जगातील समस्त दुःखाचे कारण, म्हणजे दुर्बलता आणि बल हेच त्यावर एकमात्र औषध !

स्वामी विवेकानंद

बल हेच जीवन होय. दुर्बलता म्हणजे मृत्यू. बल हाच परम आनंद होय, शाश्वत आणि अमर जीवन होय. दुर्बलता, म्हणजे सतत भार, चिंता आणि दुःख होय. दुर्बलता म्हणजेच मृत्यू होय.

या जगातील समस्त दुःखाचे कारण, म्हणजे दुर्बलता हेच होय. आपण शक्तीहीन आहोत; म्हणूनच आपल्याला दुःख भोगावे लागते. दुर्बलतेमुळेच आपण खोटे बोलतो, चोरी करतो, हत्या करतो आणि अन्य गुन्हे करतो, दुर्बलतेमुळेच आपण दुःखाच्या खाईत (दरीत) पडतो. आपण दुर्बल आहोत म्हणूनच आपण मृत्यूमुखी पडतो. बल हीच एकमात्र आवश्यक गोष्ट होय. बल हेच भवरोगाचे एकमात्र औषध होय. श्रीमंतांच्या द्वारे चिरडल्या जाणार्‍या गरीब लोकांसाठी बल हेच एकमात्र औषध आहे. विद्वानांच्या द्वारे भरडल्या जाणार्‍या अज्ञ लोकांसाठी बल हेच एकमात्र औषध आहे आणि अन्य पापी व्यक्तींचा ज्यांच्यावर जुलूम होतो, अशा पापी लोकांसाठीही बल हेच एकमात्र औषध आहे.

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)