‘आधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन सुलभ केले असले, तरी त्यामुळे शरिराची हालचाल न्यून झाली आहे. दिवसभर बसून काम केल्यामुळे निर्माण होणारी ‘बैठी जीवनशैली’ आरोग्याच्या संदर्भात अनेक समस्या निर्माण करते. या समस्या दूर करण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी ‘व्यायाम’ हा सर्वांत प्रभावी उपाय आहे. या लेखमालेत आपण ‘बैठ्या जीवनशैली’चे आपल्या आरोग्यावर होणारे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम, त्याची कारणे अन् दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना’ इत्यादी सूत्रे समजून घेणार आहोत. आपण या लेखात ‘बैठी जीवनशैली, अल्प शारीरिक श्रम आणि तणावयुक्त जीवन’, यांमुळे मधुमेहाचा धोका वाढणे अन् मधुमेह टाळण्यासाठी व्यायाम करण्याची आवश्यकता असणे’, यांविषयी पाहूया.
अलीकडे आरोग्याच्या समस्या वेगाने वाढत आहेत. मधुमेह हा एक गंभीर अन् व्यापक स्वरूपाचा आजार बनत चालला आहे. जगभरात आणि विशेषतः भारतात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पूर्वी वयस्कर लोकांना होणारा मधुमेहाचा आजार आता तरुणांमध्येही आढळू लागला आहे. त्याची मुख्य कारणे, म्हणजे ‘पालटत असलेली जीवनशैली, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव.’

१. ‘बैठी जीवनशैली, अल्प शारीरिक श्रम आणि तणावयुक्त जीवन’, यांमुळे मधुमेहाचा धोका वाढणे
मधुमेह हा केवळ अनुवांशिक आजार नाही, तर तो व्यक्तीच्या चुकीच्या सवयींमुळेही (‘लाईफस्टाईल डिसॉर्डर’मुळेही) वाढतो. सध्या लोक बैठी कामे करत आहेत, अल्प शारीरिक श्रम घेत आहेत आणि तणावयुक्त जीवन जगत आहेत. या बैठ्या जीवनशैलीमुळे शरिरातील ऊर्जेचे प्रमाण वाढत आहे; पण त्या तुलनेत व्यय होणारी ऊर्जा न्यून आहे. परिणामी लठ्ठपणा वाढतो आणि त्यासह मधुमेहाचा धोका वाढतो.
जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो, तेव्हा त्याचे साखरेमध्ये (‘ग्लुकोज’मध्ये) रूपांतर होते. ही साखर ऊर्जेच्या स्वरूपात पेशींमध्ये वापरण्यासाठी इन्सुलिनची आवश्यकता असते. ‘इन्सुलिन हे एक महत्त्वाचे संप्रेरक आहे. ते रक्तातील साखर पेशींमध्ये पोचवण्याचे काम करते; मात्र जीवनशैली सतत बैठी (निष्क्रीय) असेल, तर इन्सुलिनची कार्यक्षमता उणावते. यालाच ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’, असे म्हणतात. या स्थितीत शरीर इन्सुलिन निर्माण करते; पण पेशी त्याला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे साखर रक्तातच रहाते आणि साखरेची पातळी वाढते. याचप्रमाणे लठ्ठपणामुळेही (विशेषतः पोटाजवळील चरबीमुळे) शरिरातील इन्सुलिनची कार्यक्षमता न्यून होते. परिणामी लठ्ठपणा आणि अतिरिक्त चरबी यांमुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. दिवसातील ८ ते १० घंटे बसून रहाणार्या लोकांमध्ये ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ ३० ते ४० टक्के अधिक असतो.

२. नियमित व्यायाम करणे, हे शरिरासाठी अत्यंत महत्त्वाचे असणे; पण लोकांनी व्यायाम करण्याचे टाळणे
‘नियमित व्यायाम करणे’, हे शरिरासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. व्यायामामुळे रक्तातील साखर नियंत्रित रहाते; मात्र सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोकांकडे व्यायामासाठी वेळ नसतो किंवा त्याला प्राधान्य दिले जात नाही. लोकांना दीर्घकाळ बसून काम करण्याची सवय लागते. घरी आल्यावर आरामदायी जीवनशैलीमुळे (उदा. घंटोन्घंटे टीव्ही पहाणे) कामे करण्याचे टाळले जाते. व्यायामासाठी वेळ देण्याऐवजी त्यांच्याकडून ‘आपण व्यस्त आहोत’, असे कारण दिले जाते.
३. व्यायामामुळे रक्तातील साखर नियंत्रित रहाण्यास साहाय्य होणे आणि मधुमेह टाळला जाणे
व्यायामामुळे स्नायूंची शक्ती वाढते आणि शरिरातील साखरेचा योग्य वापर होतो. व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करतांना स्नायूंना अधिक ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा मिळवण्यासाठी ते रक्तातील साखरेचा अधिक चांगला वापर करतात. त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण रहाते. व्यायाम न केल्यास स्नायूंसाठी लागणारी ऊर्जा (साखर) वापरली जात नाही. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. साखर सतत रक्तात राहिल्यास मधुमेहाचा धोका वाढतो. व्यायामामुळे शरिरातील अतिरिक्त चरबी न्यून होऊन लठ्ठपणा नियंत्रित रहातो आणि मधुमेह टाळला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार प्रतिदिन ३० मिनिटे गतीने चालल्यास किंवा मध्यम तीव्रतेचे व्यायाम (टीप) केल्यास मधुमेहाचा धोका ५० टक्क्यांनी उणावतो.
टीप : मध्यम तीव्रतेचे व्यायाम : या व्यायाम प्रकारांनी, उदा. सपाट रस्त्यावर सायकल चालवणे, सावकाश पोहणे, एका मिनिटाला १ सूर्यनमस्कार घालणे इत्यादींनी हृदयाचे ठोके आणि श्वासाचा वेग थोडासा वाढतो.
योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सक्रीय दिनचर्या ठेवली, तर मधुमेह सहज टाळता येण्यासारखा आहे; मात्र यासाठी लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. जीवनशैलीमध्ये थोडे पालट करून आपण मधुमेहाला दूर ठेवू शकतो आणि निरोगी जीवन जगू शकतो.’
– सौ. अक्षता रूपेश रेडकर (भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट)), फोंडा, गोवा. (१३.४.२०२५)
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?