कामामुळे येणार्‍या थकव्यासाठी (‘बर्नआऊट’साठी) व्यायामाची आवश्यकता का आहे ?

लेख क्रमांक ७२

‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्‍या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गोनॉमिक्स’चे (Ergonomics) तत्त्व आणि आजारानुसार योग्य व्यायाम यांची माहिती सादर करणार आहोत. व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. या लेखात आपण ‘कामामुळे येणार्‍या थकव्यामध्ये (बर्नआऊट) व्यायाम का आवश्यक आहे ?’ यांविषयी जाणून घेऊया.

६. ‘बर्नआऊट’साठी व्यायाम करण्याची आवश्यकता

जांघांना ताण देणे

अ. आपण आपले काम किंवा सेवा यांवर कितीही प्रेम करीत असलो, तरी शरीर आणि मन यांच्या शक्तीकेंद्रांना वेळेवर भारीत करणे अत्यावश्यक आहे. त्यावर व्यायाम हा सर्वांत सोपा आणि प्रभावी उपाय आहे.

आ. साधकांना इतक्या तीव्रतेचे ‘बर्नआऊट’ होईपर्यंत फार क्वचित्च सेवा करावी लागत असेल; पण याचा अर्थ ‘त्यांना धोका अल्प आहे’, असे नाही. ‘अधूनमधून सेवा वाढल्यावर कालांतराने मनात निर्माण होणारी उदासीनता, अलिप्तता किंवा निरुत्साह ही ‘बर्नआऊट’च्या तीव्रतेची सूक्ष्म लक्षणे आहेत’, हे साधकाने लक्षात घेऊन व्यायाम गांभीर्याने करणे आवश्यक आहे.

७. बर्नआऊटसाठी व्यायाम केल्याने शरिरात होणारी प्रक्रिया

कंबरेतून मागे झुकणे

अ. शारीरिक हालचालीने रक्ताभिसरण वाढते, मेंदूला भरपूर प्राणवायू मिळतो आणि ‘कॉर्टिसॉल’चे (शरिरातील तणावावर प्रतिक्रिया म्हणून सिद्ध झालेल्या हार्माेनचे) प्रमाण न्यून होते. त्यामुळे मन शांत होते.

आ. ५ मिनिटांच्या चालण्यानेही ‘डोपामिन’ आणि ‘नॉरएपिनेफ्रिन’ नामक मज्जासंस्थेची रसायने (न्यूरोट्रान्समिटर) वाढतात. ही दोन्ही रसायने ‘लक्ष केंद्रित करणे, उत्साह आणि ऊर्जा वाढवणे’ यांसाठी साहाय्य करतात.

इ. आपण घंटोन्‌घंटे आसंदीत बसल्याने मान दुखते, पाठीला त्रास होतो आणि शरीर थकते. शरिराची हालचाल हे शारीरिक थकवा दूर करून मानसिक थकवा वाढू न देण्याचे साधन आहे.

८. ‘बर्नआऊट’साठी करावयाचे व्यायाम

श्री. निमिष म्हात्रे

अ. दुपारी जेवणानंतर बाहेर पडा. १० मिनिटे चालण्याची कृतीही मेंदूला ‘रिसेट (मूळ स्थितीत आणणे)’ करते.

आ. कार्यालयातील काम संपले की, लगेच दूरदर्शन किंवा भ्रमणभाष न बघता थोडे चाला, हलके योगासनाचे प्रकार किंवा व्यायामशाळेतील काही प्रकार करा. यांमुळे मनातील कामाच्या विचारांची शृंखला बंद होऊन मेंदूला विश्रांती मिळेल आणि परिणामी शरिरालाही चांगली विश्रांती मिळेल.

इ. कामाच्या गडबडीत व्यायामाला अगदी अल्प वेळ देऊनही तुमच्या व्यायामाचे नियोजन करू शकता, उदा. प्रत्येक ६० – ९० मिनिटांनी २ ते ५ मिनिटे शरिराची हालचाल करा, खोलीत फेर्‍या मारा, शरिराला थोडा ताण द्या किंवा श्वास घेऊन मान फिरवा.

आपण दिवसभर दमलेलो किंवा गोंधळलेलो असू, तेव्हा ‘व्यायाम टाळूया’, असे वाटणे साहजिक आहे; पण यामुळे ‘बर्नआऊट’चे चक्र चालूच रहाते. शरिराची हालचाल म्हणजे स‍वलत नाही, तर हालचाल हे काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी स्वतःला सज्ज करण्याचे साधन आहे. कामाच्या व्यापामुळे थकून व्यायामाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा उपाययोजना म्हणून तो अवलंबण्याकडे लक्ष द्या.’

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (२५.६.२०२५)

(समाप्त)

यासाठी करावयाच्या व्यायामांचा व्हिडियो https://youtu.be/lzRrfJ-ElL0?si=BfDshFTMI_jsnS-o या लिंकवर आहे.


 🪷 व्यायाम : या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा 🪷