भारताने मे २०२५ मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. भारतीय वायूसेनेने पाकिस्तानी ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर्स’वर केलेल्या ‘को-ऑर्डिनेटेड हायप्रिसिशन’ (समन्वय करून उच्च अचूकतेने केलेल्या) आक्रमणांनी पाकच्या सैनिकी इमारती तर पाडल्याच, याखेरीज त्यांच्या कक्षेमध्ये येणारी प्रत्येक वस्तू, साहित्य, सैनिक इत्यादी पूर्णतः नष्ट केले. भारताने युद्धाचे सर्व तंत्रच एकदम पालटले. २२ एप्रिल २०२५ या दिवशी पहलगाममध्ये इस्लामी आतंकवाद्यांनी धर्म विचारून केलेल्या २६ निष्पाप हिंदूंच्या निर्घृण कत्तलीचा तो केवळ सूड नव्हता, तर त्याच्याही फार पलीकडील काहीतरी होते. केवळ ८८ घंट्यांमध्ये घडवलेल्या आधुनिक राजकीय आणि सामरिक इतिहासाचा आढावा घेऊया. उपग्रहाद्वारे काढलेली छायाचित्रे प्रकाशित होण्याची प्रक्रिया चालू असल्याने आतापर्यंत त्या घटनेचे इतके सविस्तर विश्लेषण कुणी केलेले नव्हते. जागतिक सैनिकी इतिहासातील अद्वितीय घटना, म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर – मे २०२५’मध्ये भारतीय वायूसेनेच्या ‘को-ऑर्डिनेटेड हायप्रिसिशन’ आक्रमणांनी पाकिस्तानी ‘एअर डिफेन्स सिस्टम’ (हवाई संरक्षण यंत्रणा) नष्ट झाली. त्यामुळे जगातील अनेक देशांना जबरदस्त हादरेही बसले. असे काय घडले होते ?
१८ आणि १९ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखांत ‘भारतीय राजकीय नेतृत्वाकडून सैन्याला स्वायत्तता, भारतीय सैन्याने आक्रमणाचे अचूकतेने केलेले नियोजन आणि ‘भारतीय वायूसेनेने पाकच्या उद्ध्वस्त केलेल्या ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर्स’ची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/925169.html
५. ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची क्षमता

अ. वजन : ३००० किलोग्रॅम
आ. लांबी : ८.४ मीटर्स
इ. व्यास : ०.६ मीटर्स
ई. वॉरहेड : २००-३०० किलोग्रॅम
उ. पल्ला : ८०० ते ९०० किलोमीटर्स
ऊ. वेग : आवाजाच्या वेगाच्या तिप्पट (Mach 3.0)
ए. प्रोपेलंट : प्रथम स्टेज : घन इंधन (Solid fuel), द्वितीय स्टेज : द्रव इंधन (Liquid fuel)
ऐ. गाईडन्स : ‘आय.एन्.एस्.’ आणि ‘सॅटेलाईट नॅव्हिगेशन’
ओ. अधिकतम उंची : १५ किलोमीटर्स.

६. उपग्रह छायाचित्रांवरून निघालेले निष्कर्ष
पाकिस्तानने घाईघाईने दुरुस्ती करण्याचा केलेला प्रयत्न आंतरराष्ट्रीय उपग्रह छायाचित्रांतून स्पष्ट दिसतो. तळावरील अन्य हानी, वक्र झालेले अवशेष आणि नादुरुस्त पडक्या हँगर्सचे दरवाजे इत्यादी व्यवस्थित दिसत आहेत. पाकिस्तान ते सर्व अनेक महिन्यांमध्ये दुरुस्त करू शकेल; परंतु त्याच्या सैन्याचा ढासळलेला आत्मविश्वास, कधी आणि कसा परत मिळेल ? हे कुणालाही कळत नाही. आपली महत्त्वाची युद्धसाधने भूमीखाली खोलात ‘हार्डंड शेल्टर्ड-बंकर्स’मध्ये दडवून ठेवण्याच्या पाकिस्तानच्या कौशल्यपूर्वक आखलेल्या रणनीतीचा दुर्दैवाने आणि भारतीय वायूसेनेच्या ‘को-ऑर्डिनेटेड हायप्रिसिशन’ (समन्वय करून उच्च अचूकतेने) आक्रमणांनी धुव्वा उडवला. ‘मॅक्सार टेक्नाॅलॉजिस’(MAXAR Technologies) नावाच्या अमेरिकेच्या आस्थापनाकडून आलेल्या उपग्रह छायाचित्रांवरून वरील निष्कर्ष निघालेले आहेत. ‘मॅक्सार टेक्नॉलॉजिस’च्या माहितीतून भारतीय ‘को-ऑर्डिनेटेड हायप्रिसिशन’ आक्रमणांनी पाकिस्तानी ११ सैनिकी तळांवरील केलेली प्रचंड हानी, विशेषतः सरगोधा आणि जॅकोबाबाद येथील अतीव हानी अद्वितीय असल्याचे सिद्ध होते. आंतरराष्ट्रीय निष्कर्ष पुढे असेही लिहितात, ‘भारताने नष्ट केलेल्या वरील सैनिकी पद्धत आणि प्रणाली परत उभ्या करण्यास आंतरराष्ट्रीय साहाय्य मिळाले, तरी पाकिस्तानला किमान एक वर्ष लागेल.’
७. भारतीय वायूसेनेने पाकच्या वायूसेनेचा केलेला अधिकतम विनाश
उपग्रह-विश्लेषण नुकतीच बनवलेली एक व्यवस्था दर्शवते, ते म्हणजे इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ वर्ष २०२४-२५ मध्ये सिद्ध केलेले ‘एअर डिफेन्स कमांड अँड कंट्रोल सेंटर्स’. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात पाकिस्तानी सेनाध्यक्ष तेथेच बसले होते. बांधकाम पूर्ण होऊन हे केंद्र मार्च २०२५ मध्ये कार्यरत (ऑपरेशनल) झाले. त्यावरून दिसते की, पहलगामसारखे दुष्कृत्य करून भारताशी मोठी लढाई करण्यासाठी एप्रिल २०२५ मध्ये पाकिस्तान पूर्णतः सिद्ध होते; परंतु भारतीय वायूसेनेने नष्ट केलेल्या ‘एअर डिफेन्स कमांड अँड कंट्रोल सेंटर्स’च्या छत्रीचा आणि पोकळ ‘हार्डंड शेल्टर्ड-बंकर्स’मध्ये बसलेले पाकिस्तानी सेनाध्यक्ष काय कामाचे ? भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानी सैन्याचा केलेला हा संहार त्यांना कित्येक पिढ्यांपर्यंत लक्षात राहील. ‘पडलो तरी नाक वरच’, असे मानणारा देशच पराभूत जनरलला ‘फील्ड मार्शल’ बनवू शकतो. ‘हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार ।’ (अरेरे, हत्तीने कमळ उपटले.)
१० मेच्या पहाटे भारतीय वायूसेनेने आक्रमणे केली, तेव्हा युद्ध शिखराला पोचलेले होते. त्या वेळी सर्व ‘कमांड आणि कंट्रोल सेंटर्स’मधील सर्व तज्ञ कर्मचारी कार्यरत होते. प्रत्येक ‘कमांड आणि कंट्रोल सेंटर्स’वर उपस्थित असलेले (अनुमाने १००-२००) तज्ञ कर्मचारी काही क्षणांत पंचतत्त्वात विलीन झाले. भारतीय वायूसेनेने पाकिस्तानी वायूसेनेचा रणनीतीच्या दृष्टीने अधिकतम विनाश (स्ट्रॅटेजिक डिस्ट्रक्शन) केला. अवकाशामध्ये (एरोस्पेस) वेग, डेटा आणि रियल टाईम समन्वय अतीमहत्त्वाचे असतात. काही क्षणांमध्ये पाकिस्तानी वायूसेनेने ते सर्व गमावले.
८. पाकच्या भारतविरोधी अपप्रचाराला भारतीय आणि राष्ट्रप्रेमी माध्यमे यांनी बजावयाची भूमिका
भारतीय वायूसेनेच्या यशाचे सत्य उपग्रह छायाचित्रांनी जगासमोर आणले. १० मे पहाटेच्या यशस्वी ‘को-ऑर्डिनेटेड हायप्रिसिशन’ आक्रमणांनी जगातील प्रमुख वायूसेनांमध्ये भारतीय वायूसेनेला अग्रस्थानी नेऊन बसवले; परंतु जगभरामध्ये भीषण शांतता आहे. माध्यमांची शीर्षके चूप आहेत. पाश्चात्त्य राष्ट्रांच्या सैनिकी वार्तापरिषदा स्तब्ध आहेत. केवळ खासगी अवलोकन आणि आश्चर्यमिश्रित कुजबूज आहे. ८८ घंट्यांमध्ये भारताने रणांगणात विजय मिळवून जगाला रणनीतीचा धडा दिला आहे. त्यामुळेच जागतिक संरक्षण क्षेत्रामध्ये नीरव शांतता पसरली आहे.
त्याच्या उत्तरार्थ चिनी साहाय्य आणि पाश्चात्त्य मित्र राष्ट्रांच्या पाठिंब्याने ‘पाकिस्तान जिंकले’, अशा आशयाचा खोटा प्रचार (फेक प्रपोगांडा) पसरवला जात आहे. असला खोटा प्रचार नष्ट झालेले तज्ञ आणि सैनिक परत आणू शकणार नाही ! परंतु जागतिक प्रचारयुद्ध चालू आहे. भारतविरोधी जागतिक माध्यमे देशविरोधी खोटा प्रचार सरसावून करत आहेत. तो थांबवण्यासाठी जागतिक आणि भारतीय माध्यमांवर असलेला भारतविरोधी आर्थिक बाहुबलींचा पगडा हटवणे आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रप्रेमी आर्थिक बाहुबली आणि पक्ष यांनी झटले पाहिजे. राष्ट्रप्रेमी माध्यमांनी वास्तव सांगणारे लेख, ‘पॉडकास्ट’ आणि व्हिडिओ प्रकाशित केले पाहिजेत. नागरिकांनी खोट्या प्रचाराला न भुलता समाजमाध्यमांवर सत्य प्रसारित केले पाहिजे. पाकिस्तानी कुरापतींवर मात करण्यास भारतीय सशस्त्र सैन्य दले कटीबद्ध आहेत. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा विकास करण्यात ‘इस्त्रो’ (भारतीय अवकाश संशोधन संस्था) आणि ‘संरक्षण संशोधन अन् विकास संघटना’ कार्यरत आहेत. पाकिस्तान समर्थक देशांचा समाचार घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सल्लागार समर्थ आहेत ! त्या सगळ्यांना आपल्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.
(समाप्त)
– विंग कमांडर विनायक पु. डावरे (निवृत्त), पुणे. (१२.६.२०२५)
टीप :
१. ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर्स’, म्हणजे ‘निर्देश आणि नियंत्रण कक्ष’.
२. जागतिक क्षेत्रामध्ये केवळ सार्वजनिकरित्या आणि आंतरराष्ट्रीय उपग्रहांद्वारे उपलब्ध असलेली माहिती या लेखासाठी वापरली आहे.

जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !