सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव
तथागत रॉय, माजी राज्यपाल, त्रिपुरा आणि मेघालय

फोंडा (गोवा) – मला अत्यानंद होत आहे की, सनातन संस्था हिंदूंच्या हितासाठी चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. बंगाल आणि शेजारील बांगलादेश येथे हिंदूंवर ज्या प्रकारे अत्याचार होत आहेत, त्याची काही गणतीच नाही. दुर्दैवाने अन्यत्रच्या हिंदूंना वाटते की, बंगालमध्ये हिंदूंच्या विरुद्ध थोडे काहीतरी, कधीतरीच घडते आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या काही प्रमाणात पक्षपात करतात. प्रत्यक्षात स्थिती पुष्कळ बिकट आहे. हत्या आणि बलात्कार हे बांगलादेशातील हिंदूंच्या कपाळावरच लिहिलेले आहे. या सर्व दृष्टीकोनातून शंखनाद महोत्सवाद्वारे सनातन राष्ट्र नि हिंदु राष्ट्राचा आवाज उठवला जाणे, हे योग्य दिशेने उचलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या अनुषंगाने आपल्याला पुढे जायचे आहे. याचे कारण हिंदु राष्ट्राविना या देशाला दुसरा पर्याय नाही, असे रोखठोक वक्तव्य त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी केले. येथे आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मध्ये त्यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना वरील वक्तव्य केले.
‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने तथागत रॉय यांना ‘हिंदु इकोसिस्टम सिद्ध करण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत’, असे म्हटल्यावर त्यांनी त्वरित म्हटले, ‘आपल्याला केवळ हिंदूंची इकोसिस्टम नाही, तर आता हिंदु राष्ट्रच हवे. त्यापेक्षा अल्प असे काहीच नको.’ त्यांच्या या वक्तव्यातून त्यांची हिंदु राष्ट्र स्थापनेप्रतीची एकनिष्ठता आणि श्रद्धा दिसून आली.
बांगलादेशासमवेत करार करून ‘चिकन नेक’ रूंद केल्यास पूर्वाेत्तर राज्यांच्या सुरक्षिततेची हमी देता येईल !
(चिकन नेक म्हणजे ईशान्य भारतातील ७ राज्यांना उर्वरित भारताशी जोडणारा अरूंद प्रदेश)
रॉय पुढे म्हणाले की, ‘चिकन नेक’च्या दोन्ही बाजूंना असलेली दोन राष्ट्रे बांगलादेश आणि नेपाळ ही अत्यंत दुर्बळ राष्ट्रे आहेत. तरीही आपल्याला सतर्क रहाणे आवश्यक आहे. असे असले, तरी बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत आहे आणि बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याकडे कानाडोळा करत आहेत. सीमा सुरक्षा दल हे थांबवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करत असले, तरी बंगाल सरकार घुसखोरांना साहाय्य करत आहे. त्यामुळेच ‘चिकन नेक’ला अधिक रूंद करायला हवे. यासाठी बांगलादेशासमवेत करार केला पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भातील एक समस्या काही वर्षांपूर्वीच दूर केली आहे, ज्या अंतर्गत बांगलादेशातील काही प्रांत हे भारतामध्ये होते, तसेच काही भारतीय प्रांत हे बांगलादेशात होते. करार करून ही समस्या सोडवण्यात आली. त्याप्रमाणेच ‘चिकन नेक’ला सशक्त करता येऊ शकते, अशी भूमिका रॉय यांनी या समस्येवर मांडली.