भारताने मे २०२५ मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. भारतीय वायूसेनेने पाकिस्तानी ‘कमांड आणि कंट्रोल सेंटर्स’वर केलेल्या ‘को-ऑर्डिनेटेड हायप्रिसिशन’ (समन्वय करून उच्च अचूकतेने) आक्रमणांनी सैनिकी इमारती तर पाडल्याच, याखेरीज त्यांच्या कक्षेमध्ये येणारी प्रत्येक वस्तू, साहित्य, सैनिक इत्यादी पूर्णतः नष्ट केले. भारताने युद्धाचे सर्व तंत्रच एकदम पालटले. २२ एप्रिल २०२५ या दिवशी पहलगाममध्ये इस्लामी आतंकवाद्यांनी धर्म विचारून केलेल्या २६ निष्पाप हिंदूंच्या निर्घृण कत्तलीचा तो केवळ सूड नव्हता, तर त्याच्याही फार पलीकडील काहीतरी होते. केवळ ८८ घंट्यांमध्ये घडवलेल्या आधुनिक राजकीय आणि सामरिक इतिहासाचा आढावा घेऊया. उपग्रहाद्वारे काढलेली छायाचित्रे प्रकाशित होण्याची प्रक्रिया चालू असल्याने आतापर्यंत त्या घटनेचे इतके सविस्तर विश्लेषण कुणी केलेले नव्हते. जागतिक सैनिकी इतिहासातील अद्वितीय घटना, म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर – मे २०२५’मध्ये भारतीय वायूसेनेच्या ‘को-ऑर्डिनेटेड हायप्रिसिशन’ आक्रमणांनी पाकिस्तानी ‘एअर डिफेन्स सिस्टम’ (हवाई संरक्षणयंत्रणा) नष्ट झाली. त्यामुळे जगातील अनेक देशांना जबरदस्त हादरेही बसले. असे काय घडले होते ?

१. भारतीय राजकीय नेतृत्वाकडून सैन्याला स्वायत्तता
पाकिस्तानातून प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्रे घेऊन आलेल्या जिहादी आतंकवाद्यांनी पहलगाममध्ये २६ जणांच्या धर्म विचारून केलेल्या निर्घृण कत्तलीची छायाचित्रे, बातम्या, व्हिडिओ इत्यादी दुःखद आणि भारतीय अस्मितेवर प्रहार करणारे होते. जगभरातील देशांकडून आतापर्यंत अशा घटनांचा पोकळ निषेध केला जाऊन काही महिन्यांनी परिस्थिती पूर्ववत् होत असे. ते आता भारतीय नेतृत्वाच्या सहनशक्तीच्या बाहेर गेले होते. भारतीय राजकीय नेतृत्वाने निर्णय घेऊन सशस्त्र सेनादलांना स्वायत्तता दिली, ‘को-ऑर्डिनेटेड हायप्रिसिशन’ आक्रमणांद्वारे मोजकी स्फोटके वापरून निवडलेली लक्ष्ये नष्ट करायची ! मोठ्या प्रमाणात बाँबिंग न करता शल्यवैद्याच्या कौशल्याने पाकिस्तानी सैनिकी कमांड आणि कंट्रोल सेंटर्स’चा ‘कॅन्सर’ कापून काढायचा.
२. पाकिस्तानने बांधलेली ‘हार्डंड शेल्टर्ड-बंकर्स’ (खोल भूमीखाली निवार्यासारखे अभेद्य बंकर्स)
हवेतून होणार्या पारंपरिक आणि अण्वस्त्रांच्या आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी सैनिकी मुख्यालये, शस्त्रास्त्रांचे साठे, संपर्क प्रणाली, असे सर्व महत्त्वाचे तळ भूमीखाली खोलात, ‘रिइन्फोर्सड काँक्रीट’ (सशक्त काँक्रीट), ‘स्टील कोअर्ड’, ‘मल्टी लेअर्ड’ (बहुस्तरीय), ‘ब्लास्ट प्रूफ बंकर्स’मध्ये (स्फोटांपासून सुरक्षित असे बंकर्स) सुरक्षित ठेवण्याच्या जागतिक पद्धतीनुसार असे ‘हार्डंड शेल्टर्ड-बंकर्स’ नूरखान विमानतळाखाली बनवण्याच्या कार्याच्या बदल्यात पाकिस्तानने ‘किराना हिल्स’वरील अण्वस्त्रांच्या कोल्ड-टेस्ट्स बंद करण्याची किंमत मोजली होती. त्या मोबदल्यात भूमीखालील बांधकामांत तज्ञ असलेल्या ‘जनरल इलेक्ट्रिक एव्हिएशन’ या अमेरिकन आस्थापनाने ते बांधकाम केले. नूरखान विमानतळाखालील ‘हार्डंड शेल्टर्ड-बंकर्स’च्या बांधकामाच्या यशानंतर पाकिस्तानच्या ‘स्पेशल वर्क्स डिपार्टमेंट’ने (विशेष कार्य खात्याने) अशी ‘हार्डंड शेल्टर्ड-बंकर्स’ अजून २१ तळांवर बांधून घेतली. त्यांपैकी प्रत्येक ‘हार्डंड शेल्टर्ड-बंकर्स’ त्याच्या ‘ब्लास्ट प्रूफ कंट्रोल रूम्स’ (स्फोटांपासून सुरक्षित असे नियंत्रण कक्ष) आणि त्यांच्या रचना गुप्ततेसाठी, निरनिराळ्या (विदेशीसुद्धा) ठेकेदारांनी बांधल्या. तेथील ‘कमांड आणि कंट्रोल सेंटर्स’ व्यवस्थित चालावीत म्हणून त्यांना वातानुकूलित ठेवून, तसेच हवा खेळवण्यासाठी ‘इंटिग्रेटेड एच्-व्हॅक्स सिस्टम्स’ लागतात. ही अतीगुप्त ‘शेल्टर्ड बंकर्स’ केवळ काही निवडक परदेशी (अमेरिकन आणि चिनी) पाहुण्यांनाच दाखवली जात. त्यांनाच ‘हार्डंड डीपली बरीड टार्गेट्स’ संबोधतात.
३. भारतीय सैन्याने आक्रमणाचे अचूकतेने केलेले नियोजन

आधुनिक युद्धे अशा ‘कमांड आणि कंट्रोल सेंटर्स’मधून लढली जातात.१० मेच्या पहाटे पाकिस्तानच्या ११ तळांवर भारतीय वायूसेनेने केलेली ‘को-ऑर्डिनेटेड हायप्रिसिशन’ आक्रमणांच्या लक्ष्यांमध्ये ‘हार्डंड शेल्टर्ड-बंकर्स’ही होते. ती आक्रमणे भावनेच्या भरात केलेली नसून रणांगणाच्या बुद्धीबळ पटावरील प्रत्येक चाल विचारपूर्वक आणि पूर्वनियोजित होती. प्रत्येक ‘हार्डंड शेल्टर्ड-बंकर्स’ची सखोल माहिती पद्धतशीरपणे मिळवून, त्यांची निश्चिती करवून, अप्रतिम इंटेलिजन्स (गुप्तचर) आणि ‘जिओलॉजिकल मेथडॉलॉजी फॉर अंडरग्राऊंड टार्गेट्स’ (भूमीगत लक्ष्यांसाठी भूगर्भीय पद्धत)चाही वापर केला होता. अत्याधुनिक या पद्धती जगातील केवळ अतीप्रगत सैनिकी शक्ती वापरतात. ‘हार्डंड शेल्टर्ड-बंकर्स’च्या ‘ब्लूप्रिंट्स’च्या साहाय्याने ‘हायप्रिसिशन’ आक्रमण करणे शक्य असल्यामुळे ते अतीगुप्त ठेवले जातात. नूरखान आणि मुरीद विमानतळांखालील ‘हार्डंड शेल्टर्ड-बंकर्स’वर भारतीय वायूसेनेने केलेली ‘हायप्रिसिशन’ आक्रमणे पहाता त्यासाठी केवळ अचूक गुप्तचर यंत्रणा पुरेशी नव्हती. बर्याच काळाचा ‘सिग्नल इंटेलिजन्स’, ‘एआय’ आधारित ‘उपग्रह छायाचित्रे, मानवी ‘इंटेलिजन्स’, ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नेचर प्रोफायलिंग’, ‘थर्मल मॅपिंग’ अशा साधनांचा समन्वय (को-ऑर्डिनेशन) करून ‘रियल टाईम इंटेलिजन्स’, ‘सर्व्हिलन्स’ (पाळत ठेवणे) आणि ‘रेकॉनायझन्स’ (उत्तरदायित्व) यांच्या वापराविना अशी यशस्वी ‘हायप्रिसिशन’ आक्रमणे करणे शक्य नसते.
(टीप : १. ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर्स’, म्हणजे ‘निर्देश आणि नियंत्रण कक्ष’.
२. जागतिक क्षेत्रामध्ये केवळ सार्वजनिकरित्या आणि आंतरराष्ट्रीय उपग्रहांद्वारे उपलब्ध असलेली माहिती या लेखासाठी वापरली आहे.)
४. भारतीय वायूसेनेने पाकच्या उद्ध्वस्त केलेल्या ‘कमांड आणि कंट्रोल सेंटर्स’ची माहिती
पाकिस्तानातील सैन्यसामुग्री ८० टक्के चीनने आणि २० टक्के अमेरिकेने दिलेली आहे. पाकिस्तानी तळांवर ९ आणि १० मेच्या मध्यरात्री-पहाटेच्या आक्रमणांच्या नंतर अन् उपग्रह छायाचित्रे बरेच दिवस अभ्यासल्यानंतर प्रत्यक्ष किती आणि कशी हानी झाली ? हे कळू लागले. आंतरराष्ट्रीय उपग्रहांद्वारे अशी पहाणी सतत चालू असते. त्या अभ्यासातून पुढील निष्कर्ष काढले आहेत. ११ पैकी ३ ‘कमांड आणि कंट्रोल सेंटर्स’वरील ‘ऑपरेशन्स’ (मोहीम) पुढीलप्रमाणे :
अ. नूरखान विमानतळ (पूर्वीचे पाकिस्तान एअर फोर्स स्टेशन (वायूदलाचा तळ), चकलाला) : पाकिस्तान एअर फोर्सचे हे मुख्यालय रावळपिंडीजवळ (इस्लामाबादपासून १० कि.मी.) असून तेथे भूमीखाली पाकिस्तानी एअर डिफेन्सचे ‘कमांड’ (निर्देश), ‘कंट्रोल’ (नियंत्रण), ‘कॉम्प्युटर्स’ (संगणक), ‘कम्युनिकेशन’ (संवाद) आणि ‘इंटेलिजन्स’ (गुप्तचर) (C4-I) ‘कंट्रोल सेंटर’ (नियंत्रण कक्ष) आहे. तळावरील तांत्रिक पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर), रडार्स आणि शस्त्रास्त्रांचे साठे ही भारतीय वायूसेनेची लक्ष्ये होती. भारताने प्रामुख्याने ‘ब्राह्मोस’ हे क्षेपणास्त्र वापरले होते. आंतरराष्ट्रीय उपग्रह छायाचित्रांच्या अभ्यासातून असे आढळले की, ९ मेच्या रात्री या C4-I सेंटरच्या ‘एच्-व्हॅक्स’च्या ४५ सेंटिमीटर्स व्यासाच्या अरुंद व्हेंटमधून ‘क्रूझ क्षेपणास्त्र/बाँब्स (Long range, advanced GPS-guided version of Israeli SPICE 2000-MPR) कौशल्यपूर्वक ‘हायप्रिसिशन’ने डागून खोलांत स्फोट करण्यात आले. उपलब्ध असलेल्या अनेक उपग्रह छायाचित्रांपैकी निवडक चित्रे प्रेक्षकांच्या माहितीसाठी येथे दिली आहेत.
त्या क्षेपणास्त्रांमधील किंवा बाँबमधील स्फोटकांमुळे संपूर्ण ‘C4-I कंट्रोल सेंटर’, त्यांतील सर्व मशिनरी, साहित्य आणि माणसेसुद्धा नष्ट झाली. दफन करण्यास मानवी शरिरांचे अवशेषही उरले नाहीत. पाकिस्तानी हवाई सुरक्षेचे नियंत्रण कक्ष (C4-I) पूर्णतः बंद पडले. प्रारंभीला वाटले होते, त्यापेक्षाही प्रचंड हानी झालेली होती. लोकांना कळले, तर नाचक्की होईल म्हणून ढिगार्यातून मृतांची शवेसुद्धा बाहेर काढायची नाहीत, असे पाकिस्तानी शासनाने ठरवले आणि ‘अर्थमूव्हर्स’सारखी मशिन्स (बुलडोझर वा अन्य तत्सम यंत्रसामुग्री) लावून उद्ध्वस्त अवशेष जागच्या जागी दाबून आक्रमणाचा पुरावा नष्ट केला. या आक्रमणाने ‘C4-I कंट्रोल सेंटर’मधील तज्ञ मारले जाऊन पूर्ण हवाई सुरक्षेचा नियंत्रण कक्ष निष्प्रभ झाला. कष्टपूर्वक भूमीखाली बांधलेला अभेद्य गड हा कौशल्यपूर्वक अचूक आक्रमण करून भारतीय वायूसेना लीलया नष्ट करू शकते, हे पाहून पाकिस्तानी सेनादल आणि शासन यांचे मनोबल खच्ची झाले. पाकिस्तानी शासनाला लकवा मारला गेला. त्यांनी मृतांना बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला नाही; कारण मृत शवेच नव्हती. सैनिक पडले, तर सैन्यदलांमध्ये नवे सैनिक भरती करता येतात; परंतु जेव्हा कुठलाही माग न रहाता वरिष्ठ तज्ञ अधिकारी दिसेनासे होतात, तेव्हा मागे राहिलेल्यांच्या मनात पराभवासह भयंकर भय निर्माण होते. रणांगणावरून परतणारी शवे हा युद्धामधील सगळ्यांत भयानक प्रसंग असतो; परंतु येथे त्यापेक्षाही भयानक स्थिती दिसत होती, भारतीय वायूसेनेने पाकिस्तानी हवाई सुरक्षा नियंत्रण कक्ष असे नष्ट केले की, त्यातील तज्ञ अधिकार्यांसह सर्व काही क्षणांत हवेमध्ये विरून गेले. जनाजा (अंत्ययात्रा) नाही, हुतात्मा नाहीत, मजार नाहीत, केवळ कुजबूज शिल्लक राहिली. प्रत्यक्ष आक्रमणानंतर ४ दिवसांनी बहुतेक कुटुंबियांशी चर्चा करून सरकारने यंत्रे लावून ढीग जागच्या जागी दाबून सर्व पुरावा नष्ट केला. उपग्रह छायाचित्रांमध्ये ते स्पष्ट दिसत आहे. हा आहे ‘ऑपरेशन सिंदूर’चा परिणाम !
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– विंग कमांडर विनायक पु. डावरे (निवृत्त), पुणे (१२.६.२०२५
संपादकीय भूमिकाकपटी पाकमधील आतंकवादी आणि सैन्य तळ भारताने समूळ नष्ट करून पाकला अद्दल घडवावी, ही जनतेची अपेक्षा ! |