‘हिस स्टोरी ऑफ इतिहास’ नावाचा अभिनेते सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेला हिंदी चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अतिशय सुंदर असा हा चित्रपट सर्वांनी आणि त्यातही ‘पालकांनी मुलांसह पहावा’, असा आहे. अशा चित्रपटांकडे न फिरकणार्या ‘यात काय आणि त्यात काय’, अशा समजुती दृढ झालेल्या ‘कॉलेजकुमारां’नी (महाविद्यालयाच्या युवकांनी) तर हा चित्रपट आवर्जून पहावा.

१. ‘हिंदु असणे’ म्हणजे काय ?
भारतीय इतिहासाविषयी अनभिज्ञ असलेल्यांमध्ये सर्व प्रकारचे लोक असतात. अर्धवट शिकलेले आणि काही कारणांमुळे विशेष ‘एक्सपोजर’ न मिळालेले त्यात असणे, तर साहजिकच आहे; मात्र सुशिक्षित म्हणवणार्यांपैकीही अनेक जण त्यात असतात. मागचे, म्हणजे इतिहासातले काढून काय करायचे ? हा त्यांचा अगदी सामान्य प्रश्न असतो. तसे करू पहाणारे (खरा इतिहास मांडू पहाणारे) सामान्यत: त्यांच्या टीकेचे लक्ष्य होत असतात.
हिंदु असणे, हे केवळ हिंदु धर्मातील पूजा-अर्चा एवढ्यापुरते नसून येथील भूमीमध्ये गेल्या सहस्रो वर्षांमध्ये जी ज्ञाननिर्मिती झाली, तिचा वारसा सांगणे हेही ‘हिंदु असणे’च आहे, याची भल्याभल्यांना जाणीव नसते. त्यामुळेच ‘संस्कृत शिकून पोथ्या वाचायच्या का ? मंत्र म्हणायचे का ?’, असे म्हणत त्यास मागास समजणारे सुशिक्षितही समाजात भरपूर आहेत. एखाद्याचे वाढलेले वय पहाता असे मूर्खासारखे समज असलेल्यांचे काय करायचे ?
हा प्रश्न अनेकदा निर्माण होतो. त्यांचे हे मूर्खासारखे समज आणि हिंदु असण्याविषयीची हेटाळणी त्यांनी स्वत: प्रयत्न करून दूर केली नाही, तर ‘ते त्यांच्या मढ्याबरोबरच (मरणाबरोबर) संपणार’, अशी स्थिती असते; मात्र लहान मुलांना या मानसिक गुलामीतून आणि साम्यवादी अन् काँग्रेस यांनी लादलेल्या भयानक विचारविषातून बाहेर काढणे, हे हिंदूंचे आणि स्वत:ला भारतीय समजणार्या प्रत्येकाचे कर्तव्य का आहे ? हे हा चित्रपट पाहून निश्चितपणे कळू शकते. हे चित्रपटाचे मोठे यश आहे.
२. सत्य प्रत्यक्षात वेगळेच !
‘सम्राट अशोकाने हिंसेमुळे व्यथित होऊन बौद्ध धर्म स्वीकारला’, हे विधान वाचायला सरळसाधे वाटते; मात्र ‘कलिंग युद्धापूर्वीच तो बौद्ध झाला होता’, हे कळले की, मग हे सत्य लपवण्यामागचे कारस्थान समजायला वेळ लागत नाही. ‘जोधा-अकबर’ चित्रपटात रहमानच्या कर्णमधुर संगीतावर जोधा आणि अकबर यांना नाचवून झाल्यावर अकबराची जी प्रतिमा उभी केली जाते, तिचे ‘जोधा नावाची त्याची कुणी बायको नव्हतीच’, हे कळल्यावर काय होत असेल ? तीच गोष्ट ‘मुघल-ए-आझम’ या नौटंकीची ! सतीच्या प्रथेवरून हिंदु धर्माची निंदा करण्याच्या धंद्याचेही तेच ! नाझींचे चिन्ह आणि आपले स्वस्तिक यांचेही तेच !
मला आठवते, ॲबरडीन (स्कॉटलंडमधील एक शहर) येथे असतांना मी स्वस्तिकचे चिन्ह चांगल्या पैकी रंगवून माझ्या ‘डेस्क’वर (कामाच्या पटलावर) ठेवले होते. त्यावरून कार्यालयामधील काही जणांनी माझ्याशी वाद घातला होता. त्यांना मी एवढेच सांगितले की, स्वस्तिकचे चिन्ह आमच्याकडे हिटलरच्या जन्माच्या शेकडो-सहस्रो वर्षे आधीपासून आहे, यावरून तुम्ही काय ते समजायला हवे. त्यासंदर्भात सामाजिक माध्यमांवरील माहिती दाखवल्यावर त्यांचे समाधान झाले. या चित्रपटात तर त्याच्याही पुढे जात वास्तव दाखवले आहे.
३. इतिहासातील ‘पण’ समजण्यासाठी चित्रपट पहावा !
खरेतर हा चित्रपट भारतीय इतिहासाच्या संदर्भात तशाच विचित्र समजुती असलेल्या एका प्राध्यापकापासूनच चालू होतो. त्यात तो (चित्रपटाचा नायक) विज्ञान विषयाचा प्राध्यापक; मात्र त्याला वैचारिक धक्के बसण्यास कोणता प्रसंग कारणीभूत होतो ?
त्याच्या पत्नीच्या डोक्यात त्याच्या ‘नसत्या’ धंद्यांविषयी प्रकाश कोणत्या निमित्ताने पडतो ? हे सारे अतिशय सहजतेने आणि प्रभावीपणे दाखवले आहे. कुठेही ठिगळे लावल्यासारखे वाटत नाही. अगदी रोमिला थापर, इरफान हबीब आणि त्याचा बाप ही देशघातकी बदमाश त्रयी अल्प पडली; म्हणून कि काय ? औरंगजेबाचे गोडवे गाणारी ऑड्रे ट्रुष्के ही ऑस्ट्रेलिया-अमेरिका वंशाची बाई, अशांची जी पात्रे चित्रपटात उभी केली आहेत, त्यांच्याविषयी खरे सत्य उघड करून त्यांची पूर्णतः ‘छी-थू’ हा चित्रपट करत नाही. या कारणासाठीही हा चित्रपट पहायला हवा. ‘सब लालही लाल है ।’, हा यातला ‘पण’ चित्रपट पहातांना समजायला हवा.
४. विकृत इतिहास शिकवल्याने झालेले भयानक परिणाम
‘सत्तेत आल्यावर टीका होईल’, या भीतीने पाठ्यपुस्तकांमध्ये पालट करण्याविषयी भाजपच्या माजी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या बोटचेपेपणाचे वास्तवही चित्रपट दाखवतो. इतिहासाचे शिक्षक हे अनेकदा इतिहासतज्ञ नसल्यामुळे आणि त्यांचा तसा प्रयत्न नसल्यामुळे ‘इतिहासाचे पाठ्यपुस्तक’ म्हणून जे पुरवले जाते, ते शिकवणारे ‘निव्वळ पोटार्थी’ असतात. त्यांना ‘निव्वळ पोटार्थी’ अशासाठी म्हणायचे की, स्वतःच्या अज्ञानामुळे किंवा वास्तव ठाऊक असूनही नोकरी जाण्याच्या भयामुळे ‘इतिहासाच्या नावाखाली आपण केवळ खोटा इतिहास शिकवत आहोत’, असे नाही, तर या लहान मुलांना सांस्कृतिकदृष्ट्या नपुंसक बनवत आहोत’, याचे भान त्यांना नसते. हा भाग चित्रपटात अतिशय सफाईने दाखवला आहे.
इतिहासाची जाणीव नसणे, हा एक भाग झाला; मात्र तो विकृत स्वरूपात शिकवला जाणे, काही निवडक बाजू दाखवली जाणे; तीही उदात्तपणे दाखवली जाणे आणि काही खरोखर उदात्त भाग ठरवून पूर्णतः गाळला जाणे किंवा थोडक्यात उरकला जाणे, या सर्वांचे होणारे परिणाम वेगवेगळे असतात, हे भल्याभल्यांच्या लक्षात येत नाही. मुलांचे भावनिक विश्व भ्रष्ट होते, तरुणांना त्यांच्या थोर वारशाचा विसर पडून आणि त्याविषयी तिरस्कार निर्माण होऊन त्यांना भलत्याच मार्गाला लावणे अगदी सहज शक्य होते. अशा सांस्कृतिकदृष्ट्या शेंडा-बुडखा न उरलेल्या प्रजेला तिच्याच देशाविरुद्ध वळवणे पुष्कळ सोपे होते. वेळेच्या मर्यादेमुळे यातील मर्यादित भाग चित्रपटात दाखवता आला आहे.
‘आपल्या मुलीला इतिहासाच्या नावाखाली वाटेल, ते शिकवले जात आहे’, या भावनेने अस्वस्थ होण्यात वडिलांच्या बरोबरीने आईचाही थोडा तरी सहभाग दाखवायला हवा होता. कथानकात तसे न केल्यामुळे मोठी भूमिका असूनही आई बरीचशी शोभेची बाहुली म्हणून रहाते.
असा विषय चित्रपटाच्या सूत्रात बांधणे, हे पुष्कळ कठीण असते. ‘काश्मीर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’, ‘बस्तर’ अशा प्रचारकी नसलेल्या चित्रपटांनाही तसे ‘लेबल’ लावण्याच्या काळात हा विषय तसा ठरवणे पुष्कळ सोपे; मात्र वास्तव दाखवणे आणि ते अगदी सहजपणे दाखवणे, एवढे साधे (खरे तर कठीण) सूत्र या चित्रपटात लीलया सांभाळले आहे.
५. इतिहासाविषयीची डोक्यातील जळमटे काढणारा चित्रपट
सुबोध भावे यांचा हा सर्वोत्तम चित्रपट ठरावा. ‘क्वीन’ या चित्रपटात मुलीच्या वडिलांची भूमिका करणारे योगेंद्र टिक्कू यांची भूमिका सवंग करण्याचा मोह लेखकाने टाळला, यासाठी त्याचे आभार मानायला हवेत. हा चित्रपट पहातांना तुम्हाला हे जाणवले, तर मला मनातल्या मनात अधिक गुण द्या. चित्रपट नीरज अत्री यांच्या ‘ब्रेनवॉश्ड रिपब्लिक’ या पुस्तकावर आधारित आहे. ‘पॉलिटिकली इनकरेक्ट’ या यूट्यूब वाहिनीवरून ते आताही जागृती घडवण्याचा प्रयत्न करत असतात. मनप्रीतसिंग धामी यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तेच निर्माते आहेत. प्रमुख भूमिकेसाठी निर्माता सुबोध भावे यांच्यापर्यत कसा पोचला ? याची चांगली गोष्ट आहे. ‘चित्रपट ज्या पद्धतीने संपवला आहे, ते पहाता पुढचा भाग येण्याची शक्यता आहे’, असे वाटते.
हा चित्रपट अवश्य पहा. सर्व राजकीय पक्षांच्या समर्थकांनी आवर्जून पहावा. डोक्यातील जळमटे काढली जाण्यास निश्चित साहाय्य होईल. शेवटी हे प्रकरण भारताच्या, म्हणजे आपल्या पूर्वजांच्या इतिहासाच्या संदर्भात आहे. मग नंतर आपापल्या आवडत्या राजकीय पक्षाचे समर्थन खुशाल करत रहा. जळमटे गेल्यानंतरचा भेद तुमचा तुम्हालाच जाणवेल आणि माझे, खरेतर या चित्रपटाचे आभार मानाल.
– श्री. राजेश कुलकर्णी (१०.६.२०२५)
अनैतिकतेचा बाजार !
वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !
पब-हॉटेल्स कि मृत्यूचे सापळे ?
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !