पालकांनो, बैठ्या जीवनशैलीचे लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम जाणा आणि ते टाळण्यासाठी त्यांना व्यायाम करण्यास प्रोत्साहन द्या !

‘आधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन सुलभ केले असले, तरी त्यामुळे शरिराची हालचाल न्यून झाली आहे. दिवसभर बसून काम केल्यामुळे निर्माण होणारी ‘बैठी जीवनशैली’ आरोग्याच्या संदर्भातील अनेक समस्या निर्माण करते. या समस्या दूर करण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी ‘व्यायाम’ हा सर्वांत प्रभावी उपाय आहे. या लेखमालेत आपण ‘बैठ्या जीवनशैली’चे आपल्या आरोग्यावर होणारे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम, त्याची कारणे अन् दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना’ इत्यादी सूत्रे समजून घेणार आहोत. या लेखात आपण ‘बैठ्या जीवनशैलीचे लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम आणि त्या दुष्परिणामांवरील उपाय’ पाहूया.

 

‘दूरचित्रवाणी’च्या आहारी गेलेली सध्याची किशोरवयीन पिढी (प्रतीकात्मक छायाचित्र )

१. मैदानी खेळांमुळे पूर्वीच्या लहान मुलांचे शारीरिक आणि मानसिक संतुलन उत्तम असणे

पालटत्या जीवनशैलीचे (लाईफस्टाईलचे) दुष्परिणाम मोठ्या व्यक्तींसह लहान मुलांवरही दिसून येत आहेत. पूर्वीच्या काळी मुले शाळा सुटल्यानंतर मैदानावर खेळायची, धावायची किंवा झाडावर चढायची. मैदानी खेळांमुळे त्यांची हाडे आणि स्नायू बळकट असायचे. त्यांचे शरीर निरोगी आणि सक्षम असे. मुले ‘घरकामात साहाय्य करणे, सायकलने फिरणे’, अशा शरिराला हालचाल देणार्‍या कृती करायची. त्यांना ‘उशिरापर्यंत टी.व्ही. (दूरचित्रवाणी) पहाणे किंवा रात्री उशिरा झोपणे’, यांची सवय नव्हती. त्यांना ‘नैसर्गिक प्रकाशात खेळणे आणि वेळेवर झोपणे’, ही शिस्त होती. मुलांचे अभ्यासाच्या जोडीला शारीरिक श्रम होत असत. त्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक संतुलन उत्तम रहायचे.

निरोगी जीवनासाठी व्यायाम

२. भ्रमणभाष आणि संगणक यांमुळे सध्याच्या मुलांच्या शारीरिक हालचाली न्यून झाल्याने त्यांच्यावर होणारे दुष्परिणाम !

आताच्या काळात भ्रमणभाष, संगणक आणि दूरचित्रवाणी संच (टी.व्ही.) यांमुळे मुलांचे मैदानी खेळ अल्प झाले आहेत. त्यामुळे मुलांच्या शरिराची नैसर्गिक हालचाल मंदावली. त्यांना शाळा, शिकवणी आणि घरचा अभ्यास, हे सगळे बसूनच करावे लागते. त्यामुळे मुलांच्या स्नायूंची योग्य वाढ होत नाही. मूल शांत रहावे; म्हणून पालक त्याच्या हातात भ्रमणभाष देतात. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच भ्रमणभाषची सवय लागते. ‘मुलांची मान पुढे झुकलेली असणे, पाठीला बाक येणे, लहान वयातच उपनेत्र (चष्मा) लागणे, स्थूलता वाढणे’, यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. त्यांच्या झोपेचे चक्र बिघडले आहे. रात्री उशिरापर्यंत भ्रमणभाष वापरण्यामुळे त्यांच्या मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही. त्यामुळे मुलांची चिडचिड आणि आळस वाढतो. मैदानी खेळाऐवजी ‘व्हिडिओ गेम’ आणि सामाजिक प्रसारमाध्यमे यांमुळे त्यांची शारीरिक हालचाल जवळजवळ नाहीशी झाली आहे. त्यामुळे मुलांवर ‘अभ्यासात लक्ष न लागणे, आळस वाढणे’, यांसारखे दुष्परिणाम होतांना दिसतात.

सौ. अक्षता रेडकर

३. मुलांना भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी संच पहाणे बंद करून ‘खेळ खेळणे अन् व्यायाम करणे’, यांसाठी प्रोत्साहित करणे आवश्यक असणे

लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्यांना ‘मैदानी खेळ खेळणे, पोहणे, सायकल चालवणे’, यांसारखे व्यायामप्रकार करण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मुलांच्या भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी पहाणे या सवयींवर बंधन घालायला हवे. त्यांच्या शारीरिक हालचाली वाढवण्यासाठी घरातील कामांमध्येही त्यांना सहभागी करून घेणे महत्त्वाचे आहे. पालकांनी स्वतःही भ्रमणभाषचा अतिरिक्त वापर टाळावा आणि मुलांसमोर स्वतःचे आदर्श उदाहरण निर्माण करावे.’

– सौ. अक्षता रूपेश रेडकर (भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट)), फोंडा, गोवा. (१३.४.२०२५

🪷 या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा 🪷