Shani Shingnapur Corruption : श्री शनैश्चर देवस्थानाच्या विश्वस्तांनी २ सहस्रांहून अधिक बोगस कर्मचारी नियुक्त करून कोट्यवधी रुपये लुटले !

महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन

देवस्थानावर समिती नियुक्त करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा ! 

मुंबई, ११ जुलै (वार्ता.) – अहिल्यानगर येथील श्री शनिदेवाच्या स्वयंभू आणि जागृत श्री शनैश्चर देवस्थानाची विश्वस्तांनीच लूट केल्याचा दुर्दैवी प्रकार विधानसभेत उघड झाला. विश्वस्तांनी २ सहस्रांहून अधिक बोगस कर्मचार्‍यांची नियुक्ती करून देवस्थानाच्या कोट्यवधी रुपयांची लूट केली. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन पंढरपूर आणि शिर्डी देवस्थानांप्रमाणे श्री शनैश्चर देवस्थानावर समिती नियुक्त करण्याचा विचार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

१. भाजपचे आमदार विठ्ठल लंघे यांनी श्री शनैश्चर देवस्थानामधील भ्रष्टाचाराविषयी कारवाई करण्याविषयीची लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विधी आणि न्याय विभागाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालातील माहिती या वेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

२. ईश्वराच्या ठिकाणीही लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात. ते करत असलेले भयानक प्रकार या अहवालातून उघड झाल्याची खंतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

असा झाला भ्रष्टाचार !

जुने श्री शनैश्चर देवस्थान २५८ कर्मचार्‍यांमध्ये उत्तम प्रकारे चालवले जात असतांना कर्मचार्‍यांची संख्या २ सहस्र ४७४ पर्यंत वाढवण्यात आली. विश्वस्तांनी त्यांच्या संपर्कातील कार्यकर्त्यांच्या नावे अधिकोषात बोगस खाती उघडून देवस्थानाद्वारे प्रती मासाला त्यात वेतन जमा केले. अशा प्रकारे प्रत्यक्ष कार्यरत नसलेल्या २ सहस्रांहून अधिक बोगस कर्मचार्‍यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात आले. अशा प्रकारे देवस्थानाच्या कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

अशा प्रकारे बोगस कर्मचारी दाखवण्यात आले !

अस्तित्वात नसलेल्या जागांसाठी ८० बोगस कर्मचारी दाखवण्यात आले. भक्तनिवासातील १०९ खोल्यांसाठी २०० कर्मचारी दाखवण्यात आले. काहीही काम नसलेले ३२७ कर्मचारी दाखवण्यात आले. देवस्थानाच्या १३ गाड्यांसाठी १६३ कर्मचारी दाखवण्यात आले. तेल विक्री आणि देणगी स्वीकारण्याच्या १२ कक्षांवर ३५२ कर्मचारी दाखवले गेले. वृक्षसंवर्धनासाठी ८३ कर्मचारी दाखवले गेले; मात्र यांतील एकही कर्मचारी कार्यरत नाही. देवस्थानाच्या ३५ एकर भूमीसाठी ६५ कर्मचारी दाखवण्यात आले. पाणी पुरवठा विभाग ८०, गोशाळा ८२, वाहनतळाच्या स्वच्छतेसाठी ११८, सुरक्षा विभाग ३१५, प्रसादालय ९७, वाहनांसाठी १७६, विद्युत् विभाग २०० अशा प्रकारे अनेक बोगस कर्मचारी देवस्थानामध्ये दाखवण्यात आले.

अशी होणार पुढील कार्यवाही !

विधी आणि न्याय विभागाच्या अहवालानंतर धर्मादाय आयुक्तांपुढे या प्रकरणाची सुनावणी चालू आहे. विधी आणि न्याय विभागाने या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणात एका धर्मादाय रुग्णालयातील अधिकार्‍यांनी विश्वस्तांना ‘क्लीन चीट’ (दिलासा) दिली आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या बाहेरील अधिकार्‍यांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. भ्रष्टाचार्‍यांना दोषमुक्त करणार्‍या अधिकार्‍यावरही फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

हे वाचा → संपादकीय : मंदिरांचे सरकारीकरण हे काँग्रेसी पाऊल (?)

बोगस ‘ॲप’ सिद्ध करून पूजेच्या नावाने कोट्यवधी रुपयांची लूट !

श्री शनैश्चर देवस्थानाचे काही कर्मचारी आणि पुजारी यांनी बनावट ‘क्युआर् कोड’ आणि पावती पुस्तके बनवून त्यावर पूजेसाठी अन् देणगी म्हणून कोट्यवधी रुपये स्वीकारले. असे अनेक ॲप सिद्ध करण्यात आले. प्रत्येक ॲपवर २ लाखांहून अधिक भाविक जोडलेले आहेत. भाविकांकडून पूजेसाठी गोळा केलेले पैसे देवस्थानामध्ये जमा करण्याऐवजी खासगी लोकांच्या खिशात गेले आहेत. हे ॲप निर्माण करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची अनुमती घेण्यात आलेली नाही, अशी माहिती आमदार विठ्ठल लंघे यांनी दिली.

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ॲपद्वारे ५०० कोटींहून अधिक रुपयांची लूट झाल्याचे म्हटले. सायबर विभागातील पोलीस अधिकार्‍यांकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा या वेळी करण्यात आली.

संपादकीय भूमिका

व्यवस्थापन सुधारण्याच्या नावाखाली शनैश्चर मंदिराचे सरकारीकरण करण्यात आले होते; मात्र सरकारीकरणाचा दुष्परिणाम येथे दिसून येत आहे. हे मंदिर सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त करून ते भक्तांच्या स्वाधीन करणे आवश्यक आहे !