‘कोविड’ महामारीचा विषाणू आता आपल्यासह रहाणार आहे आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळणार, तेव्हा तेव्हा तो डोके वर काढणार. ज्या वेळी ‘कोविड’ महामारी वाढत आहे’, अशा बातम्या दिसतील, तेव्हा घाबरून न जाता सावध होणे आवश्यक आहे. या आजाराच्या कटू आठवणी मागे टाकून मनातील भीतीवर मात केली पाहिजे. ‘कोविड’ला आता घाबरण्याची आवश्यकता नाही; कारण आता हा नूतनविषाणू नाही.
सिंगापूर, थायलंड या देशांत सध्या ‘कोविड’ रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. भारतातही महाराष्ट्रासह अनेक राज्यांत ‘कोविड’ रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे माध्यमांद्वारे ‘सावधान, तो पुन्हा आला आहे’, ‘कोविड वाढत आहे’, ‘कोविडची लाट येईल का ?’, अशा बातम्या आपल्या कानावर पडत आहेत.
‘कोविड’ हा शब्द जरी उच्चारला, तरी मनात भीती निर्माण होते. भीती वाटणे अगदी साहजिक आहे; कारण वर्ष २०२० ते वर्ष २०२२ या काळात ‘कोविड’ची महाभयानक साथ आपण अनुभवली आहे; पण आपण एक लक्षात घ्यायला हवे की, ‘कोविड’ पूर्णपणे संपलेला नाही. केवळ त्याची तीव्रता न्यून झालेली आहे. त्यामुळे ‘कोविड परत आला आहे’, असे म्हणणे चुकीचे आहे; कारण ‘कोविड’ इथेच आहे, केवळ त्याचे स्वरूप पालटले आहे.
१. जगात स्थिरावलेला विषाणू
कोविड महामारी आता आपल्यासाठी नवीन नाही. गेल्या ५ वर्षांपासून कोविड आपल्या आयुष्यात आहे. सर्व देशांनी कोविडला ‘एन्डेमिक’ (स्थानिक) म्हणून घोषित केले आहे. हा आजार पूर्ण वर्षभरात जेव्हा त्याला संधी मिळते, तेव्हा डोके वर काढतो. आता कोविड रुग्णांची संख्या वाढते आहे, म्हणजे त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारची संधी मिळाली आहे. सध्या वाढलेले पर्यटन, सुट्टीचा कालावधी किंवा पर्यावरणातील पालट ही कारणे असू शकतात अथवा विषाणूच्या प्रचलित उपप्रकारामध्ये ‘म्युटेशन’ (उत्परिवर्तन) झाल्याने नवा उपप्रकार निर्माण झालेला असू शकतो. थोडक्यात काय, तर कोविड महामारी ही अधूनमधून डोके वर काढणार, हे निश्चित आहे. त्यामुळे कोविडसह जगण्याची मानसिकता आपण सिद्ध करायला हवी. कोविडसह, म्हणजे त्या महामारीला न घाबरता समजून घेऊन जगायचे. कोविडसंबंधी ज्या बातम्या येतात, त्या आपल्याला सावध करण्यासाठी असतात. त्या बातम्या ऐकल्यावर भीती वाटायला नको, उलट ‘बरे झाले समजले. आता मी काळजी घेईन’, असा विचार मनात यायला हवा; कारण काळजी घेणे हे अतिशय सोपे आहे.
२. ‘जे.एन्.१’ विषाणू काय आहे ?
‘जे.एन्.१’ म्हणजे जगभरात पसरलेला कोविडचा एक उपप्रकार. सिंगापूरमध्ये ‘जे.एन्. १’ यासह ‘एल्.एफ्. ७’ आणि ‘एन्.बी.१.८.१’ असे अजून उपप्रकार आढळून आले आहेत. या सर्व उपप्रकारांची शक्ती अशी आहे की, ‘इम्युनिटी’पासून (प्रतिकारशक्तीपासून) लपून शरिरावर आक्रमण करण्याची क्षमता यांच्यात अधिक आहे. यामुळे यांचा प्रसार लवकर होतो आणि रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते. सध्या जगभरामध्ये ‘एन्.बी.१.८.१’चे प्रमाण वेगाने वाढतांना दिसत आहे.
वर्ष २०२१ ते २०२२ या काळात ‘डेल्टा’ प्रकाराची मोठी लाट आली होती. त्यानंतर जी लाट आली ती ‘ओमायक्रॉन’ या उपप्रकाराची होती. ‘ओमायक्रॉन’ या उपप्रकारात सहसा गंभीर लक्षणे दिसत नाही. ज्यांना लक्षणे दिसतात त्यांच्यामध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे जाणवतात. सध्याचा ‘जे.एन्.१’ हा ‘ओमायक्रॉन’चा उपप्रकार आहे. ऑगस्ट २०२३ पासून हा विषाणू फिरत आहे. हा सौम्य लक्षणांचा आजार आहे. यात मृत्यूचा धोका न्यून असतो; पण ज्यांना अन्य आजार आहेत किंवा लहान मुले, वयस्कर व्यक्ती आहेत आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती अल्प आहे, अशांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
लेखिका : डॉ. प्रिया देशपांडे, एम्.डी. (रोगप्रतिबंधकशास्त्र तज्ञ), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज.
(साभार : साप्ताहिक ‘विवेक, मराठी’, ३१.५.२०२५)
खबरदारी कशी घ्यावी ?
१. ‘कोविड’ महामारी हातावरून किंवा हवेतून शरिरापर्यंत पोचते. त्यामुळे हातांची काळजी घेणे आणि हात तोंडाजवळ न नेणे, हे उपाय महत्त्वाचे आहेत. हात स्वच्छ कसे रहातील, याची काळजी घेतली पाहिजे.
२. मुखपट्टी (मास्क)चा वापर हा मुख्यतः ज्यांना सर्दी, खोकला आहे त्यांनी केला, तर अन्यांना संसर्ग होणार नाही. गर्दीच्या, विशेषतः बंदिस्त ठिकाणी जातांना खबरदारी म्हणून मुखपट्टी वापरू शकतो.
३. श्वसनसंस्थेशी निगडित आजार असेल किंवा लक्षणे जाणवत असतील, तर इतरांपासून अंतर राखावे. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
४. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, ही लक्षणे ‘कोविड जे.एन्.१’ची असू शकतात. लक्षणानुरूप उपचार आवश्यक आहेत. संसर्ग होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. धाप लागत असल्यास किंवा श्वास घ्यायला त्रास होत असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
५. कोरोनाच्या उपप्रकाराची प्रसार क्षमता पुष्कळ अधिक आहे. रूग्णाशी अगदी छोटा संपर्क आला, तरी संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे या प्रकारात रुग्णसंख्या वेगाने वाढतांना दिसते. संसर्ग टाळण्यासाठी ‘इम्युनिटी’चा उपयोग होत नाही; मात्र गंभीर आजार टाळण्यासाठी नक्कीच होतो. या उपप्रकारामुळे ‘लाँग कोविड’ होण्याचा धोका असतो आणि शरिरातील इतर अवयव बाधित होण्याची शक्यता असते. त्यामुळे संसर्ग टाळणे आवश्यक आहे.
६. अन्य देशांनी ‘ओमायक्रॉन’साठी लस सिद्ध केली आहे. भारतातील लस ही ‘ओमायक्रॉन’साठी नव्हती. त्यामुळे सरकारकडून काही सूचना येत नाही, तोपर्यंत घाबरण्याची आवश्यकता नाही. सरकारच्या सूचनांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
आताच्या परिस्थितीवर सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. सरकारकडून ज्या काही सुरक्षेच्या उपाययोजना किंवा सूचना सांगितल्या जातील, त्याचे तंतोतंत पालन केले पाहिजे. ‘कोविड’चे परिणाम शरिरातील विविध अवयवांवर होत असल्याने संसर्ग होण्याची वाट पहाण्यापेक्षा आधीच काळजी घेणे चांगले आहे.
– डॉ. प्रिया देशपांडे
(साभार : साप्ताहिक ‘विवेक, मराठी’, ३१.५.२०२५)

अन्न-औषध विभागाकडून राज्यभरात गुटखामाफियांवर धाडी !
स्तनदुखी आणि स्तनातील गाठी : कारणे अन् आयुर्वेदाचा दृष्टीकोन
रत्नागिरी जिल्ह्यातील ८७ सहस्र ८६२ नागरिक तंबाखूमुक्त !
भिवंडीत ‘मिथेनॉल’चा ५ सहस्र ९२९ किलो साठा जप्त !
‘धूम्रपान करणे’ याचा साधकाच्या कुंडलिनी चक्रांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होणे
आयुर्वेदातील वात, पित्त आणि कफ समजून घ्या !