‘स्मार्ट मीटर’मुळे वीजग्राहकांना ९ महिन्यांत १ कोटी ७० लाख रुपये सवलत

स्मार्ट टीओडी मीटर

कुडाळ – राज्यातील वीज ग्राहकांना अचूक वीजदेयकासह विविध सुविधा उपलब्ध करून देणारे ‘स्मार्ट टीओडी मीटर’ महावितरणच्या वतीने बसवण्यात येत आहेत. रत्नागिरी परिमंडलातील रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख २३ सहस्र २४७, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९८ सहस्र ३३०, असे एकूण ३ लाख २१ सहस्र ५७७ ‘स्मार्ट टीओडी मीटर’मध्ये बसवण्यात आले आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यास वीजदेयकात सवलत देण्यात येते. या अनुषंगाने रत्नागिरी परिमंडलात ऑगस्ट २०२५ ते एप्रिल २०२६ या ९ महिन्यांत एकूण १ कोटी ७० लाख रुपये सवलत वीजग्राहकांना देण्यात आली, तसेच स्मार्ट मीटर बसलेल्या ग्राहकांच्या वीजदेयकाविषयीच्या तक्रारी नगण्य झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित वीज ग्राहकांनी ‘स्मार्ट टीओडी मीटर’ बसवून घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

स्मार्ट मीटरमुळे १०० टक्के अचूक वीजदेयके मिळतात, तसेच ग्राहकांना त्यांचा प्रत्येक घंट्यानुसार होणारा विजेचा वापर महावितरणच्या भ्रमणभाष ॲपवर समजतो. यामुळे अधिक पारदर्शकता निर्माण होत आहे, तसेच सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरणार्‍यांना सवलत दिली जाते. त्यामुळे या सवलतीच्या वीजदराच्या काळात अधिक उपकरणे वापरण्याचे नियोजन करणे आणि विजेचा वापर नियंत्रणात ठेवणे, असे अनेक लाभ स्मार्ट मीटरमुळे होतात. हे मीटर महावितरणकडून विनामूल्य बसवण्यात येत आहेत, असे महावितरणने कळवले आहे.