भ्रमणभाषवरून बोलतांना घ्यायची काळजी !

१. भ्रमणभाषवरून मान तिरपी करून बोलल्याने मान आणि खांदा यांचे त्रास होणे

‘भ्रमणभाषवर बोलतांना बरेच जण स्वतःची मान आणि खांदा यांची काळजी घेत नाहीत. बरेच लोक भ्रमणभाषवरून बोलतांना मान तिरपी करून बोलतात. त्यामळे मानेवर ताण येऊन मानदुखी, खांदेदुखी यांसारखे आजार वाढतात.

२. दुचाकी चालवतांना खांदा आणि मान यांमध्ये भ्रमणभाष धरून बोलण्यामुळे अपघात होण्याची शक्यता असणे

काही जण दुचाकी चालवतांना भ्रमणभाषचा वापर करतात. त्या वेळी खांदा आणि मान या दोघांमध्ये भ्रमणभाष पकडला जातो. गाडी चालवतांना भ्रमणभाषवर बोलल्याने आपले लक्ष विचलित होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता असते.

३. ‘ब्लूटूथ इअरबड्स’, ‘हेडसेट’ किंवा ‘वायर्ड इअरफोन’ या उपकरणांचा उपयोग करून भ्रमणभाष वापरल्याने मानेचे त्रास टाळता येणे

डॉ. दीपक जोशी

आपण भ्रमणभाष हातात न धरता ‘ब्लूटूथ इअरबड्स’, ‘हेडसेट’ किंवा ‘वायर्ड इअरफोन’ या उपकरणांच्या साहाय्याने तो वापरू शकतो. यांमुळे आपल्याला मान वाकडी करावी लागत नाही आणि भ्रमणभाषही हातात धरण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे आपण मान आणि खांदा यांचे आजार टाळू शकतो.

४. भ्रमणभाषवरून बोलतांना भ्रमणभाष कानापासून थोडा दूर ठेवणे आवश्यक

काही जण भ्रमणभाषवरून बोलतांना भ्रमणभाष कानाला चिकटून ठेवतात. तसे न करता भ्रमणभाषचा ‘स्पिकर’ आणि कान यांच्यामध्ये अनुमाने अर्धा ते १ सेंटीमीटर अंतर ठेवावे.’

– डॉ. दीपक जोशी (बॅचलर ऑफ नॅचोरोपॅथी अँड योगिक सायन्स) देवद, पनवेल. (१८.२.२०२५)