| प्राणायामेन युक्तेन: सर्वरोगक्षयो भवेत: । अयुक्ताभ्यासयोगेन: सर्वरोगसमुद्भवः ।।
अर्थ : प्राणायाम नियमितपणे केल्यास सर्व रोग नष्ट होतात. चुकीच्या पद्धतीने, अयोग्य वेळेस केला, तर आजार होऊ शकतात. |
ऊर्जा संचरण करणारे नाभीचक्र !
निरोगी शरिरासाठी नाभीचक्र संतुलित असणे आवश्यक आहे. नाभी पोटाच्या मध्य भागात मध्य रेषेवर स्थित आहे. तिला मर्म किंवा बेंबी म्हणतात. योगच्या विज्ञानाप्रमाणे शरिरात नऊ द्वारे आहेत. त्यामध्ये तीन द्वारे (चक्रे) महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये नाभीचे स्थान मणिपूरचक्रात आहे. शरिरात मुख्य नाड्यांचे जाळे ३ ठिकाणी एकत्रित होते. मस्तक, हृदय आणि नाभी. यात नाभी प्रमुख आहे. शरिरात ऊर्जेचे संचरण नाभीमुळे होते. काही विद्वानांनी याला शरिराचा ‘दुसरा मेंदू’ म्हटले आहे.
(या लेखातील सर्व लिखाण श्री. अकलेश जैन (साभार : मराठी मासिक ‘योग संदेश’) यांचे आहे.
नाभीचे महत्त्व !

१. गर्भाधानापासून ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणांपर्यंत नाभीकेंद्र क्रियाशील असते.
२. मृत्यूनंतर हृदयाचे ठोके थांबल्यावर ५-६ मिनिटांनंतरही नाभीत स्पंदने होत असतात. जर कुणी अनुभवी माणूस कुठल्या विधीने नाभीच्या प्राणऊर्जेचा संपर्क हृदयाशी परत स्थापित करू शकला, तर माणसाचा मृत्यू टाळता येईल.
३. मातेच्या गर्भात बाळाचे सर्वांत आधी नाभीकेंद्र विकसित होते. नाभीत आपल्या पैतृक ऊर्जेचा संचय होतो, जी आपल्या संपूर्ण विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. गर्भस्थ बाळात नाभीच्या माध्यमानेच गरोदरपणी विकासासाठी आवश्यक पोषक तत्त्वांची पूर्ती होते. गर्भ बाहेर आल्यावर सर्वांत आधी आईच्या शरिराला नाभीने जोडणारी नाळ कापणे आवश्यक असते. म्हणजे बाळ स्वतंत्रपणे श्वास घेऊन आपली जीवनयात्रा चालू करू शकेल. जीवनाचा पहिला श्वास पुष्कळ महत्त्वाचा असतो. जर अज्ञानवश जन्म घेतांना नाभीला आईशी जोडणारी नाळ त्वरित कापली गेली नाही किंवा नाळ कापल्यावर बाळ रडले नाही, तर ते अधू होऊ शकते.
नाभी असंतुलनाची कारणे !

असंतुलनाचे कुठलेही एक कारण नसून पुष्कळ कारणे असू शकतात; पण काही अंशी महत्त्वाची कारणे आहेत की, ज्यांचा संबंध सरळ नाभीशी आहे.
१. माणसाच्या मेंदूत उत्पन्न होणार्या भीतीचा अधिक प्रभाव नाभीवर पडतो. जसे कुठल्याही माणसाला जंगलात वाघ किंवा दुसरा प्राणी दिसला, तर त्याला भीती वाटेल आणि त्याची नाभी असंतुलित होऊन जाईल; म्हणून नाभीला भीतीचे केंद्र म्हटले आहे. माणसासमोर ज्या वेळी भीतीचे कारण उभे रहाते, त्या वेळी त्याची प्रतिक्रिया सर्वप्रथम नाभीचक्राला सहन करावी लागते. भीतीमुळे माणसाने वारंवार पाणी पिणे, शौचास किंवा लघवी होणे, हे सर्व नाभी सक्रीय झाल्यामुळे होते.
२. शरिरात मेंदू आणि नाभी यांचा पुष्कळ संबंध आहे. माणूस आधुनिक आणि भौतिकवादी होत चालला असून त्याचे ताण-तणाव वाढत जात आहेत. याच मानसिक ताणामुळे त्याची नाभी असंतुलित होऊन जाते.
३. खेळणे, जड वस्तू उचलणे, जास्त मसालेदार जेवण करणे, खड्ड्यात अचानक पाय जाणे आणि काही अशा शारीरिक क्रिया ज्या आपण असावधपणे करतो, त्यांच्यामुळेसुद्धा नाभी असंतुलित होऊन जाते.
अस्वस्थ नाभीचक्राची लक्षणे
१. नाभी निरोगी नसेल, तर सर्वांत आधी शरिराची चकाकी न्यून होते. तोंडावर काळे डाग, काळपटपणा आणि डोळ्यांच्या खाली खोल होते. शरिराची ऊर्जा अल्प होते आणि अशक्तपणा जाणवतो.
२. निरोगी नाभी वीर्याची निर्मिती आणि नस, स्नायूंना स्फूर्ती देते. अस्वस्थ नाभी नपुंसकतेला जन्म देते.
३. स्त्रियांच्या पाळीच्या तक्रारीचे एक कारण नाभीसुद्धा असते.
४. नाभीचा आपल्या पचनाशी खोल संबंध असतो. नाभी असंतुलनाने आंबट ढेकर, अपचन, मलावरोध, दस्त (जुलाब) आदींच्या तक्रारी चालू होतात.
निरोगी नाभीचक्राचे लक्षण
१. नाभी चैतन्याचे मूळ केंद्र आहे. याच्या संतुलनाने मन आणि आत्मा निरोगी रहातात.
२. नाभी संतुलित झाल्याने पोटाचे विकार उत्पन्न होत नाहीत.
३. नाभीचक्र ठीक असेल, तर आपल्या शरिराची ऊर्जा वाढते आणि आपल्या मुखमंडलाचे तेज वाढेल. प्रत्येक माणूस तुमच्याकडे आकर्षित होईल. आपले आतील सौंदर्य वाढेल.
४. नाभीचक्र संतुलित झाल्यावर मन आणि मेंदू दोघेही संतुलित रहातात. माणूस तणावाखाली वावरत नाही आणि त्याची स्मृतीसुद्धा चांगली रहाते.
नाभी संतुलित आहे, हे कसे ओळखाल ?

सकाळी रिकाम्या पोटी सरळ झोपून जर नाभीला बोट किंवा आंगठ्याने दाबले, तर तिथे हृदयाच्या ठोक्यांप्रमाणे स्पंदनाचा अनुभव येईल. असे स्पंदन अनुभवल्यास नाभीचक्र आपली संतुलित स्थिती दाखवते. जर हे स्पंदन कळले नाही, तर समजायला हवे की, नाभी असंतुलित आहे.
नाभीची स्थिती पाहून आजार लक्षात येणे !

नाभीची स्थिती पाहून रोगाचे उपचार केले जातात.
नाभी वरच्या बाजूला सरकणे
असे झाल्यास मलावरोध, वायू वाढणे, छातीत जळजळ, निद्रानाश, खोकला इत्यादींची तक्रार असते. महिलांना मासिक पाळीच्या असंतुलनाचीही शक्यता असू शकते.
नाभी खालच्या बाजूला सरकणे
असे झाल्यास पोटदुखी, पोट गुडगुडणे आणि दस्त (जुलाब) आदींच्या तक्रारी होतात.
नाभी डाव्या नितंबाकडे सरकणे
शरिराच्या वरच्या उजव्या बाजूला ताण आणि पीडा जाणवू शकते. यकृत, पित्ताशय, उदरपटल आणि उजवी किडनी प्रभावित होऊ शकते. कधी कधी कंबर किंवा डावा पाय येथे वेदना होऊ शकतात.
नाभी उजव्या नितंबाकडे सरकणे
शरिराच्या वरच्या डाव्या भागात वेदना आणि ताण जाणवू शकतो. त्याच्यामुळे स्वादुपिंड, प्लीहा आणि डावी किडनी प्रभावित होऊ शकते.
नाभी उजवीकडे सरकणे
शरिराच्या खालच्या भागात ताण आणि वेदना संभवते. यकृत (‘लिव्हर’), पित्ताशय आणि डावी किडनी प्रभावित होऊ शकते. आतड्यांतही त्रास होऊ शकतो.
नाभी डावीकडे सरकणे
शरिराचा उजवा भाग प्रभावित होतो. किडनी आणि आतड्यांमध्ये ताण, ताठरपणा आणि वेदना होऊ शकतात.
नाभी वरच्या बाजूस डावीकडे सरकणे
उजवीकडे खालच्या बाजूस ताण किंवा ताठरपणा येतो, वेदना होतात. स्वादुपिंड (‘पॅन्क्रियाज’), प्लीहा (‘स्लिन’) आणि डावी किडनी येथे वेदना होऊ शकतात. महिलांना पाळीमध्ये असंतुलन होऊ शकते.
नाभी वरच्या बाजूस उजवीकडे सरकणे
शरिराचा डावा भाग प्रभावित होतो आणि किडनी अन् आतडी यांमध्ये ताण, ताठरपणा आणि वेदनेचा अनुभव होऊ शकतो.
नाभी संतुलनासाठीची योगासने !
१. उत्तानपादासन : शांत झोपून शरिराचे सगळे स्नायू सैल सोडून द्यावे. पालथे निजून हळूहळू दोन्ही पायांना (बोटांच्या वरच्या दिशेला पुष्कळ ताणून) जितका वेळ तुम्ही सहजपणे ठेवू शकाल, तितका वेळ वर उचला. परत हळूहळू खाली आणून भूमीवर झोपावे आणि हळूहळू श्वास घ्यावा. पहिल्यांदा ३० अंशापर्यंत, दुसर्यांदा ४५ अंशापर्यंत आणि तिसर्यांदा ६० अंशापर्यंत पायांना उचलावे.
२. धनुरासन : पालथे निजून दोन्ही हातांना पाठीकडे करून दोन्ही पायांना पकडून घ्यावे आणि शरिराला वज्राप्रमाणे ठेवावे. कधी कधी या आसनाला वज्राप्रमाणे टाचांवर बसून मागे वाकूनही करता येते.
३. नाभ्यासन : हे आसन नाभी संतुलित करण्यासाठी आणि तिला ऊर्जामय करण्यासाठी प्रभावी असते. या आसनात पालथे निजून ताठ शरिराने दोन्ही हातांना डोक्यापुढे करून, दोन्ही हातांना पसरवून घ्यावे. दोन्ही पायही २ हातांच्या रुंदीएवढे पसरावेत. मग पूरक (श्वास घेणे) करून केवळ नाभीवर सगळे शरीर उचलावे. पाय आणि हात यांना एक किंवा दीड हाताच्या उंचीपर्यंत उचलावे. डोके आणि छाती वरच्या बाजूस उचलून ठेवावे. ज्या वेळी श्वास सोडायचा असेल, त्या वेळी हात आणि पाय भूमीवर ठेवावेत.
३ अ. सकाळी रिकाम्या पोटी भूमीवर कंबर ताठ आणि पाय लांब करून बसावे. आधी उजवा पाय मोडून डाव्या मांडीवर गुडघ्याजवळ (वर ठेवून) ठेवून उजव्या हाताने उजव्या गुडघ्याला वाकवण्याचा प्रयत्न करावा, ५ वेळा दाब द्यावा आणि जितके सहन करता येईल तेवढा दाब द्यावा. त्याचप्रमाणे डावा पाय मोडून हीच क्रिया करावी, म्हणजे नाभी संतुलित हाईल.
३ आ. ताठ आणि सरळ झोपा. डोक्याखाली उशी घेऊ नका. पायांना वर उचला आणि ९० अंशाच्या काटकोनावर ठेवा. मग डोक्याला भूमीवरून न उचलता दोन्ही पायांना सरळ ठेवून हळूहळू भूमीवर आणा. सकाळी ५ किंवा ६ वेळा ही क्रिया केल्यावर नाभी संतुलित होते.
३ इ. भूमीवर सरळ झोपून श्वास बाहेर सोडावा, परत श्वास घेण्यापूर्वी पोट फुगवा. जमेल तितका वेळ अशा स्थितीत रहा.
अंदाजे ४ ते ५ वेळा ही क्रिया केल्याने नाभी निरोगी होते.
उत्तानपादासन

धनुरासन

नाभीचक्र ठीक करणारे भारतातील परंपरागत निसर्गाेपचार !
नाभीचक्राला त्याच्या ठिकाणी आणण्याचे परंपरागत पुष्कळ उपाय आहेत. नाभी संतुलनासाठी हे प्रयोग सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या ३ ते ४ घंट्यांनंतरच करायला हवेत.

१. रुग्णाला सरळ पालथे झोपवून मातीचा दिवा नाभीवर ठेवतात. लावलेल्या दिव्यावर पितळ्याचा किंवा स्टीलचा पेला पालथा घालून हाताने १ मिनीट दाब देत पकडून ठेवतात. यामुळे पेल्याच्या आतील वायू जळून जातो आणि दिवा विझून एक पोकळी किंवा अवकाश (व्हॅक्युम) उत्पन्न होते. या दाबामुळे नाभीचक्र त्याच्या जागेवर येते. (सध्या सिंथेटिक वस्त्रांचे प्रचलन आहे; म्हणून ही पद्धत वापरतांना थोडे सावध रहायला हवे.)
२. नाभीच्या चारही बाजू झाकून ठेवू शकेल एवढे कापड घ्या. ते मोहरीच्या तेलात भिजवून आणि नाभीवर थोडे तेल लावून हे कापड नाभी झाकेल असे काही वेळ ठेवा. ही क्रिया एक आठवड्यापर्यंत केल्यास नाभी संतुलित होईल.
३. नाभी सरकून वेदना होऊ लागल्यास २० ग्रॅम बडीशेप आणि गूळ समप्रमाणात घालून सकाळी रिकाम्या पोटी खाणे. सरकलेली नाभी ठीक होईल.
४. आल्याचा रस नाभीवर घालून मालिश केल्याने पातळ दस्त थांबतात आणि पोटाचे सर्व रोग ठीक होतात.
५. हातांनी नाभीच्या ठिकाणी दाब दिल्यावर किंवा त्या ठिकाणी चांदणी चुंबक (‘स्टार मॅगनेट’) लावल्यावरसुद्धा नाभी संतुलित होते.
६. नाभीच्या जवळपासच्या भागात मोहरीचे तेल लावून हलक्या हातांनी मालिश केले, तर ती शरिराच्या त्या भागांमध्ये जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात पोचवते. त्यामुळे शारीरिक सौंदर्य वाढून ओठ गुलाबी होतात, शरीर ऊर्जावान होते.
‘सोलरसेटर’
(Solersetter) यंत्राद्वारे उपचार !
हे नाभी संतुलित करण्याचे चांगले उपकरण आहे. ज्याच्या माध्यमाने पोकळी (व्हॅक्युम) उत्पन्न करून त्याच्या दाबाने नाभी संतुलित करण्याचा प्रयत्न केला जातो.
घ्यावयाची काळजी !
गरोदर महिला, तसेच कर्करोग, ॲपेंडिक्स, अल्सर इत्यादी रोगांच्या रुग्णांची नाभी संतुलित करतांना सरळ पोटाला हात लावून करायला नको.
– श्री. अकलेश जैन (संदर्भ : मराठी मासिक ‘योग संदेश’)
| योग म्हणजे मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी केला जाणारा अभ्यास ! योगाभ्यासाचा उद्देश मानसिक संतुलन, आरोग्य आणि अंतिमत: आत्मसाक्षात्कार हा आहे. |
जनतेचा पैसा अपात्र बहिणींना !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
‘ही जात विरुद्ध ती जात’, असे करून हिंदूंमध्ये फूट का पाडायची ?
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !