भाषावादाच्या ऐवजी पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचे स्मरण असणे महत्त्वाचे !

शालेय पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा जनतेत ऐक्यभाव निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्या देशातील वातावरण फार विचित्र होत चालले आहे. आम्ही प्रांताप्रांतात विभागलो आहोत. भाषा भिन्न असल्यामुळे भाषावादही निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे आपण राष्ट्राचा विचार न करता केवळ संकुचित वृत्ती धारण करून आपापसांत भांडण्यातच व्यस्त आहोत. हे अत्यंत चिंतेचे असून देशहिताच्या दृष्टीने घातकसुद्धा आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा ही आपल्याला सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात कसे वागावे, याचे मार्गदर्शन करणारी आहे. दुर्दैवाने आज या प्रतिज्ञेकडे आपण पाठ फिरवली आहे. हे लक्षण चांगले नाही.

‘भाषावार केलेली प्रांतरचना आपापले वेगळेपण जोपासण्यासाठी करण्यात आली आहे’, असा अर्थ जर आपण लावला, तर तो आत्मघात ठरेल. सध्या भाषावार प्रांतरचनेकडे विविधता यादृष्टीने पाहिले जात नाही. आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी राष्ट्राला घातक ठरणार्‍या कुविचाराच्या मागे आपण धावत चाललो आहोत. याचे भान राहिले नाही, असे दुःखाने म्हणावे लागते. आपल्या राष्ट्रातील ऐक्यभाव टिकून रहाण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा केवळ ४ परिच्छेदांची आहे. सामान्यपणे प्रत्येक परिच्छेद हा २ ते ३ ओळींचाच आहे. त्यातील गर्भित अर्थ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. २१ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय प्रतिज्ञेच्या पहिल्या ३ ओळींचा भावार्थ’ जाणून घेतला. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा :https://sanatanprabhat.org/marathi/937393.html

२. भारतीय प्रतिज्ञेच्या दुसर्‍या परिच्छेदाच्या २ ओळींचा भावार्थ

पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दुसरा परिच्छेद केवळ २ वाक्यांचा आहे… ‘माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे. त्या परंपरेचा पाईक होण्याची माझ्या अंगी पात्रता यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.’

श्री. दुर्गेश परुळकर

देशाची समृद्धता ही शाश्वत सिद्धांतांची आहे. हा वारसा अध्यात्मशास्त्राचा आहे. हे अध्यात्मशास्त्र विविध प्रकारच्या मार्गाने नटलेले आहे; म्हणूनच समृद्ध असलेले आहे. द्वैतवाद, अद्वैतवाद, केवलाद्वैतवाद, योगमार्ग, संन्यासयोग, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग, असे ईश्वरप्राप्ती आणि मुक्ती प्राप्त करून देणारे विविध मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाचा अवलंब केला, तरी मोक्ष अथवा मुक्ती हे ध्येय आपल्याला गाठता येते.

तसेच विविध प्रकारच्या देवीदेवतांची उपासना हिंदु संस्कृतीला मान्य आहे. ‘कोणत्याही देवाची कुणीही उपासना करावी’, असे स्वातंत्र्य प्रत्येकाला देण्यात आले आहे. हे उपासना मार्गसुद्धा भिन्न भिन्न असले, तरी त्या उपासनेच्या मार्गावरून जाणार्‍या प्रत्येक भक्ताला प्राप्त होणारे फळ, प्राप्त होणारा लाभ एकाच प्रकारचा आहे; म्हणून अशा विविधतेने नटलेल्या; परंतु समृद्ध असलेल्या परंपरेचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. अशा प्रकारचे उपासना स्वातंत्र्य अन्य कोणत्याही धर्मात आढळून येत नाही, हेच हिंदु धर्म, अध्यात्मशास्त्र यांचे वैशिष्ट्य आहे; म्हणून या अद्वितीय असलेल्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता या देशातील प्रत्येक नागरिकांनी संपादन करण्यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे.

२ अ. भारत देश आणि हिंदु संस्कृती यांचे रक्षण करण्यासाठी पाईक होण्यासाठी प्रयत्न करणे : हिंदु धर्म, संस्कृती हे अध्यात्मशास्त्र, उपासना मार्ग, ज्ञान आणि विद्या यांना महत्त्व देणारे आहेत. माणसाला जगात श्रेष्ठत्व प्राप्त होते ते केवळ विद्येमुळे, म्हणजेच ज्ञानलालसा हिंदु संस्कृतीने श्रेष्ठतम मानली आहे. ही ज्ञानलालसेची परंपरा आपल्याला जतन करायची आहे, तसेच या देशातील शौर्याची परंपरासुद्धा आपल्याला राखायची आहे. थोडक्यात ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांची परंपरा राखण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, तरच आपण भारत देश आणि हिंदु संस्कृती यांचे रक्षण करण्यासाठी समर्थ होऊ.

हिंदु परंपरा ही सात्त्विक आहे. ही भोगाची परंपरा नसून त्यागाची आहे. प्रेम हे त्यागाचे प्रतीक आहे. प्रेमात त्यागाला विशेष महत्त्व आहे. हे प्रेम भारतमातेवर, हिंदु संस्कृतीवर करावे, असे संस्कार करणारी परंपरा आहे. या संस्कारांच्या परंपरेपासून आपल्याला दूर जाण्याचा अधिकार नाही. अशा परंपरेचा पाईक होण्यातच खरी धन्यता आहे. असा दुसर्‍या परिच्छेदातील दोन वाक्यांच्या गर्भित अर्थ आहे. त्याकडे दुर्लक्ष करून जेव्हा आपण प्रांतवाद आणि भाषावाद निर्माण करून आपापसांत भांडतो, त्या वेळी आपण या परंपरेचे पाईक नाही, हेच सिद्ध करतो.

२ आ. अन्य पंथियांच्या तुलनेत हिंदु संस्कृती श्रेष्ठ असणे आणि तिच्यानुसार पाईक होण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित : ‘आम्ही सांगतो, तोच देव तुम्ही माना. अन्य कोणत्याही देवाची उपासना तुम्हाला करता येणार नाही. तुम्ही दुसर्‍या देवाची उपासना करता, याचा अर्थ तुम्ही आमच्या देवाचा अपमान करता’, अशी संकुचित, पाशवी आणि राक्षसी महत्त्वाकांक्षा हिंदु धर्म, संस्कृती अन् परंपरा यांनी आपल्यासमोर ठेवली नाही. ‘आम्ही मूर्तीपूजेचे विरोधक आहोत. त्यामुळे मूर्तीभंजन करणे, हाच आमचा धर्म आहे’, असे मानणारे आणि त्याप्रमाणे वर्तन करणारे राक्षसी प्रवृत्तीचे लोक जे आहेत, त्यांच्या विचारांची परंपरा बाळगण्याची, जतन करण्याची किंवा तिचे संवर्धन करण्याची शिकवण हिंदु संस्कृती आपल्याला देत नाही.

हिंदु संस्कृती

आपल्या संस्कृतीने संपूर्ण मानव जातीला सुसंस्कृत आणि सुविद्य करण्याचे महान ध्येय आपल्यासमोर ठेवले आहे. ज्ञानासारखी पवित्र असलेली दुसरी कोणतीही गोष्ट या भूतलावर अस्तित्वात नाही. हा आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया आहे. भगवान  श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत हाच विचार ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ३८), म्हणजे ‘या भूतलावर ज्ञानासारखे दुसरे पवित्र काहीही नाही’, अशा शब्दांत व्यक्त केला आहे. ‘शस्त्राच्या बळावर जग जिंका’, असे हिंदु संस्कृती सांगत नाही. ‘ज्ञान, सद्भावना आणि सहजीवन यांच्या बळावर विश्वमित्र व्हा’, असा संदेश देणारी हिंदु संस्कृती आहे. या संस्कृतीच्या परंपरेचा अभिमान बाळगला पाहिजे आणि अशा थोर परंपरेचा पाईक होण्यासाठी सदैव प्रयत्न केला पाहिजे, हेच आपले राष्ट्रीय, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कर्तव्य आहे.

ही कर्तव्यपरायणता आपल्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जीवनाचा मूलाधार आहे. राष्ट्र आणि समाज यांना केंद्रस्थानी ठेवून माणसाने जीवन जगावे. असे संस्कार आचरण, शिकवणूक यांतून ज्यांनी आपल्याला दिले त्या थोर पुरुषांचे पुण्यस्मरण त्यांच्याच पदपथावरून वाटचाल करतांना सहजतेने आपल्याला होणार आहे; म्हणून त्यांच्या आचारविचारांची परंपरा जतन करणे, हे आपले कर्तव्य ठरते. ही कर्तव्याची भावना जागृत करून देणारा ‘भारतीय प्रतिज्ञे’तील २ वाक्यांचा परिच्छेद आहे.

(क्रमशः)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१६.७.२०२५)

संपादकीय भूमिका

नागरिकांनी केवळ संकुचित राहून भाषेच्या सूत्रावरून आपापसांत भांडत रहाणे, हे चिंतेचे असून देशहिताच्या दृष्टीने घातकसुद्धा आहे !