परस्परावलंबनाचा बोध देणारा ‘योग’ !

काल, २१ जून या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ झाला. त्या निमित्ताने...

१. प्रत्येक व्यक्ती सृष्टीशी जोडलेली असणे

आपण स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगत असलो, तरी प्रत्यक्षात आपण एकमेकांशी आणि संपूर्ण सृष्टीशी अदृश्यपणे जोडलेले आहोत. आपण अनेकदा ‘स्वावलंबन’ या शब्दाचा अभिमानाने उल्लेख करतो. स्वावलंबन आवश्यकही आहे; पण जीवनाचा सखोल अभ्यास केल्यास एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे पूर्णपणे स्वावलंबी असे कुणीही नाही. आपण घेत असलेला प्रत्येक श्वास झाडांवर अवलंबून आहे. आपण खात असलेले अन्न शेतकर्‍यांवर अवलंबून आहे. आपण वापरत असलेली प्रत्येक वस्तू असंख्य लोकांच्या श्रमांवर अवलंबून आहे. आपल्या जन्मापासून ते आजपर्यंत आपण सहस्रो लोकांच्या योगदानामुळे उभे आहोत, तरीही आपण अनेकदा स्वतःला स्वतंत्र आणि वेगळे समजतो. योग याच भ्रमाला आव्हान देतो.

२. प्रत्येकाचे कार्य एकमेकांविना अपूर्णच !

योगातील ‘एकत्व’ ही संकल्पना मला नेहमी आकर्षित करते; कारण ती केवळ आध्यात्मिक विचार नाही, तर ती जीवनाचे वास्तव आहे. आपल्या शरिराकडे पाहूया. हृदय, फुप्फुसे, मेंदू, यकृत, मूत्रपिंड असा प्रत्येक अवयव वेगळा आहे. प्रत्येकाचे कार्य वेगळे आहे; पण त्यांचे अस्तित्व एकमेकांविना अपूर्ण आहे. हृदय कितीही शक्तीशाली असले, तरी फुप्फुसांविना ते टिकू शकत नाही. मेंदू कितीही बुद्धीमान असला, तरी रक्तपुरवठ्याविना त्याचे अस्तित्व अशक्य आहे. एका अवयवाचे दुःख संपूर्ण शरीर अनुभवते. एका अवयवाचे आरोग्य संपूर्ण शरिराला बळ देते. हेच तर परस्परावलंबन आहे.

३. सक्षम होण्यासह संवेदनशीलताही हवी

आजच्या जगात आपण व्यक्ती म्हणून अधिक सक्षम झालो आहोत; पण समाज म्हणून अधिक संवेदनशील झालो आहोत का ? तंत्रज्ञानाने आपल्याला जोडले आहे; पण मनाने आपण किती जोडलेलो आहोत ? योगातील करुणा, म्हणजे केवळ दया नव्हे. करुणा, म्हणजे दुसर्‍याच्या अस्तित्वाशी स्वतःला जोडून पहाण्याची क्षमता ! दुसर्‍याचे दुःख पाहून अस्वस्थ होणे. दुसर्‍याच्या आनंदात आनंद अनुभवणे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘मी आणि इतर’ यांच्यातील भिंती हळूहळू विरघळू लागणे.

४. संसाधनांचा आदर करा

आज समाजातील अनेक समस्या केवळ संसाधनांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या नाहीत. त्या संवेदनशीलतेच्या अभावामुळे निर्माण झाल्या आहेत. जेव्हा आपण स्वतःला इतरांपासून वेगळे समजतो, तेव्हा स्पर्धा वाढते. जेव्हा आपण स्वतःला निसर्गापासून वेगळे समजतो, तेव्हा शोषण वाढते. जेव्हा आपण स्वतःला समाजापासून वेगळे समजतो, तेव्हा उदासीनता वाढते; पण जेव्हा जोडलेपणाची जाणीव निर्माण होते, तेव्हा वर्तन पालटते. मग साहाय्य करणे, हे दायित्व होते. संसाधनांचा आदर करणे, हा संस्कार होतो.

५. योग हा तुटलेपणा न्यून करण्याचा प्रयत्न

माणूस मूलतः वाईट नसतो. अनेकदा तो केवळ तुटलेला असतो. स्वतः, समाज, कुटुंब यांच्यापासून, तसेच जीवनाच्या मूळ अर्थापासून तुटलेला असतो. योग हा तुटलेपणा न्यून करण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा एखादी व्यक्ती शांतपणे ध्यानात बसते, तेव्हा ती हळूहळू स्वतःशी जोडली जाते. त्यानंतर ती इतरांना अधिक समजून घेऊ लागते. मग तिच्यात करुणा नैसर्गिकपणे विकसित होते.

६. जोडलेले रहावे !

आज जगासमोर अनेक आव्हाने आहेत. ‘आपण वेगळे आहोत’, हा समज जितका वाढतो, तितक्या समस्या वाढतात. ‘आपण जोडलेले आहोत’, ही जाणीव जितकी वाढते, तितके समाधान वाढते. योग आपल्याला याच दिशेने घेऊन जातो. तो आपल्याला सांगतो की, जीवन ही स्पर्धा नाही, तर ते सहअस्तित्व आहे.

७. समाजकल्याणाचा विचार करावा

शरिरातील कोणताही अवयव स्वतःसाठी जगत नाही. प्रत्येक अवयव संपूर्ण शरिराच्या कल्याणासाठी कार्य करतो. कदाचित् म्हणूनच शरीर जिवंत रहाते. जर प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतःपुरते न पहाता संपूर्ण समाजाच्या कल्याणाचा विचार केला, तर आपले सामूहिक जीवन अधिक निरोगी, अधिक सुसंस्कृत आणि अधिक अर्थपूर्ण होईल.

– श्री. विजयकुमार कट्टी, ठाणे