बैठ्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे गंभीर शारीरिक आजार आणि त्यावरील उपाय !

निरोगी जीवनासाठी व्यायाम – लेखांक ६५

‘आधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन सुलभ केले असले, तरी त्यामुळे शरिराची हालचाल न्यून झाली आहे. दिवसभर बसून काम केल्यामुळे निर्माण होणारी ‘बैठी जीवनशैली’ आरोग्याच्या संदर्भातील अनेक समस्या निर्माण करते. या समस्या दूर करण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी ‘व्यायाम’ हा सर्वांत प्रभावी उपाय आहे. या लेखमालेत आपण बैठ्या जीवनशैलीचे आपल्या आरोग्यावर होणारे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम, त्याची कारणे अन् दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना’ इत्यादी सूत्रे समजून घेणार आहोत. या लेखात आपण बैठ्या जीवनशैलीमुळे कोणते गंभीर आजार निर्माण होऊ शकतात, ते पाहूया.

१. शारीरिक आजार

१ अ. हृदयविकार : हृदय स्नायूंनी बनलेले आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे हृदयाचे स्नायू दुर्बल (कमकुवत) होऊ लागतात. त्यामुळे हळूहळू हृदयाची रक्त पुरवण्याची (पंपिंग) क्षमता न्यून होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. सतत बसून राहिल्यामुळे शरिरातील चरबी आणि कोलेस्ट्रॉल (रक्तातील चरबी) वाढते. ही चरबी रक्तवाहिन्यांमध्ये साठायला लागते. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. रक्तवाहिन्या अरुंद झाल्या की, हृदयाला रक्त पंप करायला अधिक कष्ट घ्यावे लागतात.

परिणामी रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोका संभवतो.

१ आ. मधुमेह आणि लठ्ठपणा : इन्सुलीन (संप्रेरक) हे रक्तातील साखर संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वाचे हॉर्मोन्स (रासायनिक संदेशवाहक रेणू) आहेत. बैठ्या जीवनशैलीमुळे पेशींची इन्सुलीनला प्रतिसाद देण्याची क्षमता न्यून होऊन पेशी रक्तातील साखर वापरू शकत नाहीत. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि मधुमेहाची शक्यता वाढते, तसेच ऊर्जेचा व्यय न्यून होतो आणि चयापचयाचा दर न्यून होतो. यामुळे आहारातून उत्पन्न झालेली अतिरिक्त ऊर्जा शरिरात अनावश्यक चरबीच्या रूपात साठू लागते आणि लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार होण्याची शक्यता वाढते.

१ इ. कर्करोग : बैठ्या जीवनशैलीमुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते, उदा. स्तन, मूत्राशय, मलाशय, मोठे आतडे, मूत्रपिंड, फुप्फुसे, यकृत इत्यादींना होणारे कर्करोग. संशोधनाने सिद्ध केले आहे की, नियमित व्यायाम नसल्यास शरिरातील सूज आणि इतर जैविक पालट हे कर्करोगाचा धोका वाढवतात.

सौ. अक्षता रेडकर

१ ई. स्नायूंची दुर्बलता आणि सांध्याचे विकार : माणसाला शारीरिक हालचाल नसल्यामुळे स्नायू दुर्बल होतात. स्नायूंचे वजन न्यून होते. त्याचा परिणाम स्नायूंची शक्ती, लवचिकता आणि शरिराचा तोल सांभाळणे यांवर होतो. यामुळे माणूस पडण्याचा आणि दुखापत होण्याचा धोका वाढतो. हाडांची घनता न्यून झाल्याने ऑस्टियोपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे) आणि सांधेदुखी यांसारख्या विकारांची शक्यता वाढते. माणूस दीर्घकाळ बसल्यामुळे त्याच्या शरिरातील सांधे आणि मणके यांची ठेवण बिघडल्यामुळे सांधे अन् मणके यांवर अतिरिक्त ताण येऊन विविध आजार निर्माण होण्यास आरंभ होतो, उदा. संधीवात, स्पॉन्डिलायटीस (मानेच्या मणक्यांना सूज येणे), फ्रोजन शोल्डर (खांद्याचा संधीवात), टेनिस एलबो (कोपरादुखी), स्कोलिओसिस (पाठीचा कणा बाजूला वळणे) इत्यादी.

१ उ. पचनक्रिया मंदावणे : सतत बसून राहिल्यामुळे पचनसंस्थेवर अनुकूल ताण पडत नाही. त्यामुळे पचनक्रिया मंदावते. परिणामी आम्लपित्त वाढणे, बद्धकोष्ठता, पोटफुगी यांसारखे त्रास होऊ लागतात. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक्षमता न्यून होणे, अकाली केस पांढरे होणे, केस गळणे, थायरॉईड ग्रंथीचे विकार, मासिक पाळीशी संबंधित आजार, गर्भाशयात गाठी होणे (फायब्रॉईड) यांसारखे अनेक आजार उद्भवतात.

२. मानसिक समस्यांमध्ये वाढ

बैठ्या जीवनशैलीमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. शारीरिक हालचाल नसल्यामुळे तणाव आणणार्‍या रासायनिक संदेशवाहक रेणूंचे प्रमाण वाढते. त्यामुळे ताण, नैराश्य आणि चिंता या मानसिक समस्यांमध्ये वाढ होते. याचा परिणाम मानसिक आरोग्यावर दीर्घकाळ होत रहातो. मेंदूची कार्यक्षमता न्यून होते. झोपेच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होतो आणि झोपेच्या समस्या निर्माण होतात.

बैठ्या जीवनशैलीमुळे संपूर्ण आयुष्यावर परिणाम होतो. व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक क्षमता न्यून होते. त्यामुळे आयुष्य जगण्यातील गुणवत्ता न्यून होते. जीवनातील उत्साह, ऊर्जा आणि एकूण सदृढता न्यून होते. या सर्व घटकांमुळे निष्क्रीय जीवनशैली ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्यसमस्या बनली आहे.

३. बैठ्या जीवनशैलीमुळे होणारे आजार टाळण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक

या आजारांपासून मुक्त होण्यासाठी आतापासूनच नियमित व्यायाम करणे, प्रतिघंट्याला उठून ५ मिनिटे चालणे किंवा हलक्या हालचाली करणे, शारीरिक श्रमाच्या कामांची सवय लावून शरीर सक्रीय ठेवणे, या उपायांचा अवलंब करूया.’

– सौ. अक्षता रूपेश रेडकर, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (३.४.२०२५)