संपादकीय : वारीत पुरोगाम्यांची भोंदूगिरी !

आषाढी एकादशीच्या निमित्ताने निघालेल्या पंढरपूर वारीमध्ये अंनिसवाले, पुरोगामी आणि साम्यवादी मंडळी सहभागी झाली आहेत. ‘संविधान समता दिंडी’ या नावाने ही मंडळी म्हणे वारकर्‍यांमध्ये राज्यघटनेविषयी जागृती करणार आहेत. विशेष म्हणजे नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असलेली काही मंडळीही या चळवळीत सहभागी झाली आहेत आणि अशी मंडळी वारकर्‍यांना राज्यघटनेचे ज्ञानामृत पाजायला निघाली आहेत. यांच्या नादाला प्रसिद्धीसाठी हपापलेले आणि स्वत:ला समाजसुधारक म्हणवून घेणारे कथित वारकरी लागले आहेत. ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद वदवले, संत ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली, संत तुकाराम महाराज यांचे अभंग इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगले किंवा संत तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठगमन या घटना काल्पनिक, भ्रामक आहेत’, असे सांगण्यात ज्या मंडळींनी आयुष्य घालवले ती त्याच संतांच्या पालख्यांमध्ये सहभागी होत आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज किंवा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जीवनकाळात त्यांची निंदानालस्ती करणारे या संतांचे श्रेष्ठत्व त्यांना समजल्यावर ते त्यांचे सेवक झाले. यावरून ‘वारीमध्ये सहभागी झालेले अंनिसवाले, पुरोगामी किंवा साम्यवादी हेही भक्तीमार्गाला लागले’, असा अपसमज कुणी करून घेऊ नये; याचे कारण ही मंडळी भक्तीमार्गाला लागलेली नाहीत, तर वारीत स्वत:चा राष्ट्रघातकी ‘अजेंडा’ राबवण्यासाठी आली आहेत. त्यामुळे या मंडळींपासून वारकर्‍यांनी सावध रहायलाच हवे.

‘संविधान समता दिंडी’त सहभागींचे खरे स्वरूप !

जेव्हा या मंडळींनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काम चालू केले, तेव्हा ते ‘महाराष्ट्र मानवी नास्तिक मंच’ या नावाने काम करत होते. यांना कुणीही धूप घातला नाही; म्हणून आता वारीमध्येच वारकर्‍यांचा वेष धारण करून या मंडळींना हाती राज्यघटना घेण्याची वेळ आली आहे. ‘अंनिस’ या नावाने वारीत शिरले, तर लोक जोड्याने मारतील; पुन्हा समाजात जाऊन ‘चमत्कार वगैरे खोटे असते’, हे कोणत्या तोंडाने सांगणार ? त्यामुळे ‘संविधान समता दिंडी’ हे गोंडस नाव सोयीनुसार वापरले आहे. यात काही नवीन नाही. आतापर्यंत राज्यघटनेला पुढे करून या मंडळींनी नक्षलवाद्यांविषयी कळवळा दाखवणारे, धर्मांध मुसलमान यांच्याविषयीही मानवतावाद दाखवून स्वत:ची पोळी भाजली आहे; परंतु हा कळवळा त्यांनी हिंदु सोडून सर्वांना दाखवला आहे. सांगायचे सूत्र म्हणजे राज्यघटनेचे नाव पुढे करून लोकशाहीसाठी घातक आणि हिंदु धर्माविरोधातच यांनी काम केले आहे. ‘संविधान समता दिंडी’त सहभागी असणार्‍या शीतल साठे यांच्यावर काही वर्षांपूर्वी नक्षलवादी कारवायांमध्ये कार्यरत असल्याच्या कारणामुळे ‘बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा’ (यूएपीए)’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. शीतल साठे यांचे पती सचिन माळी यांच्यावरही गुन्हा नोंदवला होता. हे या मंडळींचे खरे स्वरूप आहे.

आताही भारतातच नव्हे, जगभरात हिंसाचार करण्यात पुढे असलेल्या धर्मांध मुसलमानांना किंवा नक्षलवादी कारवाया करणार्‍यांना राज्यघटना शिकवण्याचे सोडून या मंडळींनी हिंदूंनाच राज्यघटना शिकवायला निघणे, हेच आश्चर्यकारक आहे; परंतु तसे करण्याचे धारिष्ट्य यांच्यात नाही. याचे कारण हे आहे की, यांना राज्यघटना, लोकशाही यांविषयी काडीचीही श्रद्धा नाही. उलट शहरी नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असलेली चांडाळ चौकडी वारीत शिरली आहे. अशा लोकांविषयी संत तुकाराम महाराज म्हणतात ‘ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनी म्हणती साधू ।। अंगा लावोनिया राख । डोळे झाकोनी करती पाप ।। तुका म्हणे सांगो किती । जळो तयाची संगती ।।’ राज्यघटनेविषयी जागृती सरकारही करत आहे; परंतु यासाठी महाराष्ट्र शासनाने वारीमध्ये न येता समाज, शाळा, महाविद्यालये यांमध्ये विविध उपक्रम राबवले आहेत. भारतीय राज्यघटनेची निर्मिती भारताच्या स्वातंत्र्यानंतर झाली; परंतु वारीला अनेक शतकांची परंपरा आहे. अनेक शतकांच्या परंपरेत कधीही हिंसाचार झाला, कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या किंवा अन्य धर्मियांवर टीका केली, असे झालेले नाही. मग ही मंडळी वारीत राज्यघटनेविषयी जागृती करण्याचे उपद्व्याप का करत आहेत ? याचे कारण स्पष्ट आहे की, राज्यघटनेच्या आडून या मंडळींचे स्वत:चाच अजेंडा चालवण्यासाठीचे हे षड्यंत्र आहे.

वारकर्‍यांनी भूमिका घेण्याची आवश्यकता !

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीचे सरकार असतांना वर्ष २००४ पासून हिंदुविरोधी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणण्यासाठी प्रयत्न केला. या कायद्याचे विधेयक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सहकार्याने काँग्रेसने सिद्ध केले. या विधेयकामध्ये ‘शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या बाधा येऊन धार्मिक कृत्य केले, तर त्याला अंधश्रद्धा म्हणावे’, हे कलम होते. वारीला जाणारे वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात. त्यासाठी त्यांना शारीरिक कष्ट तर होतातच. या कायद्याच्या आडून वारीच्या या परंपरेलाच नष्ट करण्यासाठी अंनिसवाल्यांनी प्रयत्न केला होता; मात्र त्या वेळी वारकर्‍यांनी छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे हे कलम या कायद्यातून वगळावे लागले. केवळ हे एकच कलम नव्हे, तर या विधेयकातील २७ कलमांपैकी १३ कलमे हिंदुविरोधी असल्यामुळे सरकारला वगळावी लागली होती. हा या अंनिसचा आणि पुरोगामी मंडळींचा हिंदुविरोधी चेहरा आहे. या कायद्यामध्ये ‘मूर्तीच्या पुढे बळी दिल्यास तो गुन्हा ठरेल’, असेही कलम होते. यामध्ये वरकरणी वाटते की, अंनिसचा बळी देण्याला विरोध आहे; परंतु बळी मूर्तीपुढे दिला, तरच गुन्हा असे स्पष्टपणे म्हटले होते. बकरी ईदच्या दिवशी लाखो बकर्‍यांचे बळी दिले जातात, याला या मंडळींनी कधीही आक्षेप घेतला नाही.

एखादे वाया गेलेले पोर चांगल्या मार्गाला लागले, तर पालकांना समाधान वाटते. स्वत:च्या चुकीची जाणीव होऊन पश्चाताप झाला की, व्यक्ती सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. रामायणामध्ये नारदमुनींच्या मार्गदर्शनामुळे वाल्या कोळ्याचा वाल्मीकि ऋषि झाल्याचे मोठे उदाहरण पहायला मिळते. संत ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद वदवले होते; परंतु ही मंडळी त्याही पात्रतेची नाहीत. संत तुकाराम महाराजांची कठोर वचने पाहिली, तर अशा भोंदूंचा उच्छाद काय असेल, याची कल्पना येते. यांना ‘भोंदू’ म्हणणे, हाही उपहास ठरेल. भोंदू केवळ पैसा आणि प्रसिद्धी यांसाठी कार्यरत असतात; परंतु अंनिसवाले अन् त्यांचे पुरोगामी सहकारी हिंदूंचे श्रद्धाभंजन करून हिंदुविरोधी विचारसरणी पसरवत धर्म बुडवण्याचे काम करत आहेत. वारीत शिरणार्‍या या मंडळींना वारकर्‍यांनी हेरून त्यांना ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास । कठीण वज्रास भेदूं ऐसे । भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ।’, ही भूमिका दाखवावीच लागेल.

वारीत शिरलेल्या भोंदू पुरोगाम्यांना हद्दपार करा !