सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सर्व संकल्प, विशेषतः धर्मसंस्थापना आणि सनातन राष्ट्र स्थापना यांचे संकल्प सिद्धीस जावोत !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले ह्यांचा ८३ वा वाढदिवस

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘देहाचे वय वाढतच जाते, वाढदिवस येतच राहतात; पण व्यक्तीचा महान संकल्प त्याला आदरणीय आणि त्याच्या वाढदिवसाला स्मरणीय बनवतो. मुळात, डॉ. आठवले ह्यांनी लोकांना अध्यात्मशास्त्र शिकवण्यासाठी सनातन संस्था स्थापित केली. पण लोकांना केवळ अध्यात्मशास्त्र शिकवण्यापेक्षा त्यांना पूर्णवेळ साधनेला लावले पाहिजे आणि पूर्णवेळ साधना करण्यासाठी त्यांना निवास एवं उदरनिर्वाहाच्या चिंतेपासून दूर ठेवले पाहिजे, हे लक्षात घेऊन डॉ. आठवले ह्यांनी साधकांच्या योगक्षेमाचे दायित्व घेतले. ते केवळ साधना शिकवीत नाहीत, तर ती करवून घेतात. पुढे त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढली. आज त्यांच्या वाढदिवसाला वरील कार्याबरोबरच त्यांनी विचारांना योग्य वळण देण्यासाठी, जनमानसात भक्ती रुजवण्यासाठी, परंपरागत उच्च संस्कार रुजवण्यासाठी, हिंदुत्व जागृतीसाठी, हिंदूंना संगठित करण्यासाठी आणि धर्मसंस्थापनेसाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे विशेष स्मरण होत आहे.

भगवान् श्रीकृष्ण म्हणतात –

यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंशसंभवम् ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक ४१

अर्थ – जे जे वैशिष्ट्यपूर्ण, कांतीमान् आणि ऊर्जायुक्त अस्तित्व आहे, ते ते माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाले आहे, असे जाण.

सध्याच्या काळात तसे एक अस्तित्व म्हणजे डॉ. जयंत आठवले ! त्यांचे सर्व संकल्प, विशेषतः धर्मसंस्थापना आणि सनातन राष्ट्र स्थापनेचे संकल्प सिद्धीस जावोत.’

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

– अनंत आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे भाऊ)

शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम् ।
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये ।। – श्रीविष्णुसहस्रनाम

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अर्थ : ज्याने श्वेत वस्त्र धारण केले आहे, जो सर्व जगताला व्यापणारा विष्णु आहे, ज्याचे रूप चंद्रासमान अत्यंत प्रकाशमान आहे, ज्याच्या चार भुजा आहेत आणि ज्याचे मुखमंडल प्रसन्न, तेजोमय अन् करुणा यांनी भरलेले आहे, समस्त विघ्ने आणि बाधा यांपासून रक्षण होण्यासाठी या दिव्य श्रीविष्णुरूपाचे आम्ही ध्यान करतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण करताच वरील श्लोकाचे वर्णन त्यांच्या संदर्भात तंतोतंत खरे ठरते.

जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या चरणकमली कोटी कोटी प्रणाम !

शंखनाद महोत्सवात निद्रिस्त हिंदूंना जागृत करण्यासाठी त्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्याच्या उपायांवर विचार व्हावा ! 

फर्मागुडी, फोंडा येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव

पू. अनंत आठवले

‘सनातन राष्ट्र स्थापित व्हावे ह्या एका उद्देशाने अनेकानेक महान विभूती सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले ह्यांच्या प्रेरणेने आयोजित केलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मध्ये समविचारांनी एकत्र येत आहेत, ही अत्यंत हितकारक अलौकिक घटना शुभ संकेत देत आहे.

शंखनाद अशासाठी करावा लागत आहे की दीर्घ काळापासून हिंदूंवर, हिंदूंच्या संपत्तीवर, हिंदूंच्या देशावर, हिंदूंच्या संस्कृतीवर, हिंदूंच्या मंदिरांवर, हिंदूंच्या धर्मावर वारंवार निर्घृण आघात केले गेले आणि केले जात आहेत, तरी अनेकानेक हिंदू निद्रिस्तच आहेत. आता ह्या महोत्सवातील महनीय व्यक्तींच्या संयुक्त प्रयासाने निद्रिस्त हिंदू जागृत होवोत, जागृत हिंदू कार्यप्रवण होवोत आणि कार्यप्रवण हिंदू संगठित होवोत !

पण ह्या व्यतिरिक्त, अनेक जन्महिंदू राजकीय लाभासाठी झोपेचे सोंग घेत आहेत. आणखी अनेक जन्महिंदूंना चुकीच्या आणि आत्मघातकी विचारांचे बाळकडू पाजले गेल्याने ते त्या अयोग्य विचारांना योग्य समजत आहेत.

भगवान् श्रीकृष्ण सांगतात –

अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता ।
सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ३२

अर्थ – अर्जुना, तमोगुणाने वेढलेली जी बुद्धी अधर्माला धर्म मानते आणि सर्व गोष्टींचा अर्थ विपरीत (उलटाच) लावते, ती बुद्धी तामसी आहे.

आज जात्यात नसले, तरी ते सुपात आहेत, हे अशा उफराट्या बुद्धीच्या लोकांना आणि झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना कळतच नाही ! ही मंडळी शंखनादाने जागृत होण्याची संभावना नाही. अशा लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्याच्या उपायांवरसुद्धा महोत्सवात विचार व्हावा, अशी सर्व उपस्थित विद्वानांना प्रार्थना !’

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

– अनंत आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे भाऊ)