गदर्शन करणारे तज्ञ इत्यादींमुळे रुग्ण भारावून जातो. रुग्णालयाकडून ‘स्वतःच्या जिवापेक्षा अन्य गोष्टी क्षुल्लक आहेत’, याची घाबरलेला रुग्ण आणि भावनाशील झालेले नातेवाईक यांना जाणीव करून दिली जाते. रुग्णालय त्यांना हवे तसे करत रहाते. विमा आस्थापने आणि अन्य आस्थापने वैद्यकीय उपचारांचे पैसे देतात. त्यामुळे रुग्णालय, विमा आस्थापने आणि अन्य आस्थापने यांचे फावते. अशा प्रकारे रुग्ण प्रलोभनांच्या आहारी जातो.

३. गुरुकृपेने नामजपादी उपाय केल्यामुळे मन सकारात्मक होऊन गुरुकृपेने उपचारांची योग्य दिशा मिळणे
रुग्णालयात गेल्यावर ‘मी प्रकृतीविषयी मानसिक स्तरावर विचार करत आहे’, हे लक्षात आले. मी नेहमीचे नामजपादी आध्यात्मिक उपाय करत होतो. गुरुकृपेने मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी हृदयाच्या चाचणीतील आणि आजारातील अडथळे दूर होण्यासाठी नामजपादी उपाय दिले. २ दिवस ते उपाय केल्यावर माझ्यावरील अनिष्ट शक्तीचे त्रासदायक आवरण न्यून होऊन मन सकारात्मक झाले. रुग्णालयाच्या प्रलोभनांना न भुलता गुरुकृपेने उपचारांची योग्य दिशा मिळाली.
४. आयुर्वेदीय उपचारपद्धतीवर श्रद्धा ठेवून उपचार घेतल्याने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने सक्षम रहाता येणे
मागील २५ वर्षांपासून मी नामांकित आयुर्वेद रुग्णालयात हृदयविकारावर उपचार घेत आहे. तेथे विनाशस्त्रकर्म वैदिक संस्कृतीनुसार आयुर्वेदाचे उपचार केले जातात. तेथे गेल्यावर वैद्यांनी माझे नाडी परीक्षण केले. विशेष म्हणजे ‘मी केलेल्या चाचणीचे अहवाल आणि त्यांचे परीक्षण एकच आहे’, हे लक्षात आले. मी वैद्यांना मुंबईतील रुग्णालयात केलेली रक्तचाचणी, ‘२ डी-इको’, ‘स्ट्रेस टेस्ट’, ‘अँजिओग्राफी’ हे अहवाल दाखवले. वैद्या म्हणाल्या, ‘‘७० वर्षांच्या पुढे ‘स्ट्रेस टेस्ट’ची आवश्यकता नव्हती, तसेच अन्य अहवाल सामान्य आहेत. आपण औषधे देऊ. तुम्ही चालण्याचा व्यायाम, पथ्य आणि आयुर्वेदाची औषधे चालू ठेवा. ६ मासांनंतर पुन्हा पडताळणी करू. तुमची प्रकृती पुष्कळ चांगली आहे.’’ आयुर्वेद रुग्णालयाने माझ्याकडून पडताळणीचे केवळ १०० रुपये घेतले. त्यांनी मला प्रकृतीविषयीचे सत्य सांगितल्याने मी पुन्हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम झालो.
५. वैदिक संस्कृतीनुसार औषधोपचार करणे, धर्माचरण, साधना आणि गुरुकृपा हेच निरोगी जीवनाचे रहस्य !
‘सध्याच्या तथाकथित आधुनिक रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट चालू आहे’, असे मला वाटते. पॅकेज, प्रमोशनल स्कीम, विमा, अल्प किमतीत चाचण्या, काही सरकारी योजना इत्यादींची प्रलोभने दाखवून असाहाय्य रुग्णांना फसवले जाण्याची शक्यता वाढली आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी आयुर्वेद आणि अन्य नैसर्गिक पद्धतीने उपचार घेणे योग्य आहे. ‘अधर्म एवं मूलं सर्व रोगानाम् । (अधर्म हेच रोगाचे मूळ कारण आहे)’, असे शास्त्र सांगते. यासाठी धर्माचरण आणि साधना करून आनंदी जगणे निरोगी जीवनासाठी सर्वाेत्कृष्ट उपाय आहे. धन्वन्तरि देवता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला वयाच्या ७८ वर्षीही साधना आणि सेवा करण्यासाठी सक्षम ठेवले आहे. त्यासाठी मी धन्वन्तरि देवता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’ (५.५.२०२५)
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
वैद्यकीय क्षेत्रातील चांगले आणि कटू अनुभव,तसेच आपल्या परिसरात काही अनुचित घटना घडत असल्यास त्याविषयी आम्हाला त्वरित कळवा.आपले अनुभव कळवण्यासाठी पत्ता : श्री. अभिषेक मुरुकटे, आरोग्य साहाय्य समिती, ‘सुखठणकर रिट्रिट’, फ्लॅट क्र. एजी-४, चित्तार भाट, नागेशी, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१ |
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !