अनेक वर्षे साधना करूनही साधकांची आध्यात्मिक प्रगती न होण्यामागे सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७५ वर्षे) यांनी कथन केलेली कारणे आणि त्यांवरील उपाय !

‘संघटनात्मक रचना’ या प्रक्रियेच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘साधकांची क्षमता किती आहे’, हे दाखवून दिले. त्यानंतर त्यांच्या कृपेने साधकांना विविध सेवांचे दायित्व मिळाले आणि ते घडत आहेत, तरीही ‘ज्या गतीने साधकांचे प्रयत्न होणे अपेक्षित आहे, तसे ते होत नाहीत’, असे लक्षात आले. पुढील सूत्रांचा आधार घेऊन साधक याविषयी चिंतन करू शकतात.

पू. अशोक पात्रीकर

१. साधकांची साधनेविषयी चुकीची मानसिकता 

१ अ. आध्यात्मिक प्रगती होत नसल्यामुळे ‘झोकून देऊन सेवा करण्यापेक्षा जमेल तशी व्यष्टी आणि समष्टी सेवा करावी’, असा साधकांनी विचार करणे : सनातन संस्थेतील पुष्कळ साधक मागील अनेक वर्षांपासून तन, मन, धन आणि बुद्धी गुरुचरणी अर्पण करून, तसेच झोकून देऊन व्यष्टी अन् समष्टी साधना करत आहेत. विविध जिल्ह्यांतील पूर्णवेळ साधना न करणारे अनेक साधकही झोकून देऊन सेवा करतात, तरीही अगदी थोड्याच साधकांची आध्यात्मिक प्रगती झाली आहे. त्यामुळे ‘एवढी साधना आणि सेवा करूनही आपली प्रगती होत नसेल, तर झोकून देऊन सेवा कशाला करायची ? त्यापेक्षा जमेल तेवढी व्यष्टी आणि समष्टी सेवा अन् थोडीफार साधना करत राहूया’, असा विचार साधक करतात.

१ आ. ‘व्यष्टी साधनेपेक्षा जमेल तशी समष्टी सेवा करूया’, असे साधकांना वाटते; कारण व्यष्टी साधनेमध्ये होणारा संघर्ष सहन करण्याची त्यांच्या मनाची सिद्धता नसते.

आगामी आपत्काळातून तरून जाण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेले साधनेचे महत्त्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘साधकांनो, जिवंत रहायचे असेल, तर साधना करा ! ‘साधना करणे’ ही अर्धकालीन नोकरी (पार्ट-टाईम जॉब) नसून पूर्णकालीन नोकरी (फुलटाईम जॉब) आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले   

२. साधकांची आध्यात्मिक प्रगती न होण्यामागील कारणे  

अ. साधकांची आध्यात्मिक प्रगती होण्यामध्ये केवळ ‘साधकांच्या साधनेचा कालावधी आणि त्यांनी केलेली समष्टी साधना’ एवढेच घटक कारणीभूत नसतात, तर साधकांनी समष्टी साधनेसह व्यष्टी साधनाही सातत्याने करत रहावी लागते.

आ. साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया सातत्याने राबवायला हवी अन् ‘स्वभावदोष आणि अहं न्यून होत आहेत कि नाहीत’, याचाही अभ्यास करायला हवा.

इ. साधनेच्या प्रयत्नांना भावनिर्मितीची जोड देऊन कृतज्ञता आणि शरणागतभाव वाढवण्याकडेही लक्ष द्यायला हवे.

ई. साधकांना साधनेत येण्यापूर्वी ‘आपण किती पापे केली आहेत ? किती जणांना दुखावले आहे ? किती देवाण-घेवाण हिशोब निर्माण केले आहेत ?’ याविषयीची जाणीव नसते. ती पापे आणि देवाणघेवाण हिशोब पूर्ण करण्यात साधकांची साधना व्यय होते.

उ. साधकांना ‘आपले या जन्मीचे प्रारब्ध आणि आपली पूर्वजन्मीची साधना किती आहे’, हेही ठाऊक नसते. त्यामुळे तीव्र प्रारब्ध सौम्य करण्यात साधकांची साधना व्यय होते आणि यासाठी अनेक वर्षेही लागू शकतात.

ऊ. ‘मागील जन्मांपासून स्वतःला पूर्वज आणि अनिष्ट शक्ती यांचा त्रास, म्हणजेच आध्यात्मिक त्रास किती होता ?’, हे साधकांना ठाऊक नसते. अनिष्ट शक्तींशी लढण्यातही साधकांची या जन्मीची साधना व्यय होते.

ए. साधक ‘मी करत असलेली साधना योग्यच आहे’, असा स्वतःच निष्कर्ष काढून उत्तरदायी साधकांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करतात. ‘उत्तरदायी साधकांना अडचणी न विचारता आपणच मनाने साधना करत रहावी’, अशीही साधकांची चुकीची मानसिकता असते.

३. साधनेविषयीच्या चुकीच्या विचारप्रक्रियेवर उपाय

३ अ. ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करायला मिळणे, ही मोठी गुरुकृपा असून यासाठी साधकांनी कृतज्ञ असायला हवे ! : साधकांना सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाछत्राखाली साधना करण्याची संधी मिळाली आहे. ‘गुरुदेवांनी १०० कोटी हिंदूंमधून ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करण्यासाठी आपली निवड केली आहे’, ही सनातनच्या प्रत्येक साधकावर पुष्कळ मोठी गुरुकृपा आहे. सनातन संस्था सांगत असलेली साधना थोडी कठोर वाटत असली, तरी हा साधनामार्ग परिपूर्ण आणि मोक्षप्राप्ती करून देणारा आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांच्या अनेक जन्मांचे प्रारब्ध न्यून केले आहे’, यासाठी साधकांनी कृतज्ञ असायला हवे.

३ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी अन्य गुरूंप्रमाणे साधकांच्या कठोर परीक्षा न घेणे : पुराणांतील गोष्टींत सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर साधकांच्या परीक्षा कधी घेत नाहीत. प.पू. भक्तराज महाराजांचे गुरु प.पू. बाबांची जशी परीक्षा घेत होते किंवा प.पू. भक्तराज महाराजांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या जशा परीक्षा घेतल्या, तशा कठोर परीक्षा परात्पर गुरु डॉक्टर साधकांच्या घेत नाहीत. ‘साधनेत आल्यानंतर गुरुमाऊलीने स्वतःला (साधकाला) किती कठीण प्रसंगातून तारून नेले आहे’, याचे नित्य स्मरण ठेवावे.

३ इ. गुरूंचे आज्ञापालन करून साधना वृद्धींगत करावी ! : गुरूंचे आज्ञापालन करून ते सांगतील त्याप्रमाणे तन, मन, धन आणि बुद्धी यांचे अर्पण करत सेवा अन् साधना करावी आणि ‘स्वतःची साधना दिवसेंदिवस वृद्धींगत होत आहे ना ?’, याकडे लक्ष द्यावे.

४. साधकाने अंतर्मुख होऊन पुढील गोष्टींकडे लक्ष द्यावे !

अ. ‘प्रत्येक क्षणी स्वतःची साधना होत आहे ना ?

आ. साधनेला हानीकारक अशा भ्रष्टाचारासारख्या अयोग्य कृती स्वतःकडून होत नाहीत ना ?

इ. कुटुंबातील साधना न करणार्‍या किंवा करणार्‍या व्यक्तींच्या समवेत साधकत्वाने रहाता येते का ?

ई. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, तसेच गुणसंवर्धन अन् भावजागृती यांविषयीचे गांभीर्य स्वतःमध्ये निर्माण झाले आहे का ?’

साधकांनी स्वतःला असे विविध प्रश्न विचारून अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करावा. आध्यात्मिक प्रगतीचा विचार मनात न येऊ देता ‘गुर्वाज्ञापालन करत राहिल्यास गुरुमाऊली पुढचा मार्ग दाखवणारच आहे’, अशी श्रद्धा मनात निर्माण करावी !

सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली ही शब्दसुमने त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करतो.’

– पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे संत, वय ७५ वर्षे) (२४.६.२०२५)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.