पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना दूरभाषवरून झालेल्या चर्चेत केले स्पष्ट !

ओटावा (कॅनडा) – ‘जी-७’ ( कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका या ७ विकसित देशांचा गट) शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडात पोचल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना दूरभाष केला. ट्रम्प यांनी परत जातांना पंतप्रधान मोदी यांना अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले; मात्र पुढील कार्यक्रम नियोजित असल्याने मोदी यांनी त्यास नकार दिला. त्याच वेळी ट्रम्प यांनी भारत-पाक प्रश्नात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला, त्याला पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे नकार दिला. ‘ऑपरेशन सिंदूर’ शस्त्रविरामापर्यंत गेले; पण त्यात अमेरिकेची मध्यस्थी नव्हती, यापुढेही नसेल’, असे मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले. जवळपास ३५ मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली.
या चर्चेविषयी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माहिती देतांना सांगितले की, या चर्चेत भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अमेरिकेची मध्यस्थी नव्हती आणि पुढेही नसेल, असे स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, आता भारत आतंकवादाच्या घटनांकडे छुपे युद्ध म्हणून नव्हे, तर थेट युद्ध म्हणून पाहील.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातील बैठक जी-७ च्या पार्श्वभूमीवर होणार होती; परंतु ट्रम्प यांना १७ मे या दिवशी ही परिषद अर्धवट सोडून अमेरिकेत परतावे लागले. यामुळे ही बैठक होऊ शकली नाही. त्यानंतर ट्रम्प यांच्या विनंतीवरून दोन्ही नेत्यांनी दूरभाषवर चर्चा केली.
ट्रम्प यांनी आतापर्यंत १३ वेळा युद्धबंदीचा दावा केला !
१० मे या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या युद्धबंदीनंतर ट्रम्प सतत दावा करत आहेत की, त्यांच्या मध्यस्थीमुळे हे युद्ध रोखले गेले. त्यांनी आतापर्यंत १३ वेळा हा दावा केला आहे.