Miguel Uribe Shot : कोलंबिया : राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार मिगुएल उरिबे गोळीबारात गंभीररित्या घायाळ !

मिगुएल उरिबे यांच्यावर गोळीबार

बोगोटा (कोलंबिया) – दक्षिण अमेरिका खंडातील कोलंबिया देशात पुढील वर्षी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका होत आहेत. पदाचे संभाव्य उमेदवार मिगुएल उरिबे यांच्यावर ७ जूनला फोन्टिबोन जिल्ह्यात झालेल्या एका प्रचार सभेच्या वेळी गोळीबार झाला. एका शस्त्रधारी व्यक्तीने त्यांना मागून गोळ्या घातल्या. ३९ वर्षीय उरिबे यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी आक्रमणकर्त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या आक्रमणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

उरिबे कोलंबियाचे माजी राष्ट्राध्यक्ष अल्वारो उरिबे यांनी स्थापन केलेल्या ‘कंझर्व्हेटिव्ह डेमोक्रॅटिक सेंटर’ या पक्षाचे सदस्य आणि खासदार आहेत. कोलंबिया सरकारने या आक्रमणाचा निषेध करत एक निवेदन प्रसारित केले आहे. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी ‘एक्स’वर या घटनेवरून दुःख व्यक्त केले आहे.