हल्ली पालटलेल्या जीवनशैलीमुळे विविध प्रकारचे आजारही अधिक प्रमाणात वाढले आहेत. काही वेळा हे आजार अधिक कालावधीसाठी राहून नंतर ते गंभीर स्वरूप धारण करतात. विविध प्रकारच्या त्रासदायक आजारांवर आधुनिक वैद्यकीय उपचार करणे, हे महागडे तर असतेच, तसेच त्यामुळे रोग बरा होईल, याचीही निश्चिती नसते किंवा काही कालावधीने तो आजार परत डोके वर काढतो. या सर्वांचा मानसिक त्रास होतो, तो वेगळाच. नियमित आणि योग्य पद्धतीने केलेल्या योगाभ्यासाने आजाराच्या मुळाशी असलेले कारण दूर करण्याचा प्रयत्न होतो. काही वेळा आजार मुळासकट बरा होतो किंवा अगदी सुसह्य होतो. योगाभ्यासासह केलेल्या योग्य आहार-विहाराने आजाराच्या अनुषंगाने आलेले अन्य आजारही बरे होतात, तसेच शरीरशुद्धीला साहाय्य झाल्याने परत रोग उद्भवू नये, या दृष्टीने लाभ होतो. येथे काही आजारांवरील उपाययोजनात्मक आहार-विहाराचे नियम आणि योगाभ्यास दिला आहे.
(या पानावरील सर्व लिखाण सौ. वैदेही कुलकर्णी, योगशिक्षिका, मेडिकल योग थेरपिस्ट, न्युरोथेरपिस्ट, पुणे यांचे आहे.)

तीव्र पाठदुखी

(पाठीच्या खालच्या भागात स्नायू आणि हाडे यांमध्ये १२ आठवड्यांपेक्षा अधिक काळ तीव्र वेदना असणे)
कारणे
१. (पाठीवर अतिरिक्त वजन दिले की पाठ दुखते. २ मणक्यांमधील स्प्रिंगप्रमाणे काम करणारी गादी (‘इंटर व्हर्टिब्रल डिस्क’) पुढच्या बाजूला दाबली जाते. त्यामुळे पाठीच्या कण्यावर (‘स्पायनल कॉर्ड’वर) दाब येतो. त्यामुळे पाय दुखणे, ‘सायटिका’ आदी आजार होतात.)
२. संगणकावर काम करतांना जर मान एका मिनिटात ६० ते ७० वेळा खाली-वर करावी लागली, तर असे सतत केल्याने मानेचे मणके खराब होऊ शकतात.
घ्यावयाची काळजी आणि उपाय
१. जड बॅगा पाठीवर घेऊ नयेत.
२. एका जागी अधिक वेळ बसणार्यांनी प्रतिघंट्याने ५ मिनिटे उठून चालावे. (त्यामुळे २ मणक्यांमधील चकतीला रक्तपुरवठा सुरळीत होतो.)
३. संगणकाच्या पडद्याची उंची डोळ्याच्या उंचीपर्यंत येईल, अशा पद्धतीने रचना करावी.
४. सेतुबंधासन (१० ते २० वेळा)
५. मर्कटासन (१५ ते २० वेळा)
६. भुजंगासन (१० वेळा)
७. अर्ध भुजंगासन (१० वेळा)
८. पवनमुक्तासन (१० ते २० वेळा)
९. मार्जरासन (१० ते १५ वेळा)
१०. उष्ट्रासन (१० वेळा)
११. मत्स्यासन (१० वेळा)
१२. उर्ध्व सुखासन (झोपून भिंतीला पाय लावावे. कंबर भिंतीच्या कडेपर्यंत येईल, असे बघावे. भिंतीला लागून सावकाश मांडी घालावी. मांडीखाली भिंतीला चिकटून उशी ठेवावी.) (२० मिनिटे)
१३. वाकतांना पाठीवर ताण येणार नाही, याची काळजी घ्यावी.
काय टाळावे ?
१. नौकासन, क्रंचेस (पोटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी केले जाणारे व्यायाम), धनुरासन, पाठीवर झोपून ‘सायकलिंग’ (पाय सायकल चालवल्याप्रमाणे फिरवणे) टाळावे.
२. जास्त पुढे वाकू नये.
‘व्हेरिकोज व्हेन्स’

(पायामधील वाढलेल्या, फुगलेल्या किंवा वळलेल्या शिरा)
कारण
शिरांतील झडपांमधील ‘कोलॅजन’ या प्रथिनाचे प्रमाण अल्प झाल्याने त्या अशक्त होतात. त्यातील रक्तप्रवाह गुरुत्वाकर्षणामुळे खाली होतो. अशुद्ध रक्त वाहिन्यांमध्ये साठते.
लक्षण
या आजारामुळे पायदुखीची समस्या होते.
उपाय
१. धूम्रपान टाळणे
२. खाण्यावर निर्बंध घालणे
३. मध्ये मध्ये बसून काम करणे
४. प्रतिदिन ४५ मिनिटे चालणे (जमले तर पाण्यात चालणे किंवा अर्धा घंटा पाण्यात पाय बुडवून ठेवणे)
५. खिडकीच्या खाली गोल लाकडी वीट ठेवावी आणि खिडकीला पकडून त्यावर उभे राहून पायाने खाली घसरत रहावे. (१० मिनिटे)
६. झोपून ‘सायकलिंग’ (पाय सायकल चालवल्याप्रमाणे फिरवणे) करणे (२० मिनिटे)
७. विपरीत करणी (पाय भिंतीला लावून आणि कंबर भिंतीला चिकटवून भिंतीजवळ झोपणे) (२० मिनिटे) (चित्र बाजूला दिले आहे.)
विपरीत करणी

‘ज्यामध्ये सुख आणि स्थिरता आहे त्याला आसन म्हणतात’, अशी पतंजलि यांनी आसनाची व्याख्या केली आहे. (‘स्थिरसुखमासनम् ।’ – पातंजल योगसूत्र २.४६). आसनात जागृतावस्था आवश्यक आहे. त्यामुळे झोपण्याच्या स्थितीस आसन म्हणता येणार नाही.
आसनाच्या अभ्यासाने शरीराचे सर्व मल, दोषविकार दूर होतात. स्नायू सक्षम होऊन शरीर, मन आणि बुद्धी यांची समरसता, स्थिरता साध्य होते आणि त्याच्यासहच चित्ताची वृत्तीरहित अशी अवस्था होते. आसनांनी शरीराची स्थिरता आल्यावर मनाची पण स्थिरता येते. शरीरातील कार्य (उदा. रक्ताची गती, हृदयाचे ठोके, इत्यादी.) सुचारूरूपाने (व्यवस्थित) होते.
‘स्लिप डिस्क’
(मणक्यातील मऊ चकतीचे स्थान सरकणे)

आजाराची पार्श्वभूमी
पाठीचा कणा हा २६ हाडांनी बनलेला आहे. त्यांना मऊ चकत्यांनी (‘डिस्क’ किंवा ‘न्यूक्लियस पलपोसेस’) आवरण घातले आहे. यामुळे चालणे, धावणे, उचलणे यांसारख्या दैनंदिन कामांमधील धक्के स्वीकारून चकत्या मणक्याचे रक्षण करतात, तसेच वळायला साहाय्य करतात. अपघात होणे, मार लागणे आदींमुळे मणक्याच्या बाहेरच्या कठीण भागाला दुखापत झाल्याने या चकत्या मणक्याच्या कठीण भागातून (‘एन्युलस फायब्रोसिस’मधून) बाहेर येतात, त्याला ‘स्लिप डिस्क’ म्हणतात.
लक्षणे
चकतीचा बाहेर पडलेला भाग नसांवर दाबला गेला, तर तीव्र पाठ किंवा पाय दुखी, अशक्तपणा, सुन्नपणा, मुंग्या येणे
उपाय
१. रक्तातून पोषक घटक मिळतील, असा आहार घ्यावा.
२. जेवणानंतर वज्रासनात बसणे
३. स्पाँडिलायटिससाठी असणारी सर्व आसने करणे (नियमित आसने करतांना पाठीचा कणा खालून वरून ओढला जातो, ताणला जातो. त्यामुळे हाललेल्या भागाला तिला योग्य ती जागा मिळते आणि त्याला रक्तपुरवठाही चांगला झाल्याने पोषक तत्त्वे मिळतात. हाललेली चकती पुन्हा आहे तशी होण्यासाठी नियमित आणि काळजीपूर्वक आसने करावी लागतात. वर्षभरामध्ये ती जागेवर येऊन शस्त्रक्रिया टाळली जाऊ शकते.)
४. मत्स्यासन (१० वेळा)
५. सेतुबंधासन (१० वेळा)
६. अर्ध भुजंगासन (१० वेळा)
घ्यावयाची काळजी
१. जेवणानंतर लगेच झोपणे टाळावे.
२. स्पाँडिलायटिससाठी घेण्यात येणारी सर्व काळजी घ्यावी.
‘स्पाँडिलायटिस’ (मणक्याला सूज येणे)

आजाराची पार्श्वभूमी
अनेक महिन्यांपासून असलेले पाठीचे जुने दुखणे, सकाळी उठल्यावर जाणवणारा लवचिकतेचा अभाव (‘मॉर्निंग स्टीफनेस’), व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यांमुळे स्पाँडिलायटिस होतो. (यात शरिरातील मज्जासंस्थेला ताण देणारी यंत्रणा (‘सिंफेथेटिक नर्व्हस सिस्टिम’) क्रियाशील होते आणि ‘सायटोकिन्स’ नावाचे ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) शरिरात सोडले जातात.)
लक्षणे
या आजारामध्ये मणक्याला किंवा पाठीच्या कण्याला जळजळ होते. यात वेदना नेहमी मान, खांदा आणि पाठीच्या खालच्या भागात होतात.
आसनांमुळे होणारे लाभ
आसनांमुळे मज्जासंस्थेवर (‘नर्व्हस सिस्टीम’वर) योग्य तो ताण येतो. पाठीच्या कण्याला धरून ठेवणार्या स्नायूंमध्ये लवचिकता येऊन रक्तपुरवठा वाढतो. नियमित आसने केल्याने सूज किंवा वेदना न्यून होत जातात.
उपाय
१. चालतांना पावले सरळ टाकली जात नसतील, तर ती सरळ टाकून चालण्याची सवय करावी. उभे रहातांनाही पावले सरळ ठेवून उभे रहावे.
२. ‘ड’ जीवनसत्त्व असणारे पदार्थ खाणे (कारण त्याची कमतरता हे याचे मुख्य कारण आहे.)
३. अनुलोम-विलोम क्रिया (१५ मिनिटे)
४. एखादी वस्तू किंवा बिंदू किंवा श्वास यांवर लक्ष केंद्रित करणे किंवा देवावर मन केंद्रित करून ध्यानधारणा करणे (१० मिनिटे)
५. भुजंगासन (१५ वेळा)
६. मत्स्यासन (१० वेळा)
७. सेतुबंधासन (१० वेळा)
८. अर्ध भुजंगासन (१० वेळा)
९. पवनमुक्तासन (१० वेळा)
१०. उष्ट्रासन (१० वेळा)
११. सर्व आसने झाल्यानंतर झोपावे. कंबर भिंतीला लावावी आणि मांडी घालून मांडी भिंतीवर चढवावी. आवश्यकतेनुसार कंबर उंच जाण्यासाठी कमरेखाली भिंतीलगत एक उशी ठेवावी. (१५ मिनिटे)
१२. पाठीच्या कण्यामध्ये सूज आली असेल, तर बर्फाचा शेक द्यावा.
काय टाळाल ?
१. नौकासन, क्रंचेस, धनुरासन.
२. पावले ‘व्ही’ आकारात येतील, असे पुष्कळ वेळ उभे राहू नये.
‘थायरॉईड’ (‘थायरॉईड’ ग्रंथीची कार्यक्षमता न्यून होऊन विविध आजार होणे)

विकाराची पार्श्वभूमी
‘थायरॉईड’ या विकारात या ग्रंथीची कार्यक्षमता न्यून होते, म्हणजे ही ग्रंथी चयापचय (खाल्लेल्या अन्नाचे रक्तात रूपांतर करण्याची प्रक्रिया) करण्यासाठी ‘टी ३’ आणि ‘टी ४’ हे आवश्यक तेवढे हार्माेन्स बनवत नाही किंवा त्याची गुणवत्ता अल्प असते. ‘टी ४’च्या न्यूनतेमुळे अन्नपचन नीट न झाल्याने ‘अमिनो असिड’ निर्माण होत नाही. त्यामुळेही ग्रंथीचे कार्य अल्प होऊन हा विकार होतो.
रात्री साडेबाराच्या सुमारास झोपेत कार्यरत होणारी ‘पिट्युटरी’ नावाची ग्रंथी जागरणामुळे कार्यरत न झाल्याने ‘टी.एस्.एच्.’ वाढते आणि थायरॉईड ग्रंथीला अधिक काम करण्याचा संदेश देते. ग्रंथीने अधिक काम केल्याने ‘हायपो थायरॉईड’ होतो.
लक्षणे
१. प्रौढांमध्ये ‘हायपर थायरॉईड’मुळे थकवा येणे, वजन वाढणे, पोट साफ न होणे, त्वचा कोरडी होणे, ताणतणाव अशी लक्षणे दिसतात.
२. स्त्रियांना मासिक पाळी जाण्याच्या काळात हा आजार होण्याची शक्यता असते. या आजारात ग्रंथी अधिक कार्यरत झाल्याने वजन न्यून होणे, स्नायू कमकुवत होणे, हृदयाची गती वाढणे, केस गळणे, अधिक घाम येणे ही लक्षणे दिसतात. या वयात स्त्रियांचे वजनही वाढते. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम रक्तदाब वाढणे आणि त्याचा परिणाम हृदयाचा झटका येणे यावर होतो.
उपाय
१. पचन चांगले होईल आणि वजन वाढणार नाही, याची काळजी घ्यावी.
२. उज्जयी प्राणायाम (४० ते ५० वेळा)
३. मानेचे व्यायाम (५ ते १० वेळा)
४. कपालभाती (५०० ते ६०० वेळा)
५. हलासन (५ वेळा)
६. सर्वांगासन (५ वेळा)
७. मत्स्यासन (१० ते २० वेळा)
८. सिंहासन (५ ते १० वेळा)
९. सुप्त वज्रासन (५ ते १० वेळा)
१०. विपरीत करणी (१५ मिनिटे) (झोपून कमरेखाली उशी ठेवा. पायाजवळ खुर्ची ठेवून त्यावर पाय ठेवा. डोळ्यांवर जड टॉवेल किंवा पलंगपोस ठेवा. यामुळे पिट्युटरी ग्रंथी कार्यरत होते.)
काय टाळाल ?
१. रात्रीचे जागरण टाळावे.
२. ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर, सोयाबीन, पालक, शेंगदाणे, जवस, बाजरी, साबुदाणा, मोहरीची हिरवी भाजी यांचे सलगपणे किंवा अतीसेवन न करणे (कारण त्या शरिरामध्ये थायरॉईडसाठी आवश्यक असणारे आयोडीन जाऊ देत नाहीत.)
गुडघेदुखी

‘कार्टिलेज’ (शरिरातील विविध भागांना जोडणारा लवचिक; पण मजबूत भाग) किती खराब झाले आहे, यावर योगाभ्यासाने गुडघेदुखी बरे होणे अवलंबून आहे. ‘कार्टिलेज’ अल्प प्रमाणात खराब झाले असेल, तर योगाभ्यासाने गुडघेदुखीवर लाभ होतो. त्यामुळे गुडघेदुखीच्या आरंभीच्या काळातच गांभीर्याने योगाभ्यास केला, तर त्याचा लाभ होईल.
शस्त्रक्रियेने गुडघ्यात कृत्रिम चकत्या (‘डिस्क’) बसवल्या, तरी सर्वांनाच त्याचा लाभ होतो असे नाही.
उपाय
१. जी घरगुती कामे खाली बसून करणे शक्य आहे, ती आवर्जून खाली बसून करणे; उदा. भाजी चिरणे इ., तसेच खाली बसून जेवणे
२. प्रति २० मिनिटांनी ३ घोट पाणी हळूवारपणे बसून प्यावे. (उभ्याने पाणी पिऊन पटकन निघून जातांना पायाकडे रक्तपुरवठा अधिक अल्प होतो. गुडघेदुखीमुळे स्नायूंमध्ये आधीच ताकद अल्प असते. असे पुन्हा पुन्हा झाल्याने काही काळाने पायांचे स्नायू अशक्त होऊन पुढे गुडघेदुखी वाढते.) वरील कृतीमुळे ‘डिहायड्रेशन’ (शरिरातील पाणी अल्प होणे) होण्यापासूनही रक्षण होते. ‘डिहायड्रेशन’मुळे गुडघ्यातील चलनवलनासाठी आवश्यक असणारे द्रव सुकल्याने कोरडेपणा येऊन तिथे घर्षण होते.
३. टेबल-खुर्चीवर जास्त वेळ बसून काम करणार्यांनी प्रतिघंट्याला खुर्चीवरून उठून ५ ते ७ मिनिटे चालावे. खुर्चीवर बसलेले असतांना मधून मधून पाय हालवत रहावे. पाय लोंबकळत न ठेवता पायाखाली काही आधार घ्यावा.
४. उंच टाचेची पादत्राणे घालू नयेत.
५. गुडघ्याला तेलाचा मसाज करणे (आठवड्यातून २ वेळा रात्री १० मिनिटे)
६. रात्री झोपतांना नाभीमध्ये खोबरेल तेल किंवा तीळ तेल सोडून मसाज करणे
७. सकाळी आंघोळ करण्यापूर्वी एरंडेल तेल नाभीत घालून ठेवणे (१५ मिनिटे) (त्यामुळे अन्नपचन चांगले होऊन गुडघेदुखी नियंत्रित होऊ शकते. पचनसंस्थेतील बिघाडामुळे प्रथिने, ‘ड’ जीवनसत्त्व हे अन्नातील घटक शरिराला मिळण्याऐवजी शरिराच्या बाहेर टाकले जातात. आवश्यक ते घटक शरिराला न मिळाल्यामुळे व्यवस्थित द्रव (‘फ्लूईड’) बनत नाही. त्यामुळे गुडघ्याला धरून ठेवणारे स्नायू अशक्त होतात.)
८. जेवणापूर्वी अर्धा घंटा आधी पाणी पिऊ नये आणि जेवणानंतर ४० मिनिटांनी पाणी प्यावे. (त्यामुळे जठरातील अग्नी योग्य पद्धतीने प्रज्वलित होऊन अन्नपचन नीट होते.)
९. जेवण झाल्यानंतर वज्रासनात बसावे (२० मिनिटे) (यामुळे रक्तप्रवाह पचनसंस्थेकडे अधिक प्रमाणात जाऊन ६ घंट्यांचे पचन ३ घंट्यांत होते, तसेच प्रथिने (प्रोटिन्स), जीवनसत्त्व (व्हिटामिन्स) शरिराच्या बाहेर टाकले जात नाहीत.) वज्रासनातून बाहेर येतांना २ हात पुढे फरशीवर ठेवावेत आणि एकेक पाय मागे सरळ करून मग वज्रासनातून बाहेर यावे.
१०. पाण्यामध्ये चालणे (१ ते दीड घंटा) (पाण्यात गुडघ्याचे वजन रहात नाही. स्नायूंचा रक्तपुरवठा वाढतो, त्यांना पोषकद्रव्य अधिक मिळून ते मजबूत होतात. त्यामुळे ४ मासांत काठी सुटू शकते.)
११. योगाभ्यासात केल्या जाणार्या ‘वमन’ (मिठाचे कोमट पाणी पिऊन विशिष्ट पद्धतीने ते बाहेर काढणे) या शुद्धीक्रियेमुळे वात-पित्त-कफ बाहेर पडून गेल्याने गुडघेदुखीवर नियंत्रण मिळवता येते.
१२. विविध प्रकारचे प्राणायाम करणे
१३. पचनसंस्था सुधारण्यासाठी ‘जठर परिवर्तन’ (जठराचे व्यायाम) करणे
१४. स्नायूंच्या लवचिकतेसाठी पायाला ताण येणारे व्यायाम करणे
| योग ही शरीर, मन आणि आत्मा यांची एकात्मता आहे. योग म्हणजे केवळ आसने नव्हे, तर जीवनशैली आहे. श्वासावर नियंत्रण ठेवणे म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणे. |
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !