आषाढी वारीच्या मार्गात प्रथमोपचार सुविधा, औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध !

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग सज्ज !

पुणे – आषाढी वारीनिमित्त वारकरी, भाविक यांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. वारीच्या मार्गात प्रत्येक ५ कि.मी. अंतरावर प्रथमोपचार सुविधा, औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुणे, सातारा, सोलापूर आणि पंढरपूर परिसरात वारकर्‍यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार्‍या वैद्यकीय सुविधा, प्रथमोपचार केंद्रे, रुग्णवाहिका सेवा, औषधसाठा, मनुष्यबळ नियोजन आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

बैठकीला सहसंचालक डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, पुणे विभागाचे उपसंचालक भगवान पवार, तसेच पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील वरिष्ठ आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि ‘१०८ रुग्णवाहिका सेवे’चे प्रतिनिधी उपस्थित होते.

वारीच्या मार्गावरील प्रमुख मुक्कामस्थळी उष्माघात, निर्जलीकरण, पायांच्या जखमा, तसेच संसर्गजन्य आजारांवर तातडीने उपचार करण्यासाठी विशेष वैद्यकीय पथके तैनात करण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेवरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसादासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.