
भारतीय पारंपरिक पद्धतींमागील जे विज्ञान आणि शास्त्र सध्या पुढे येत आहे, ते पाहून आपण आवाक् होतो. अशीच एक जुनी परंपरा म्हणजे केळीच्या पानावर जेवणाची ! ‘केळीच्या पानावर गरम जेवण वाढल्यावर पानातील जो चिकट द्रव पदार्थ असतो तो अन्नासमवेत पोटात जातो. त्या पदार्थामुळे कर्करोगाच्या पेशी वाढवणारी ग्रंथी हळूहळू निष्क्रीय होत जाते’, असे संशोधनाद्वारे आता पुढे येत आहे, तसेच त्या पानांमध्ये असलेली पोषक तत्त्वे अन्नात मिसळतात, जी शरिरासाठी उपयुक्त असतात. त्यातील ‘अँटीऑक्सिडेंट’मुळे (शरिराचे संरक्षण करणार्या घटकांमुळे) त्वचेला दीर्घकाळापर्यंत तरुण ठेवण्यास साहाय्य होते, तसेच डाग-खाज, पुरळ-फोड अशा समस्या दूर होतात. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने आपल्याला हे समजत आहे. पूर्वी जुने लोक परंपरा म्हणून केळीच्या पानांचा उपयोग सण, धार्मिक विधी किंवा प्रतिदिनही वापरत होती.

सध्या मात्र सगळीकडे प्लास्टिक आणि थर्माकोल यांमुळे महाभयानक परिस्थिती ओढवत आहे. शहरी भागांत, खेडोपाडी लग्नात प्लास्टिकच्या ताटल्या अन् वाट्या सर्रासपणे वापरल्या जातात. त्यातून गरम पदार्थ खाल्ल्याने साहजिकच प्लास्टिकचे सूक्ष्म कण पोटात जाऊन त्याचे शरिरावर विपरीत परिणाम होतात; जणू कर्करोगासारख्या महाभयंकर रोगांना निमंत्रणच ! त्यामुळे आता वेळ आली आहे सावध रहाण्याची. आपण सतर्कतेने आरोग्याला हानीकारक गोष्ट करणे टाळायला हवे. या निमित्ताने प्रत्येक भारतीय परंपरेकडे डोळसपणे बघणे आवश्यक आहे. त्यामागे असलेला निसर्गपूजेचा आणि मानवी आरोग्याचा सूक्ष्म विचार पाहून शास्त्रज्ञही वेगळ्या दृष्टीकोनातून त्यांच्याकडे पाहू लागले आहेत. निसर्गपूजेत निसर्गरक्षणाचाच विचार आहे. पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे; किंबहुना त्यांच्यामुळेच सर्वकाही व्यवस्थित चालू आहे. हिंदु संस्कृतीत सूर्य, वायू, पर्जन्य अशा निसर्गातील शक्तींनाच देव मानून त्यांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृती ही निसर्गाचे ‘दोहन’ करायला शिकवते, ‘शोषण’ नाही; उदाहरणार्थ आपण गायीचे दूध काढतो; पण गायीची हत्या करत नाही. गायीची हत्या करणे, हे झाले ‘शोषण’ आणि गाय जिवंत ठेवून दूध, गोमूत्र अन् शेण आपल्या उपयोगासाठी घेणे, म्हणजे ‘दोहन’. निसर्गातील संसाधनांचा उपभोग घेतांना त्यांची पुनर्भरण क्षमता अबाधित ठेवणे, हे भारतीय परंपरांचे मूलतत्त्व आहे. भारतीय आहार, विहार, परंपरा या सगळ्यांमागे सूक्ष्मातिसूक्ष्म मानवी जीवनाच्या उद्धाराचा आणि समृद्धतेचा विचार आहे. कोरोना महामारीच्या काळात भारतीय संस्कृतीचे अनन्यसाधारण महत्त्व आपण अनुभवले. त्यामुळे हिंदु धर्माचे शिक्षण घेऊन ते कृतीत आणल्यास सर्वांना लाभ होईल, हे निश्चित !
– सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, विहिघर, पनवेल.
संत कबीर यांच्या उलटबांसिया !
वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व
संस्कारक्षम पालकत्व कसे असावे ?
भ्रमणभाषच्या विळख्यात अडकलेली पिढी !
संस्कार, आरोग्य आणि राष्ट्रनिर्मिती : काळाची आवश्यकता !