‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील १८.५.२०२५ या दिवसाच्या प्रथम सत्राचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

१७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फर्मागुडी (फोंडा, गोवा) येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.              (भाग १)

सुश्री (कु.) मधुरा भोसले

१. श्री. अभय वर्तक (सनातन संस्थेचे प्रवक्ते) यांनी सनातन संस्थेच्या दैदीप्यमान कार्याविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन 

श्री. अभय वर्तक

‘मला श्री. अभय वर्तक यांच्या हृदयात गुरुकृपायोगाचे बोधचिन्ह दिसले. याचा भावार्थ भगवंताने पुढीलप्रमाणे उलगडून सांगितला, ‘अभयदादा हे मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दैवी कार्याचा महिमा सांगून त्यांची कीर्ती संपूर्ण विश्वात पसरवणारे त्यांचे समष्टी प्रवृत्तीचे प्रिय शिष्य आहेत. त्यांच्यातील विनम्रभाव, कृतज्ञताभाव आणि शिष्यभाव यांमुळे त्यांच्या हृदयात सतत गुरुदेवांचा वास आहे. त्यांनी भावपूर्णरित्या धर्मसेवा करून श्री गुरूंचे मन जिंकले आहे. त्यामुळे त्यांच्यावर श्री गुरूंची अखंड कृपा असून त्यांच्या भोवती पिवळ्या रंगाचे गुरुकृपेचे अभेद्य संरक्षककवच आहे.’

२. ‘हिंदु जनजागृती समितीने सनातन राष्ट्राच्या दिशेने टाकलेले पाऊल’, याविषयी श्री. रमेश शिंदे (राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती) यांनी केलेले मार्गदर्शन 

श्री. रमेश शिंदे

श्री. रमेश शिंदे यांच्यामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीचा हनुमानासारखा दास्यभाव आणि हिंदु राष्ट्राप्रतीच्या दैवी कार्याविषयी सेवाभाव जाणवतो. त्यांच्यामध्ये व्यष्टी स्तरावर श्री गुरूंप्रतीचा शरणागतभाव आणि समष्टी स्तरावर धर्माप्रतीचा क्षात्रभाव अन् वीरभाव जाणवतो. त्यांचे विचार तेजस्वी असल्याने त्या विचारांतून हिंदु राष्ट्राचे महत्त्व अत्यंत सुस्पष्टरित्या, नेमकेपणाने आणि प्रभावीपणे श्रोत्यांपर्यंत पोचले. त्यांनी या कार्यक्रमाद्वारे सनातन राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांनी शंखनाद केल्याचे सूत्र सांगितले. तेव्हा सर्व श्रोत्यांच्या मनात या शंखनादाचा ध्वनी प्रतिध्वनीत होऊन प्रत्येकाच्या अंतःकरणातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा जयघोष झाला. श्री. रमेश शिंदे हे हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आवश्यक असणार्‍या क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज या दोन्ही तेजांनी युक्त असणारे प्रखर धर्मवीर योद्धा आहेत.

३. केशरी रंगाचे महत्त्व श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी अत्यंत सुंदररित्या विशद करणे

श्री. विनायक शानभाग

केशरी रंग हा हिंदुत्वाशी संबंधित आहे. ज्याप्रमाणे महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्णाच्या रथावर हनुमानाचे चिन्ह अंकित असलेला केशरी रंगाचा कपिध्वज होता, तसाच ध्वज घेऊन हनुमान प्रभु श्रीरामस्वरूप आणि भगवान श्रीकृष्णस्वरूप असणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दिव्य जन्मोत्सवाच्या कार्यक्रमस्थळी आला. त्याने व्यासपिठाच्या वरील बाजूस केशरी रंगाचा कपिध्वज सूक्ष्मातून स्थापन केला. त्यामुळे धर्मवीर-योद्ध्यांनी अधर्माशी झुंजण्यासाठी रणशिंग फुंकले, तसेच सूक्ष्मातून देवतांनी असुरांशी युद्ध करण्यासाठी शंखनाद केला.

४. ‘काशी आणि मथुरा मुक्ती अभियान’, याविषयी अधिवक्ता विष्णु शंकर जैन (सर्वोच्च न्यायालय) यांनी केलेले अनुभवकथन

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

अधिवक्ता विष्णु शंकर जैन हे धर्माच्या ज्ञानतेजाने संपन्न असून आणि धर्मरक्षण करणारे क्षात्रवीर धर्मयोद्धा-अधिवक्ता आहेत. त्यांच्या मनात हिंदु धर्माप्रती नितांत आदरभाव असल्यामुळे देवाच्या कृपेने त्यांना सातत्याने धर्मरक्षणाचे कार्य प्रदीर्घ काळ करण्याची सात्त्विक प्रेरणा आणि दैवी ऊर्जा मिळते. त्यांनी अत्यंत कृतज्ञताभावाने श्री गुरूंची कृपा अनुभवली आहे. श्री गुरूंचे दैवी बळ त्यांच्या पाठीशी असल्यामुळे ते सनातन हिंदु धर्माचे न्यायालयीन कार्य तीव्र विरोधातही यशस्वीपणे करत आहेत. यातून ‘न्यायालयीन लढ्यामध्येही आध्यात्मिक स्तरावर धर्मकार्य कसे होते ?’, हे सूत्र मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. त्यांनी धर्माच्या बिकट परिस्थितीची उदाहरणे सांगितली आणि उपस्थित धर्माभिमान्यांना क्षात्रतेजाने ओथंबलेल्या वाणीत धर्मावरील संकटांविषयी जागृत केले. त्यामुळे धर्माभिमान्यांना अधिक गांभीर्याने आणि संघटितरित्या वैचारिक अन् सांघिक स्तरांवर धर्मरक्षण करण्याची प्रेरणा मिळाली.

५. ‘भारतीय संस्कृतीचे रक्षण करून सनातन राष्ट्राची निर्मिती’, याविषयी श्री. उदय माहुरकर (माजी सूचना आयुक्त, भारत सरकार) यांनी केलेले मार्गदर्शन 

श्री. उदय माहुरकर

श्री. उदय माहुरकर हे धर्मनिष्ठ आणि सात्त्विक प्रवृत्तीचे श्रेष्ठ विचारवंत अन् संशोधक वृत्तीचे इतिहासकार आहेत. ते प्रसारमाध्यमांद्वारे वैचारिक स्तरावर हिंदूंमध्ये जागृती निर्माण करतात, तसेच ते सांस्कृतिक आतंकवादी, राष्ट्रद्रोही आणि धर्मविरोधी व्यक्ती अन् संघटना यांच्याशी वैचारिक युद्धही करतात. ते ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक, तसेच संविधानिक मार्गाने धर्मावरील आघातांशी लढणारे योद्धा आहेत.

६. ‘सनातन राष्ट्राच्या शत्रूंचा बोध’, याविषयी श्री. नीरज अत्री (अध्यक्ष, नॅशनल सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च अँड ॲनालिसीस, चंदीगड) यांनी केलेले विवेचन 

श्री. नीरज अत्री

श्री. नीरज अत्री यांनी हिंदुत्वाला विरोध करणार्‍या आणि असत्यावर आधारित असलेल्या एका पंथाच्या सणांची उदाहरणे देऊन त्यांतील फोलपणा वस्तूनिष्ठ अन् अभ्यासपूर्ण माहितीद्वारे विशद करून त्यांचा खोटारडेपणा उघड केला. यावरून त्यांच्यातील ‘सत्यशोधक आणि अभ्यासू वृत्ती’, तसेच ‘तत्त्वनिष्ठ राहून अभ्यासपूर्ण माहिती देऊन हिंदूंना जागृत करण्याची तीव्र जिज्ञासा अन् तळमळ’, हे गुण प्रकर्षाने जाणवले. त्यांच्याकडे शब्दांची तलवार आणि विचारांचे शस्त्र असून ते बौद्धिक स्तरावर धर्मरक्षणाचे कार्य प्रभावीपणे करतात.

७. ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, या ई-बुकचे प्रकाशन 

राजकीय, धार्मिक आणि संविधानिक स्तरांवर हिंदु राष्ट्राच्या आवश्यकतेचे सुरेख विवेचन या ग्रंथात केले आहे. जेव्हा हा ग्रंथ प्रकाशित झाला, तेव्हा त्यातून धर्मशक्तीच्या केशरी रंगाच्या लहरी आणि भगव्या रंगाच्या प्रकाशझोतातून धर्मतेज प्रगट होऊन कार्यक्रमस्थळी पसरले. त्यामुळे उपस्थित असणार्‍या सर्वांनी हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी कटीबद्ध रहाण्याचा संकल्प केला.’

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.