एस्.टी. बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहतुकीस प्रतिबंध

नियमांचे पालन न केल्यास कारवाईची खासगी वाहनचालकांना चेतावणी

प्रताप सरनाईक

कणकवली – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एस्.टी.चे) उत्पन्न वाढवणे, अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आणि प्रवाशांना सुरक्षित अन् दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने महामंडळाच्या बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरातून  खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना परिवहनमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ७ जून या दिवशी कणकवली बसस्थानकाच्या परिसरात मोहीम राबवून खासगी वाहतूक करणार्‍या संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. ‘सर्व खासगी वाहतूक करणार्‍यांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे अन्यथा सक्त कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाचे सुरक्षा आणि दक्षता अधिकारी महेंद्र शिवाजीराव टापरे यांनी दिली आहे.

कणकवली बसस्थानक परिसरातून प्रवासी वाहतूक करणारी ६ आसनी वाहने, ३ आसनी रिक्शा, तसेच ट्रॅव्हलर चालक यांना बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली एकत्र करण्यात आले आणि महामंडळाच्या बसस्थानकाच्या २०० मीटर परिसराच्या बाहेरून प्रवासी वाहतूक करण्याविषयीची माहिती देण्यात आली.

या वेळी कणकवली आगार व्यवस्थापक अजय गायकवाड, राखण आणि पहारा निरीक्षक सतीश तिवडे, साहाय्यक वाहतूक अधीक्षक श्रीनिवास कदम, वाहतूक नियंत्रक, सुरक्षारक्षक, तसेच कणकवली आगारातील राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.