
‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज’ (आय.आय.एस्.एस्.)ने आयोजित केलेला ‘शांग्री-ला संवाद-२०२५’ सिंगापूरमध्ये ३० मे ते १ जून २०२५ या काळात झाला. आशिया खंडातील प्रमुख देशांचे संरक्षणमंत्री या सभेमध्ये प्रादेशिक सुरक्षा क्षेत्रांत जाणवणार्या समस्यांवर चर्चा करतात. तेथे भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व भारताचे सैन्यदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केले. ‘ब्लूमबर्ग’ या वार्तासंस्थेने सिंगापूरमध्ये घेतलेल्या संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांना मुलाखतीमध्ये विचारलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मधील हानीच्या संदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देतांना जनरल चौहान म्हणाले, ‘‘On the 7th (May) and initial stages, there were losses, but the numbers, and that was not important; what was important was why did the losses occur, and what we will do after that. So, we rectified tactics and went back on the 7th, 8th, and 10th, and 10th in large numbers to hit air bases deep inside Pakistan. Penetrated all their air defences with impunity, carried out precision strikes. The Air Force went into a short mode, as to why did this happen. They rectified their tactics, and flew in again, and flew all types of aircraft, with all types of ordnances on the 10th. Most strikes were delivered with pinpoint accuracy.’’ (७ मे या दिवशी आणि आरंभीच्या टप्प्यात क्षती (हानी) झाली; परंतु संख्या किती, हे महत्त्वाचे नाही; क्षती का झाली ? आणि आम्ही त्यासंदर्भात काय करणार ? हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यानंतर आम्ही आमचे तंत्र पालटले आणि ७, ८, १० मे या दिवशी अधिक संख्येने परत रणांगणावर उतरून पाकिस्तानच्या आतमधील वायूतळांवर अचूक आक्रमण केले. असे का घडले ? याचे विश्लेषण करून आणि सुधारित तंत्र वापरून, तसेच वायूसेनेने अनेक प्रकारची विमाने आणि त्यांवरील विविध शस्त्रास्त्रे वापरून १० मे या दिवशी अनेक तळांवर आक्रमण केले. जवळजवळ सर्व आक्रमणांच्या वेळी अत्यंत अचूक मारा करण्यात आला.)

१. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी झालेल्या हानीच्या वक्तव्यावरून माध्यमांनी स्वतःच तर्क लावून स्वतःची करून घेतलेली हानी !
भारतीय वार्तापरिषदांमध्ये आतापर्यंत क्षतीबद्दल काहीच वक्तव्य नव्हते. सिंगापूरमधील ब्लूमबर्गच्या मुलाखतीमध्ये संरक्षणप्रमुख चौहान यांनी प्रथमच ‘‘There were losses’’ (क्षती (हानी) झाली होती), असे विधान केले. त्यामुळे भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्व माध्यमे (विशेषतः सामाजिक माध्यमे, वृत्तपत्रे आणि वाहिन्या) त्या विधानाचा स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावून आपापल्या धारणेनुसार त्यावर भाष्य करत आहेत. संरक्षणप्रमुखांच्या विधानातील ‘क्षती’मध्ये विमानांचा कोणताही उल्लेख नसतांना माध्यमांनी आपापले विमानांचे प्रकार सांगून त्यांची संख्यासुद्धा स्वतःच ठरवली. ‘शांग्रि-ला संवाद’सारख्या जागतिक मंचावर मुलाखत देतांना भारताचे संरक्षणप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी अतिशय समर्पक आणि सयुक्तिक भाष्य केल्याविषयी त्यांचे अभिनंदन करायला हवे. क्षतीला महत्त्व न देता ‘क्षती का झाली ? आणि आम्ही त्याविषयी काय करणार?’ याचे महत्त्व त्यांनी जागतिक मंचाला आणि विशेषतः जागतिक माध्यमांना समजावून संगितले. वास्तविक भारतीय सशस्त्र सेनादलांमध्ये अशी प्रक्रिया ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ (एस्.ओ.पी.) पद्धतीने पुष्कळ पूर्वीपासून वापरली जाते.
२. वायूदलप्रमुख अमरप्रीत सिंह यांच्या विमानांच्या संदर्भातील वक्तव्याचा माध्यमांनी काढलेला चुकीचा निष्कर्ष

अजून एक वादग्रस्त सूत्र गेल्या काही दिवसांमध्ये माध्यमांच्या चर्चेमध्ये आले. भारतीय वायूदलप्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांनी वायूसेनेसाठी बनवल्या जाणार्या विमानांच्या ‘डिलिव्हरी’मध्ये झालेल्या विलंबाविषयी भाष्य केले होते. संरक्षण साहित्य उत्पादनाच्या संदर्भात भारतातील राजकीय नेतृत्वाची उदासीनता ७ दशकांची आहे; परंतु तिचे खापर सध्याच्या शासनाच्या माथी फोडण्याचा प्रयत्न काही माध्यमे करत आहेत. वास्तविक माध्यमांच्या अशा भूमिकेमुळे भारतीय सशस्त्र सेनादलांच्या नेत्यांच्या खुल्या चर्चेला बाधा येते. संरक्षण साहित्य उत्पादनाचा दुसर्या महायुद्धापासूनचा इतिहास पाहिल्यावर लक्षात येते की, खासगी उद्योगक्षेत्राच्या सहयोगाविना संरक्षण साहित्य उत्पादनाला योग्य तो वेग येत नाही. वायूदलप्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांना त्यांच्या भाष्याद्वारे हेच सुचवायचे होते.

या संदर्भात वर्ष १९७१ च्या १३ दिवसांच्या युद्धामध्ये पाकिस्तानचा सपशेल पराभव करून ९३ सहस्र पाकिस्तानी सैन्याला शरण आणणारे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी सांगितलेली आठवण उद्धृत करावीशी वाटते. शिमला करारानंतर पाकिस्तानी शासनाने फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना पाकिस्तानात आमंत्रित केले होते. भारतीय शासनाच्या संमतीने फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ पाकिस्तानचा यशस्वी दौरा करून परतले. अनेक वर्षांनंतर त्या दौर्यातील एक प्रसंग त्यांनी एका मुलाखतीत वर्णन करून सांगितला होता. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या सन्मानार्थ पाकिस्तानी पंजाब प्रांताचे गव्हर्नर यांनी लाहोरमध्ये एक मेजवानी दिली होती. त्या वेळी गव्हर्नर यांनी फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना विचारले, ‘‘आमच्या काही सैनिकांचे वडील आपली भेट घेऊ इच्छितात. आपण त्यांना भेटाल का ?’’ भेटल्यानंतर त्या पाकिस्तानी सैनिकांच्या वडिलांनी आपापली पागोटी फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या पायावर ठेवून नमस्कार केला. कारण विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘आमची मुले तुमचे (भारताचे) युद्धकैदी असतांना तुम्ही त्यांची स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घेतली, त्याबद्दल धन्यवाद !’’ फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचे उत्तर होते, ‘‘शत्रूचे असले तरी, तेही सैनिक आहेत. स्वदेशासाठी ते प्राणपणाने लढले. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवलाच पाहिजे.’’ एकीकडे शत्रूसैनिकांच्या वडिलांच्या भावना इतक्या उदात्त, तर स्वदेशी (तत्कालीन भारत) सरकारने अनेक वर्षे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना त्यांचे निवृत्ती वेतनही दिले नव्हते. पुढे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ मृत्यूशय्येवर असतांना राष्ट्रपती अब्दुल कलाम त्यांच्या आज्ञेवरून त्यांना त्यांचे अनेक वर्षांचे निवृत्ती वेतन देण्यात आले. हा इतिहास आहे.

३. सैनिकी नेतृत्वाचा सन्मान करण्यातील न्यूनता
युद्धकाळामध्ये भारतीय सैनिकांची आठवण काढली जाते; मात्र एरव्ही सैनिकांबद्दल अनास्थाच दिसते. भारतातील संसदेच्या काही प्रतिनिधींनी तर सैनिकांविषयी अनुद्गार काढल्याचे सर्वश्रुत आहे. ‘भारतियांनी अनेक उत्तम विदेशी प्रघात (पद्धती) आत्मसात केले; परंतु सैनिक आणि सैनिकी नेतृत्व यांचा सुयोग्य सन्मान करण्याची संस्कृती आत्मसात करण्यात न्यूनता राहिली’, असे वाटते.
४. सैनिकी नेत्याचे प्रसारमाध्यमांना विनम्र निवेदन
वर्ष १९६५ आणि १९७१ च्या युद्धांत सक्रिय सहभाग घेतलेला सैनिकी नेता म्हणून लेखक एक खुलासा करू इच्छितो की, सैनिकी नेत्यांची विधाने सरळ आणि थेट हृदयापासून आलेली असतात. त्यांना राजकीय नेत्यांसारखी विधाने करता येत नाहीत. त्यांच्या विधानांचे हवे तसे अर्थ न लावता त्यांना ‘सरळ आणि थेट हृदयापासून आलेली’ याच संदर्भाने पहावे.
‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावर सर्वप्रथम सनसनाटी वार्ता देऊन वाहिनीचा ‘टी.आर्.पी.’ (टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट) कसा वाढवावा ? याचा विचार विविध माध्यमे निश्चितच करत असतील. त्यांना विनंती आहे की, आपापल्या धारणा स्वतःजवळ ठेवून सत्य समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करावा.
– विंग कमांडर विनायक पु. डावरे (निवृत्त), पुणे.
संपादकीय भूमिका
|
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
Nepal Chinese Cameras : नेपाळने भारताच्या सीमेवर बसवले चिनी कॅमेरे !