सत्संगात नसलेल्यांची स्थिती भरकटलेल्या पतंगासारखीच – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास

नगर – सत्संगात रहाणारे सत्कार्यच करतात. सत्संगात नसलेल्यांची स्थिती भरकटलेल्या पतंगासारखीच असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांनी केले. येथील नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याचे सहावे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. श्रीमान रेवतीनंदन दास पुढे म्हणाले की, जीवन मनमानी पद्धतीने घालवतात त्यांना सद्गती मिळत नाही. जीवन सार्थकी होण्यासाठी आपल्या पिढीजात परंपरा श्रध्देने जतन कराव्या. संतांचा सत्संग आणि गुरूंचे सानिध्य मिळवावे. गुरू आपल्या सानिध्यातील कुणालाही कधीही भरकटू देत नाहीत. गुरू वैयक्तिक मार्गदर्शन करत उद्धाराचा मार्ग दाखवतात.

यावेळी इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक गिरीवरधारी दास, वैष्णवतोष्णी दास, डॉ. सतीश फाटके, अशोक कानडे, मदन कांबळे, डॉ.सौ. अंजली फाटके, सौ. वंदना कानडे, मदनभाई पटेल, मिलिंद चवंडके, बाली जोशी, राजूभाई पटेल, डॉ. विजय भंडारी, मदन थोरात यांच्यासह शहरातील विविध भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

सत्संग आसक्ती घालवतो. निरंतर भगवंत कथांचे श्रवण करतांना गुरूंची वाणी ह्रदयात धारण करावी. गुरू प्रसन्न झाले की, भगवान प्रसन्न होतात. भगवंताचे नित्य गुणगान करावे. इंद्रिय निग्रह हा सदाचाराचा आधार होय. भेदभाव न करता समभाव असावा. दुसर्‍यांचे दोष पाहू नयेत. अहंकार आणि मीपणा सोडून द्यावा. आपले मन आनंदी ठेवावे. भगवंतावर विश्वास ठेवावा.

आपण धन कमावून, दान करून, पद मिळवून, प्रतिष्ठा प्राप्त करून, सौंदर्य सांभाळून भगवंताजवळ जाऊ शकत नाही तर भक्तीनेच भगवंताला आपलेसे करू शकतो. आपल्या देवघरातील देवांना प्रतिदिन नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून खाल्ल्याने बुध्दी शुद्ध होते. भगवंताच्या प्रसादाने जीवनातील अशुद्धी, अपवित्रता, पाप नाहिसे होते. आपली भक्ती लोणचे आणि गुलाबजाम सारखी मुरली पाहिजे. भक्ती धावपळीचे कार्य नाही. सत्संगाने भक्ती वृद्धींगत होऊन भगवंताची भेट घडवते, असे श्रीमान रेवतीनंदन दास यांनी सांगितले.