शालेय पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा जनतेत ऐक्यभाव निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या देशातील वातावरण फार विचित्र होत चालले आहे. आम्ही प्रांताप्रांतात विभागलो आहोत. भाषा भिन्न असल्यामुळे भाषावादही निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे आपण राष्ट्राचा विचार न करता केवळ संकुचित वृत्ती धारण करून आपापसांत भांडण्यातच व्यस्त आहोत. हे अत्यंत चिंतेचे असून देशहिताच्या दृष्टीने घातकसुद्धा आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा ही आपल्याला सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात कसे वागावे, याचे मार्गदर्शन करणारी आहे. दुर्दैवाने आज या प्रतिज्ञेकडे आपण पाठ फिरवली आहे. हे लक्षण चांगले नाही.
‘भाषावार केलेली प्रांतरचना आपापले वेगळेपण जोपासण्यासाठी करण्यात आली आहे’, असा अर्थ जर आपण लावला, तर तो आत्मघात ठरेल. सध्या भाषावार प्रांतरचनेकडे विविधता या दृष्टीने पाहिले जात नाही. आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी राष्ट्राला घातक ठरणार्या कुविचाराच्या मागे आपण धावत चाललो आहोत. याचे भान राहिले नाही, असे दुःखाने म्हणावे लागते. आपल्या राष्ट्रातील ऐक्यभाव टिकून रहाण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा केवळ ४ परिच्छेदांची आहे. सामान्यपणे प्रत्येक परिच्छेद हा २ ते ३ ओळींचाच आहे. त्यातील गर्भित अर्थ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

१. भारतीय प्रतिज्ञेच्या पहिल्या ३ ओळींचा भावार्थ
प्रतिज्ञेतील पहिला परिच्छेद हा ३ वाक्यांचा आहे. तो असा…‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.’
‘एखादी गोष्ट माझी आहे’, अशी भावना मनात निर्माण झाली की, तिची काळजी घेणे, हा नैसर्गिक स्वभाव आहे, तसेच आपल्या मालकीची, माझी असलेली वस्तू किंवा एखादी गोष्ट, म्हणजे तिच्याविषयी अत्यंत जिव्हाळा असणे, हा अर्थ आहे. मला प्रिय असलेल्या गोष्टीला कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण व्हावी, असे वाटत नाही. ‘हा देश माझा आहे, त्यामुळे या देशाच्या हानीत माझी हानी दडली आहे आणि या देशाच्या लाभातच लाभ आहे’, अशी भावना आपण जतन करू शकलो नाही. आपण आपल्याला आपल्या देशापासून वेगळे मानत चाललो आहोत. हाच मोठा अपराध आपल्याकडून नकळत घडतो आहे.

माझा देश हा माझ्या प्रांतापुरता मर्यादित नाही. तो हिमालयापासून दक्षिण समुद्रापर्यंत आणि पूर्वेकडील समुद्रापासून अंदमान निकोबार बेटापर्यंत विस्तारलेला आहे. ही सर्व माझी मायभूमी आहे. तिच्या अस्तित्वात माझे अस्तित्व टिकून रहाणार आहे. माझा देश, म्हणजे केवळ भूमी, नद्या, नाले, पर्वत, सरोवरे नाहीत. येथील वनश्री म्हणजे माझा देश नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या माझ्या मायभूमीला संस्कृती, अभिजात (समृद्ध) साहित्य, संत वाङ्मय, वेद-उपनिषदे, ऐतिहासिक परंपरा, देशातील विविध भाषा, ऋषिमुनी, राजे-महाराजे, सम्राट, समाजसेवक, समाजसुधारक, राष्ट्रभक्त, महाकवी यांचा मोठा वारसा लाभला आहे. हे सारे जण विविध भाषा बोलणारे होते. त्यांनी भाषेच्या, प्रांताच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. संपूर्ण देशाचा विचार करून त्यांनी स्वतःचे जीवन व्यतीत केले. त्यांच्या पुण्याईवर आज आपण जगत आहोत. त्यांच्याविषयीचा कृतज्ञताभाव, अभिमान मनामध्ये बाळगून ‘हा देश माझा आहे’, ही भावना आपण मनात जतन करावी, असा प्रतिज्ञेतील ३ वाक्यांच्या पहिल्या परिषेदाचा भावार्थ आहे.

१ अ. प्रांत आणि भाषा यांमध्ये वेगळेपण जोपासण्याने नकळतपणे संत-महात्मे अन् राष्ट्रपुरुष यांचा अवमान होणे : हे सारे आपले पूर्वज आहेत, आपण त्यांचेच वारसदार आहोत. आपल्या भाषा भिन्न असल्या, तरीसुद्धा आपल्यात बंधुत्वाचे नाते आहे, हे विसरायचे नाही. असे विविध प्रांतामध्ये विभागलेले विविध भाषा बोलणारे जरी असले, तरी ते माझ्या देशाच्या थोर परंपरेचे संस्कार त्यांच्यावर जसे झाले आहेत, तसे माझ्यावर झाले आहेत. या संस्कारांच्या दृष्टीने विचार करता एकच संस्कृती असल्याकारणाने आम्हा सर्वांची आदरस्थाने, श्रद्धास्थाने, तीर्थक्षेत्रे एकच आहेत. म्हणून ते आपले बांधव आहेत. सगळ्यांचीच ही मातृभूमी आहे, या भारतभूमीचे आपण लेकरे आहोत; म्हणूनही आपण बांधव आहोत. ही भावना सर्वोच्च दर्जाची आहे. ‘आपली भाषा, आपला प्रांत वेगळा म्हणून आपण परस्परांचे बंधू नाहीत’, असा आपण जर विचार केला, तर ‘आपल्या समान पूर्वजांना आपण नाकारतो आहोत’, हा त्यांचा अपमान न कळत आपल्या हातून घडत आहे.
या कलियुगातच आद्यशंकराचार्य दक्षिण हिंदुस्थानातील, समर्थ रामदासस्वामी महाराष्ट्रातील, स्वामी विवेकानंद बंगालमधील, स्वामी बसवेश्वर हे कर्नाटकातील, अशा विविध प्रांतातील संत-महंतांनी या राष्ट्रासाठी स्वतःचे आयुष्य वेचले आहे. संपूर्ण हिंदुस्थानात या आणि अशा संत-महात्म्यांविषयी आपल्या प्रत्येकाच्या मनात आदराची अन् श्रद्धेची भावना आहे. जेव्हा आपण प्रांताप्रांतात आणि भाषेभाषेमध्ये स्वतःचे वेगळेपण जोपासतो, तेव्हा नकळत या संत-महात्म्यांचा आपल्याकडून अवमान होतो.
आद्यशंकराचार्य आणि वीर सावरकर यांनी भारतीय बांधवांच्या दृष्टीने केलेले विश्लेषण

आद्यशंकराचार्य यांनी ‘अन्नपूर्णा’ या स्तोत्रातील एका श्लोकात आपण भारतीय परस्परांचे कसे बांधव आहोत, ते सांगत आहेत. तो श्लोक,
माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।
बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ।। – अन्नपूर्णास्तोत्र, श्लोक १२
अर्थ : देवी पार्वती माझी माता, देवाधिदेव महादेव माझे पिता, शिवभक्त माझे बांधव आणि तिन्ही भुवने माझा स्वदेश आहेत.

याच श्लोकाचा आधार घेऊन वीर सावरकर ‘हिंदूंचे एकतागान’ या कवितेत आपल्या बांधवांना सांगतात,
‘तुम्ही आम्ही सकल हिंदू । बंधुबंधू । तो महादेवजी पिता आपुला चला तया वंदू ॥’
पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या पहिल्या परिच्छेदातील या ३ वाक्यांचा हा गर्भित अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे; कारण हा माझा देश का आहे ? या देशातील नागरिक माझे बांधव का आहेत ? आणि माझे या देशावर प्रेम का असले पाहिजे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या विवेचनात आढळतात.
– श्री. दुर्गेश परुळकर
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि त्याचा आरंभ महाराष्ट्रापासून केला. केवळ महाराष्ट्राचे स्वातंत्र्य, म्हणजे हिंदवी स्वराज्य इतकी संकुचित भावना त्यांची नव्हती. संपूर्ण भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना हा त्यांच्या शपथेचा व्यापक अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे; म्हणूनच आजही छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक, पुतळे हे केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशभर दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या नंतरच्या काळात मराठ्यांनी अटकेपार भगवा झेंडा फडकवला; म्हणूनच ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे’, असे आपण म्हणतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच वेगवेगळ्या कालखंडात देशात असे चक्रवर्ती सम्राट झाले. महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, पुष्यमित्र, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट ललितादित्य, सम्राट अशोक, सम्राट विक्रमादित्य, राजा रामदेवराय हे सारे वीर पुरुष आपल्याला आपले वाटतात. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, रासबिहारी बोस, वीर सावरकर, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, बटुकेश्वर दत्त, सुखदेव यांसारख्या एक ना अनेक क्रांतीविरांविषयी आपल्या मनात आदराची, श्रद्धेची आणि अभिमानाची भावना आहे; म्हणूनच आपल्याला केवळ आपला प्रांत किंवा भाषा यांचा अभिमान बाळगून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करता येणार नाही. ती आपली संकुचित वृत्ती ठरेल. त्यासह शूरवीर सम्राटांचाही आपल्याकडून नकळत अपमान होईल. या सर्व थोर पुरुषांनी स्वतःला प्रांतात किंवा स्वतःच्या भाषेत बंदिस्त करून घेतले नव्हते. त्यांनी संपूर्ण देशाचा विचार केला. हे सारे महापुरुष, म्हणजे आपले आदर्श आहेत. या सर्वांविषयी आपल्या मनात श्रद्धाभाव आणि अभिमान आहे; म्हणूनच ‘हा माझा देश आहे, हे माझे बांधव आहेत. मी या सर्वांचा वारसदार आहे. हे सर्व माझे पूर्वज आहेत’; म्हणूनच संकुचित भावना बाळगणे, हे आपल्या राष्ट्राच्या दृष्टीने हिताचे ठरत नाही.
(क्रमशः)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१६.७.२०२५)
| लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/937969.html |
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !