भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास

मार्गदर्शन करतांना  श्रीमान रेवतीनंदन दास 

नगर – भ्रमणभाषच्या जगात वावरतांना भगवान श्रीकृष्णाला विसरू नका. श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा, असे जाहीर आवाहन ज्येष्ठ ब्रम्हचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांनी केले. येथील नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याचे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. या वेळी इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक सर्वश्री गिरीवरधारी दास, वैष्णवतोष्णी दास, डॉ. सतीश फाटके, डॉ.सौ. अंजली फाटके,  अशोक कानडे, मदन कांबळे, मगनभाई पटेल, राजूभाई पटेल, मिलिंद चवंडके, बाली जोशी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीमान रेवतीनंदन दास पुढे म्हणाले की, भीष्मदेवासारखी आपली बुद्धी श्रीकृष्ण चरणी समर्पित करावी. भ्रमणभाषला बुद्धी दिलेले भ्रमणभाषच्या जगात हरवत चालल्याने मनमोहन श्यामसुंदरला विसरले आहेत. बुद्धी शुद्ध आणि पवित्र आहे. ती या जन्मातच श्रीकृष्णाला द्या. वसुदेव-देवकी यांसारखे आपले मन, बुद्धी भगवान श्रीकृष्ण चरणी समर्पित करा. श्रीकृष्ण आपल्या जीवनात आले की जीवनातील सर्व अंधःकार निघून जाईल. शरिर स्नानाने शुद्ध होते. गर्भ संस्काराने शुद्ध होतो. इंद्रिय तपाने शुद्ध होतात. दान केल्याने धन शुद्ध होते. संतोष वाटला की मन शुद्ध होते. आत्मज्ञानाने आत्मा शुद्ध-पवित्र होतो.

आज लोक अशांत आहेत.ज्या घरात भगवान श्रीकृष्णाची पूजा होत नाही, देवाचा नामजप होत नाही, देवाला प्रतिदिन नैवेद्य दाखवला जात नाही त्या घरातील सर्व नैराश्यात दिसतात. ज्या घरात नित्य देवपूजा होते, श्रध्देने देवाला नैवेद्य दाखवला जातो, देवाचा नामजप अखंड चालतो ते घर मंदिर होते. भगवंत आपल्या जवळ असल्याचा आनंद घरातील सर्वजण घेतात. शांतीचे सुख अनुभवतात. भगवंताचे नाम संकीर्तन ज्या घरात चालते त्या घराच्या परिसरातही भूत-पिशाच्च राहू शकत नाही.

भगवान श्रीकृष्ण नेहमी सकारात्मक राहिले. युध्दातही त्यांनी हसत-हसत गीता सांगितली. कठीण प्रसंगाला सामोरे जातांना विवेकाने कसे वागावे ? हे श्रीकृष्णाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. अर्जुनाच्या माध्यमातून त्यांनी आपल्यालाच मार्गदर्शन केले आहे. आजही हे मार्गदर्शन उपयुक्त ठरते म्हणून श्रीकृष्ण चरित्र कथा निरूपण सोहळ्यांचे पुन:पुन्हा आयोजन केले जाते, असे श्रीमान रेवतीनंदन दास यांनी सांगितले.