स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुस्थानच्या इतिहासातील सुवर्णयुग आहे; पण दुर्दैवाने आपल्या देशातील गाजर पारखी काँग्रेसवासी आणि साम्यवादी विचारसरणीच्या नेत्यांना त्याची जाणीव नाही. हिरे आणि गारा एकाच ठिकाणी असतील, तर हिरा टाकून गारा गोळा करणार्या विद्वानांना समजावणे अशक्य आहे. अशा परिस्थितीतही अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांनी ‘हिंदुत्वाची गीता’ सातत्याने हिंदु समाजाला सांगण्याचा स्वतःचा वसा टाकला नाही; म्हणूनच वीर सावरकर यांचे जीवन विरक्त, विरागी आणि उत्कट देशभक्ती यांनी नटलेले असल्याने त्यांच्याविषयी नितांत आदरभाव बाळगणारे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय, विचारवंत अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांच्या निधनाने त्यांची उणीव विशेषत्वाने जाणवणार आहे.

१. सावरकर यांची ‘हिंदुत्व गीता’ आणि त्यांचा वारसा जिवंत ठेवणारे अरविंद कुळकर्णी !

रामगीता, गुरुगीता, भगवद्गीता अशा अनेक गीता आहेत. याप्रमाणेच गत शतकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उच्चरवाने ‘हिंदुत्व गीता’ गायली. भगवद्गीता सर्वसामान्यांना कळावी; म्हणून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी ‘भगवद्गीते’वर भाष्य करणारा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला; मात्र आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्व गीतेची नोंद घेतल्याचे दिसत नव्हते आणि जाणवतही नव्हते. अशा परिस्थितीत वा वातावरणात सावरकर यांची ‘हिंदुत्व गीता’ ही अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी ओघवत्या भाषेत उपलब्ध करून दिली. त्यांचे हे ऋण आपण विसरू शकत नाही. त्यांची निष्ठा आणि त्यांचा प्रामाणिकपणा याला मुरड न घालता सावरकर यांच्या हिंदुत्वाचे धगधगते विचार तेवढ्याच उत्कटतेने आयुष्यभर त्यांनी मांडले. वीर सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदु समाजाला राजकीय दृष्टी देण्याचा अखंड प्रयत्न अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी करून सावरकर यांचा वारसा जिवंत ठेवला.
२. हिंदु समाजाला धर्मांधांविषयी जाणीव करून देणे
पाकिस्तानची आक्रमक वृत्ती आणि आतंकवाद्यांना दिला जाणारा पाठिंबा याचे मूळ मीर कासिमने सिंध प्रांतावर वर्ष ७११ मध्ये केलेल्या पहिल्या आक्रमणात सापडते. मीर कासिमने हिंदुस्थानवर आक्रमण करण्यामागे हिंदु संस्कृती आणि धर्म नष्ट करून संपूर्ण भारताचे इस्लामीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. तेच उद्दिष्ट पाकिस्तानचे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. वर्ष ७११ पासून चालू असलेली ही लढाई अजून थांबलेली नाही; पण आपण वर्ष १८८५ मध्ये एकतर्फी युद्धबंदी घोषित केली. म्हणूनच आपण प्रतिदिन ही लढाई हरत आहोत; पण ते आपल्या लक्षात येत नाही. याची जाणीव आपल्या लेखातून ते हिंदु समाजाला करून देत होते. काश्मीरमधील आतंकवादामुळे तेथील तरुण स्त्रियांची मासिक पाळी वयाच्या २८ व्या वर्षीच बंद होत असल्याचे दाखले अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी १९९० च्या दशकात त्यांच्या लेखातून दिले होते.
३. हिंदूंना भविष्यातील धोक्यांची जाणीव करून देणे
जगातील कोणत्याही देशातील बहुसंख्यांक नागरिकांचे राजकीय धर्मांतर झालेले आढळत नाही. अपवाद आपल्या हिंदुस्थानचा आहे. संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदू नागरिकांचे वर्ष १८८५ मध्ये राजकीय धर्मांतर होऊन ते हिंदी झाले. एवढा मोठा त्याग कुणीच केला नाही. असे असूनसुद्धा हिंदूंना अजून त्याग करायला लावणे, हा त्यांच्यावर अन्याय नाही का ?, असा परखड प्रश्न अरविंद विठ्ठल कुळकर्णी विचारत राहिले. यामागे त्यांना वाटणारी भीती त्यांनी व्यक्त केली होती, ती म्हणजे आपला खापर पणतू हिंदु असेल, याची निश्चिती देता येत नाही.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या वेळी ४ पादशाही आपल्या टाचेखाली दाबून ठेवल्या होत्या. याउलट हिंदुस्थान स्वतंत्र झाला, तेव्हा त्याने एका शत्रूराष्ट्राला जन्म दिला. हे वर्तन छत्रपती शिवरायांच्या वर्तनाशी विसंगत आहे’, असे सांगणारा पत्रकार आणि राजकीय विचारवंत अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांच्या रूपात महाराष्ट्रात हिंदुत्वाची गर्जना करत होता आणि भविष्यातील धोके हिंदु समाजाला दाखवून देत होता. तोच आज हरपला.
४. सावरकरवाद परखडपणे मानणारे अरविंद विठ्ठल कुलकर्णी !
आपला देश गांधी आणि सावरकर या दोन कुळांमध्ये विभागला गेल्याची खंत ते अनेक वेळा त्यांच्या व्याख्यानातून अथवा लेखनातून व्यक्त करत होते. जोपर्यंत सावरकर कुळातील लोकांची संख्या वाढणार नाही, तोपर्यंत या देशाला ताठ मानेने जगता येणार नाही. सावरकरवादी बाजू मांडतांना ते परखडपणे सांगायचे, ‘काँग्रेस, मुस्लिम लीग आणि ब्रिटीश या त्रिकुटाने संगनमत करून पाकिस्तानची निर्मिती केली; म्हणूनच विभाजन म्हणजे ‘मॅच फिक्सिंग’चा प्रकार आहे.’ असे प्रतिपादन करणारे पहिले पत्रकार अरविंद विठ्ठल कुळकर्णी होते.
सावरकर यांच्या तत्त्वज्ञानाशी एकरूप झाल्यावाचून त्यांची दृष्टी नेमकेपणाने आकलन होणे अशक्य आहे. ‘आपण सावरकरवादी आहोत’, ही गोष्ट अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी कधीही लपवून ठेवली नाही. प्रामाणिकपणा, सत्य, नैतिकता या सद्गुणांची संगत त्यांनी कधीही सोडली नाही. कोणत्याही प्रलोभनाला ते फसले नाहीत. शुद्ध संस्कारित वाणी आणि तेवढीच पवित्र, सात्त्विक लेखणी या जोडीला पवित्र ज्ञानाची जोड मिळाल्यामुळे त्यांची पत्रकारिता गंगेसारखी निर्मळ आणि पवित्र ठरली. त्यामुळेच ते कधीही विकले जाणार नाहीत, असा विश्वास त्यांनी राजकीय वर्तुळात आणि पत्रकारिता क्षेत्रात निर्माण झाला होता. त्यासाठी लागणारे नैतिक धैर्य त्यांना सावरकर यांच्या विचारातून मिळाले. याचा त्यांना यथार्थ अभिमान वाटत असे. तो अभिमान त्यांच्या लिखाणातून आणि व्याख्यानातून ते व्यक्तही करत होते.
५. ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘मिड डे’ या इंग्रजी दैनिकांशी लढा देतांना सावरकर विचार कृतीत आणणे
‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘मिड डे’ या इंग्रजी दैनिकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चारित्र्य हननाची मोहीम जेव्हा उघडली, तेव्हा ते स्वतः त्याच दैनिकांमध्ये संपादकीयच्या राजकीय विभागात काम करत होते. वास्तविक अशा वेळी व्यवस्थापनाशी लढा देण्याचे धाडस कोणत्याही पत्रकारात नसते; कारण त्यांची नोकरी आड येते; पण त्यांनी एक हाती लढा दिला. त्यामुळे त्यांना आर्थिक हानी सहन करावी लागली. या गोष्टीविषयी त्यांना कधीही पश्चाताप झाला नाही. ‘सावरकर हे दैवत मानले की, त्यासाठी कोणताही त्याग करायला, कोणत्याही संकटाशी सामना करायला तत्पर असणे, हे आपले कर्तव्य ठरते’, असे विचार ते व्यक्त करण्यासह कृतीत आणत होते.
६. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सल्ला आचरणात आणणारे अरविंद कुळकर्णी !
हिंदुत्वाचे कार्य करायचे असेल, तर अनेक संकटांना सामोरे जावे लागणार. ठिकठिकाणी अपमान, मानहानी यांसारखे प्रसंग उद्भवणार, आर्थिक हानीसुद्धा सहन करावी लागेल, या सर्व गोष्टींना सामोरे जाण्यासाठी त्यांना मिळालेली ऊर्जा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी त्यांची प्रत्यक्ष झालेली भेट ! त्या वेळी सावरकर त्यांना म्हणाले, ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकाचे पारायण करा, म्हणजे तुम्हाला जीवनात कधीही निराशेला सामोरे जावे लागणार नाही.’ सावरकर यांचा हा सल्ला त्यांनी तंतोतंत कार्यवाहीत आणला.
७. सावरकर निष्ठा आणि कर्तव्य भावना जोपासणे
२६ फेब्रुवारी या दिवशी पार्ले येथे सावरकर यांच्या ‘आत्मार्पणदिना’च्या निमित्ताने एका काव्य वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मराठी साहित्यातील नामवंत कवी उपस्थित रहाणार होते. त्यांच्याशी संपर्क साधून अरविंद विठ्ठल कुळकर्णी त्यांना म्हणाले, ‘सावरकर हे महाकवी होते. आज त्यांचा आत्मर्पणदिन आहे. आपण त्यांच्या कवितेने कार्यक्रमाचा प्रारंभ आणि समारोपही त्यांच्याच कवितेने करावा.’ त्यांची ही सूचना संबंधित कवींना मान्य झाली नाही. त्यांनी स्पष्टपणे नकार दिला; पण कुळकर्णी स्वस्थ बसले नाहीत, ते कार्यक्रमाच्या वेळी त्या ठिकाणी पोचले. त्यांनी कवीवर्य ना.धो. महानोर यांना ‘सावरकर यांच्या कविता या कार्यक्रमात वाचल्या जाव्यात’, अशी विनंती केली. ना.धो. महानोर म्हणाले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाकवी आहेत. त्यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. तुम्ही त्यांच्या कविता माझ्याकडे द्या. मी माझ्या कविता न वाचता सावरकरांच्या कवितांचे वाचन करीन.’ अशा प्रकारे छोट्या छोट्या वाटणार्या गोष्टीतही त्यांनी व्यक्तीगत पातळीवर लक्ष घालून स्वतःची सावरकरनिष्ठा आणि कर्तव्य भावना जोपासली.
८. भारतीय मजदूर संघाचे दत्तोपंत ठेंगडी आणि संपादक बेहराम कॉन्ट्रॅक्टर यांनी काढलेले गौरवोद्गार !
अ. रा.स्व. संघाच्या संस्कारातून घडलेले त्यांचे व्यक्तीमत्त्व हे तेजस्वी ठरण्यामागे सावरकर तत्त्वज्ञान कारणीभूत आहे; म्हणूनच ‘संघातील अनेक कार्यकर्ते पत्रकार आहेत; पण हे सारे प्रथम पत्रकार आणि नंतर स्वयंसेवक आहेत. अरविंद विठ्ठल कुळकर्णी हे स्वयंसेवक पत्रकार आहेत’, असे उद्गार शेतकरी आणि कामगार नेते तथा भारतीय मजदूर संघाचे दत्तोपंत ठेंगडी यांनी काढले होते.
आ. बेहराम कॉन्ट्रॅक्टर हे इंग्रजी दैनिक ‘आफ्टरनून डिस्पॅच अँड कुरिअर’चे संस्थापक संपादक होते. ते अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांच्याविषयी म्हणाले होते, ‘अरविंद कुळकर्णी हे एकमेव असे पत्रकार आहेत की, त्यांचे राजकीय संबंध हे शुद्ध सात्त्विक आणि अत्यंत विश्वासाचे आहेत.’
९. अनेक राजकीय नेत्यांशी हितसंबंध
काँग्रेस नेते वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, अंतुले आणि बॅरिस्टर बाबासाहेब भोसले आवश्यक तेव्हा अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचा सल्ला घेत होते. मुख्यमंत्रीपद प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी कुळकर्णींचे आभारही मानले होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटण्याची वेळ ठरलेली नसतांनासुद्धा ते मुख्यमंत्र्यांना कधीही भेटू शकत होते, तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाची दारे त्यांच्यासाठी नेहमी खुली होती. शिवसेनेच्या राजकीय शिबिरात हिंदुत्वावर त्यांनी व्याख्याने दिली.
१०. मुंबई उच्च न्यायालयात ‘हिंदुत्व’ या विषयावर २० घंटे साक्ष देणारे अरविंद कुलकर्णी !
महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर हिंदुत्वाविषयी जो खटला भरला गेला, तेव्हा ‘हिंदुत्व’ याविषयी अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात २० घंटे साक्ष दिली. त्या साक्षीत ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व कसे आहे ?’, ते त्यांनी सांगितले. न्यायमूर्तींना त्यांची विद्वत्ता आणि उत्कट देशभक्ती यांची ओळख पटवली; म्हणून त्यांनी साक्षीदाराच्या पिंजर्यात बसण्यासाठी कुळकर्णी यांना आसन दिले. वास्तविक साक्षीदार बसून कधीही साक्ष देत नाही.
११. अरविंद कुळकर्णी यांच्या भाषणाच्या प्रभावाने ‘धर्मभास्कर’ या मासिकाचे वर्गणीदार वाढणे
त्यांच्या वक्तृत्वाचा प्रभाव जसा न्यायमूर्तींवर पडला, तसाच तो श्रोत्यांवर पडला, याचा दाखला म्हणजे सांगलीला पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी लोकांच्या आग्रहास्तव सुमारे साडेचार घंटे भाषण केले. त्यांचे भाषण लोकांना आवडले. त्याचीही पावती, म्हणजे ‘धर्मभास्कर’ या मासिकात ते सातत्याने लिखाण करायचे. ‘ज्यांना या मासिकाचे सदस्य व्हायचे असेल, त्यांनी १२५ रुपये भरून वर्गणीदार व्हावे’, असे आवाहन त्यांनी केले. या भाषणाने प्रभावित झालेल्या लोकांनी ‘धर्मभास्कर’ या मासिकाचे वर्गणीदार होण्याचे ठरवले. तिथे २ लाख रुपये एवढी वर्गणी जमा झाली आणि हा विक्रमच प्रस्थापित झाला.
१२. सावरकर यांची विचारधारा जपण्यासाठी दैनिक ‘सकाळ’मधील नोकरी सोडण्यास सिद्ध असणारे अरविंद कुळकर्णी !
सावरकर यांची भाषाशुद्धीची चळवळ अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी आयुष्यभर जतन केली. दैनिक ‘सकाळ’मध्ये ते काम करत असतांनाची ही घटना… बातमी करतांना दैनिक ‘सकाळ’च्या प्रथेप्रमाणे तारीख लिहावी लागते. ‘तारीख’ हा शब्द मराठी नाही. तो परभाषेतील शब्द आहे. परभाषेतील शब्द आपल्या हातून लिहिला जाणार नाही, याची निश्चिती असल्यामुळे तो सहजतेने ‘दिनांक’ असा लिहिला गेला. त्यासाठी त्यांनी एकदा संपादक महाशयांकडे तक्रार केली, ‘कुळकर्णी बातमी लिहितांना ‘तारीख’ऐवजी ‘दिनांक’ शब्द वापरतात.’ संपादक महाशयांनी या तक्रारीची नोंद घेऊन कुळकर्णींना जाब विचारला. त्या वेळी ते म्हणाले, ‘मी ‘तारीख’ शब्द लिहू शकत नाही. माझी अडचण आहे. ‘प्रूफ रिडिंग’ (मुद्रित शोधन) करतांना ‘प्रूफ रिडर’ म्हणून ‘तारीख’ लिहिल्यास माझा विरोध नाही.’ यावर संपादक महाशय निरुत्तर झाले.
एकदा रात्रपाळी करतांना उत्तर रात्री एक बातमी आली. त्या बातमीचे वृत्त सिद्ध करून छपाई विभागाकडे पाठवले. त्याचे ‘प्रूफ रिडींग’ स्वतः कुलकर्णी यांनी केले. त्यामुळे त्या बातमीत ‘तारीख’ऐवजी ‘दिनांक’ शब्दच होता. आता अशी परिस्थिती झाली की, त्या दिवशीच्या दैनिक ‘सकाळ’च्या अंकात सर्व ठिकाणी ‘तारीख’ शब्द होता. कुलकर्णी यांनी सिद्ध केलेल्या वार्तेत ‘दिनांक’ शब्द होता. संपादकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी याविषयी कुलकर्णी यांना खुलासा करण्यास सांगितला.
कुळकर्णी संपादकांना म्हणाले, ‘रात्री दीड वाजल्यानंतर ‘प्रूफ रिडर’ झोपतात. त्यांची झोप मोडू नये; म्हणून मीच ‘प्रूफ रिडींग’ करून ती बातमी छापली. आपण म्हणत असाल, तर पुढच्या वेळेपासून ‘प्रूफ रिडर’ची झोपमोड करून ‘प्रूफ रिडिंग’ करण्यास सांगीन; पण मी स्वतः ‘तारीख’ हा शब्द चुकूनही वापरणार नाही. आपल्याला हे पटत नसल्यास मी नोकरी सोडण्यास सिद्ध आहे.’ अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचा हा खुलासा ऐकून संपादक महाशय चक्रावून गेले. एका सामान्य गोष्टीसाठी हा माणूस नोकरी सोडतो ! याचा त्यांना बोध होईना. सावरकर विचाराशी नाते जोडल्यावर ते नाते टिकवण्यासाठी अन्य नाती तुटली, तरी त्याची तमा बाळगायची नाही, हे ओघानेच आले. अशा प्रकारे स्वत्व, स्वाभिमान, अस्मिता, भाषाभिमान जोपासायला शिकवणारे संस्कार म्हणजे शुद्ध, निर्मळ, पवित्र जीवन होय. सावरकर यांची विचारधारा अशा प्रकारचे जीवन जगण्यासाठी बळ देऊन मार्गदर्शन करते, त्याचा हा दाखला आहे.
१३. वीर सावरकर यांचे स्वीय सचिव बाळाराव सावरकर यांनी काढलेले गौरवोद्गार !
वीर सावरकर यांचे तत्त्वज्ञान आणि राजनीती यांविषयी भाष्य करणारे शेकडो लेख अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांनी लिहिले. वीर सावरकर यांचे स्वीय सचिव बाळाराव सावरकर एकदा त्यांना म्हणाले, ‘कुळकर्णी, तुम्ही सावरकर यांचे तत्त्वज्ञान उत्कृष्टरित्या लिहिता. सावरकर यांचे विचार मांडणारा कुणीतरी आहे, याचा मला आनंद आहे. आता मी मरायला मोकळा आहे.’ बाळाराव सावरकर यांनी त्यांचे हे मनोगत कुळकर्णींकडे व्यक्त केल्यानंतर केवळ २ दिवसांतच त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली. या घटनेने कुळकर्णींना मोठा मानसिक धक्का बसला. त्याच वेळी स्वतःच्या वाढलेल्या उत्तरदायित्वाची जाणीव त्यांना झाली.
१४. ‘अधोरेखित’ यू ट्यूब वाहिनी
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात त्यांनी यू ट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ‘अधोरेखित’ या नावाने राजकीय विश्लेषण सातत्याने करून स्वतःच्या पत्रकारितेचा वसा पाळला.
१५. पु.भा. भावे यांच्या पत्नीने काढलेले गौरवोद्गार
कुळकर्णी यांच्या लिखाणातील आक्रमकता, सुस्पष्टपणा, तर्कसंगत बुद्धीनिष्ठ मांडणी या लेखन वैशिष्ट्यामुळे पु.भा. भावे यांच्या पत्नी (संपूर्ण डोंबिवलीच्या त्या भावेकाकू होत्या.) कुळकर्णी यांच्या लेखाविषयी बोलतांना म्हणाल्या होत्या, ‘कुळकर्ण्यांचे लेख वाचतांना मला भाव्यांची आठवण होते.’
१६. अभिनेते मेहमूद यांनी उठवलेल्या अफवेवर अरविंद कुळकर्णी यांनी सणसणीत लेख लिहून प्रत्युत्तर देणे
हिंदी चित्रपटातील कॉमेडी किंग अभिनेते मेहमूद यांच्या अचकट विनोद शैलीवर कुळकर्णी यांनी घणाघाती प्रत्युत्तर दिले. वर्ष १९७१ मध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. या युद्धकाळातच मेहमूद चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी युरोपला गेले होते. तिथे एका पार्टीत आपल्या डाव्या हाताची करंगळी वर करून ते मोठ्याने सर्वांना म्हणाला, ‘मी हिंदुस्थानला जाऊन येतो.’ त्यानंतर त्याने गंमत म्हणून अशी आवई उठवली, ‘पाकिस्तानने मुंबईतील भाभा अणूभट्टी बाँब टाकून उडवली.’ मेहमूदच्या तोंडून हे ऐकताच राज कपूर यांनी मुंबईला दूरध्वनी खरी माहिती मिळवली, तेव्हा मेहमूदने ‘आपण गंमत म्हणून ही बातमी पसरवली आहे’, असे सांगितले. या घटनेवर आधारित अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी सणसणीत लेख लिहिल्याचे सर्वांना स्मरत असेल. या लेखाचे शीर्षक होते ‘मेहमूदची करंगळी आणि हिंदुस्थान…’ अशा प्रकारे जिथे जिथे देशविघातक गोष्टी घडल्याचे आढळते, तिथे तिथे अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी त्यांच्या लेखणीतून प्रतिआक्रमण चढवलेला आढळून येतो.
१७. वीर सावरकर यांच्या तैलचित्राला संसदेत विरोध होताच काँग्रेसवर केलेले शरसंधान !
वीर सावरकर यांच्या तैलचित्राला संसदेत विरोध होताच त्यांनी मासिक ‘धर्मभास्कर’च्या मार्च २००३ च्या अग्रलेखात स्पष्टपणे लिहिले…‘ज्यांच्यामुळे फाळणी झाली, त्यांची चित्रे आपण नोटांवर छापतो आणि ज्यांनी फाळणी होण्याचे रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांचे चित्र लोकसभेतही लावायला विरोध होतो. हा दैवदुर्विलास आहे. ‘सावरकर गांधी हत्येच्या कटात सहभागी नव्हते’, असे न्यायालयात सिद्ध झाले; म्हणून त्यांना न्यायालयाने कोणत्याही अटींवाचून सन्मानाने मुक्त केले. असे असतांनाही काँग्रेस त्यांना ‘गांधींचा मारेकरी’ ठरवण्याचा अट्टहास करते. काँग्रेसची दादागिरी देशभक्त नागरिक आणि सावरकरवादी यांनी वैचारिक आंदोलन छेडून बंद करावी’, असे कुळकर्णी यांनी लेखातून आवाहन केले होते.
१८. अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी आर्थिक बहिष्काराविषयी केलेले आवाहन
‘मुसलमानांची नांगी मोडायची असेल, तर ‘नको दंगे नको धोपे आर्थिक बहिष्कार तंत्र सोपे’, अशी घोषणा करून ‘मुसलमान समाजावर संपूर्ण बहिष्काराचे ब्रह्मास्त्र सोडा’, असे आवाहनही अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी केले.
१९. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून देश सुसज्ज असल्याचे पहाणे समाधानाचे !
‘आपला देश आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असला पाहिजे’, हे सावरकर यांचे विचार नरेंद्र मोदी प्रत्यक्ष कृतीत आणत असल्याचे अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष पाहिले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ हे जोपर्यंत एक जरी आतंकवादी शिल्लक असेल, तोपर्यंत ते अखंड चालूच रहाणार’, अशी घोषणा पंतप्रधानांनी करताच ते सुखावले होते. सावरकर यांच्या विचारांचा वारसा प्रत्यक्ष कृतीत आणणारा हिंदुस्थानचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपात सावरकर यांच्या हिंदुत्वाचा पुरस्कार करून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा वसा घेतलेल्या अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांना उतारवयात प्रत्यक्ष पाहिला मिळाला, हे अत्यंत समाधानाचे आहे.
२०. अरविंद कुलकर्णी, म्हणजे सावरकर यांच्या साहित्याचा आणि राजनीतीचा संदर्भकोश !
आमच्या पिढीसाठी अरविंद कुळकर्णी, म्हणजे सावरकर यांच्या साहित्याचा आणि त्यांच्या राजनीतीचा चालता बोलता संदर्भकोश ! पार्थिव रूपात आज ते आपल्यात नाहीत; पण त्यांच्या लेखणीच्या आणि वाणीच्या स्वरूपात त्यांचे मार्गदर्शन पुढच्या पिढींना होत राहील. सावरकर यांच्या विचारांचा वारसा प्राणापलीकडे जपणारा त्यांचा कृतीशील अनुयायी काळाच्या पडद्याआड गेला, त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन!
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१६.६.२०२५)
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका