बत्तीसशिराळा (जिल्हा सांगली) येथे जिवंत नागाच्या पूजेस अनुमती द्या !

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने सांगली आणि कोल्हापूर येथील प्रशासनास निवेदन

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – बत्तीसशिराळा (जिल्हा सांगली) येथे प्रतिवर्षी नागपंचमीच्या दिवशी मोठ्या श्रद्धेने आणि धार्मिक उत्साहाने नागपंचमीचा पारंपरिक सण साजरा केला जातो. या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे जिवंत नागांची पूजा, जी अनेक पिढ्यांपासून धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून साजरी केली जात होती. वर्ष २००२ नंतर मात्र ‘वन्यजीव संरक्षण कायद्या’च्या अंतर्गत जिवंत नाग पकडण्यास आणि त्यांची पूजा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बत्तीसशिराळा येथे नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाच्या पूजेवर बंदी घातल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तरी बत्तीसशिराळा येथे जिवंत नागाच्या पूजेस अनुमती द्यावी, या मागणीसाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले.

सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी मंदिर विश्वस्त श्री. राजेंद्र दाईंगडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंतराव जांभळे, व्यापारी संघटनेचे श्री. निर्मल पोरवाल, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. संजय घाटगे उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार स्वप्नील पवार यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी ‘हिंदु एकता आंदोलना’चे श्री. दिलीप भिवटे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव आणि श्री. आप्पासाहेब गुरव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. प्रकाश कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, आदित्य शास्त्री, मधुकर नाझरे, सनातन संस्थेचे श्री. दिलीप सातपुते उपस्थित होते.

🔱 बत्तीसशिराळा: नागदेवतेची 1000 वर्षांची परंपरा पुन्हा सुरू होणार का? | Ground Report | सनातन प्रभात 

प्रशासनास दिलेल्या निवेदनात पुढील सूत्रे उपस्थित करण्यात आली आहेत…

  • या ठिकाणी शेकडो वर्षांपासून गुरु गोरक्षनाथांनी चालू केलेल्या परंपरेनुसार नागपंचमी सण हा उत्साहात साजरा करण्यात येतो, तसेच बत्तीसशिराळा येथे नागपंचमीच्या दिवशी नाग इतरांना चावणे किंवा नागाचा मृत्यू होणे, अशा कुठल्याही घटना घडलेल्या नाहीत.
  • जलीकट्टू आणि बैलगाडा शर्यत यांस अन्य कायद्याची बाधा न येता ज्याप्रमाणे राज्यशासनाने अनुमती दिली, त्याच धर्तीवर बत्तीस शिराळकरांचा पारंपरिक नागपंचमीचा सण, त्यानिमित्त नागाचा शोध घेणे, नाग पकडणे, नागाची पूजा करणे, पूजा करून कोणतीही इजा न होता नागाला परत मूळ जागी सोडणे, या गोष्टींना शासनाची मान्यता मिळून तातडीने उपाययोजना काढावी.
  • हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आणि भावनिक आहे. बत्तीसशिराळा येथे आजूबाजूच्या जिल्ह्यांतील लोक येतात. बिहारमधील सिंघिया घाटप्रमाणे बत्तीसशिराळा येथे नागपंचमी साजरी होणे आवश्यक आहे.
  • गोरक्षनाथांचे अनुयायी, अनेक साधू, भक्तगण, तसेच शिराळा आणि पंचक्रोशीतील सहस्रो ग्रामस्थ यांनी जिवंत नागाची पूजा पूर्ववत् चालू व्हावी, यासाठी आंदोलने करणे, तसेच लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊन मागणी केली आहे.