
भारताने पाकच्या विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकची मोठी हानी केली आहे. पाकने ती नाकारण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी जागतिक पातळीवर त्याची नोंद घेतली गेली आहे. भारताने पाकच्या २३ पैकी ११ वायूदल तळांना लक्ष्य करून ती उद्ध्वस्त केली आहेत. पाकची हवाई संरक्षण यंत्रणा, ड्रोन आणि क्षेपणास्त्रे निकामी केली. भारताने केलेली आक्रमणे मर्मभेदी होती. आतापर्यंत अशा प्रकारची आक्रमणे करणे कुणालाही १०० टक्के जमले नाही; मात्र भारताने करून दाखवले आहे. लक्ष्यित आक्रमणे करण्यात इस्रायलही भारताच्या मागे पडल्याचे म्हटले जात आहे. भारताचे कौतुक होत असतांनाच दुसरीकडे या युद्धातून भारताने चीन आणि तुर्कीये यांचे गर्वहरणही केले आहे. या दोन्ही देशांनी पाकला अनेक शस्त्रे दिली होती, जी भारताने हवेतच उद्ध्वस्त केली, उदा. तुर्कीयेने दिलेले ड्रोन, चीनने दिलेली ‘एच्क्यू-९’ ही हवाई संरक्षण यंत्रणा, ‘पीएल्-१६’ ही क्षेपणास्त्रे, तसेच पाक आणि चीन यांनी संयुक्तरित्या बनवलेली ‘जेएफ्-१७’ विमाने यांचा समावेश आहे. युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धात तुर्कीयेने युक्रेनला मोठ्या प्रमाणात ड्रोन पुरवले होते. या ड्रोनद्वारे युक्रेनने रशियाची मोठी हानी केली. रशियाला रोखून अनेक ठिकाणी माघार घेण्यास भाग पाडले. या युद्धानंतरच ड्रोनचे महत्त्व जगाला अधिक प्रखरपणे लक्षात आले आणि त्यात तुर्कीयेच्या ड्रोनला शक्तीशाली समजले जाऊ लागले. तुर्कीयेच्या ड्रोनला भारताने हवेतच उद्ध्वस्त करून जागतिक विक्रमच केला आहे. दुसरीकडे चीनच्या शस्त्रांचा या युद्धात प्रथमच वापर झाल्याने त्याची क्षमता किती निकृष्ट आहे, हे यात स्पष्ट झाले. त्यामुळे केवळ पाकलाच नव्हे, तर चीन आणि तुर्कीये या दोन्ही देशांना मोठा फटका बसला आहे. आता याचा परिणाम या दोघांच्या शस्त्रविक्रीवर होणार आहे. हे दोन्ही देश या शस्त्रांची विक्री करत होते. ही शस्त्रे किती तकलादू आहेत, हे लक्षात आल्याने आता कोणताही देश या शस्त्रांची खरेदी करणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे. चीनची लढाऊ विमाने कुचकामी आहेत, हे पूर्वीच काही देशांच्या लक्षात आले होते आणि ते प्रत्यक्षात स्पष्ट झाल्याने या विमानांना कोणतेही गिर्हाईक मिळणार नाही, असेच आता म्हटले जात आहे. अलीकडच्या काळात चीनने आफ्रिका आणि आशियातील अनेक देश यांना अल्प किमतीत शस्त्रविक्री केली होती; पण आता त्याला चाप बसणार, हे नक्की झाले आहे. जे देश चीन आणि तुर्कीये यांच्यासमवेत शस्त्रखरेदीचे करार करत होते, ते आता नव्याने मूल्यांकन करतील. ते आता दुसर्या देशांकडे वळतील आणि त्यांच्याकडून शस्त्रखरेदी करतील. ‘यात भारताचाही समावेश असणार’, असे संरक्षणतज्ञ सांगत आहेत. भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे बनवलेल्या अनेक शस्त्रांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये प्रचंड मोठी कामगिरी पार पाडली. याची गुणवत्ता आणि परिणामकारकता १०० टक्के असल्याचे दिसून आल्याने त्यांना नक्कीच जागतिक शस्त्रबाजारपेठेत मोठी मागणी असणार, हे स्पष्ट झाले आहे. विशेषतः ‘आकाश’ या हवाई संरक्षण प्रणालीचा उल्लेख महत्त्वाचा आहे. भारताने ‘आकाश’द्वारे पाकची अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांना हवेत उद्ध्वस्त केले. तसेच ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राचा पाकच्या वायूदलाची तळे उद्ध्वस्त करण्यात मोठा हात आहे. यापूर्वीच या क्षेपणास्त्रांची मागणी काही देशांकडून करण्यात आली आहे. आता अशा देशांच्या संख्येत वाढ होणार, हे वेगळे सांगायलाच नको. म्हणजे चीन आणि तुर्कीये यांची विश्वासार्हता नष्ट होऊन भारताच्या शस्त्रांकडे ओढा वाढणार आहे. ‘आकाश’, ‘ब्राह्मोस’ व्यतिरिक्त भारताचे लढाऊ विमान ‘तेजस’लाही मागणी आली, तर आश्चर्य वाटू नये.

भारतियांचाही तुर्कीयेवर वार !

भारतासाठी चीन हा शत्रू देश आहे, हे भारतियांना ठाऊक असल्याने भारतात येणार्या चीनच्या वस्तूंवर भारतियांकडून अप्रत्यक्षरित्या बहिष्कार घातला जात आहे. आता यात तुर्कीयेचेही नाव समाविष्ट झाले आहे. तुर्कीयेने भारताविरोधातील युद्धासाठी पाकला शस्त्रपुरवठा केल्याने भारतियांनी तुर्कीयेच्या वस्तूंवर बहिष्कार घालणे चालू केले आहे. ही एक अभिनंदनीय घटना आहे. भारतियांना कुणी आवाहन केलेले नसतांना अशा प्रकारची कृती स्वतःहून होणे, हे एक चांगले लक्षण आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने तुर्कीयेतून सफरचंद मागवणे बंद केले, तर उदयपूर (राजस्थान) येथील मार्बल (फरशा) व्यापार्यांनी तुर्कीयेमधून मार्बल आयात करणे बंद केले आहे. ‘प्रत्यक्ष युद्धापेक्षा व्यापारी युद्ध अधिक परिणामकारक असते’, असे म्हटले जाते. जागतिक महाशक्ती म्हणून मिरवणारी अमेरिका व्यापार युद्धच करत आली आहे. चीनही तेच करत आहे. भारतानेही आता अशा प्रकारच्या युद्धात उतरणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतियांनाच अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ते आता त्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत, ही आनंदाची घटना आहे.
पाकचे पुन्हा अमेरिकेसमोर लोटांगण ?
भारताने पाकला धडा शिकवत असतांना मध्येच युद्धविराम झाल्याने भारतियांचा हिरमोड झाला. त्यातही भारत आणि पाक यांच्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मध्यस्थी करत पहिल्यांदा याची घोषणा केल्याने अनेक भारतियांना त्याचा राग आला. दुसरीकडे या युद्धविरामाच्या माध्यमातून पाकने पुन्हा अमेरिकेसमोर लोटांगण घातल्याचे दिसून आले. पाकने अमेरिकेची साथ सोडून (कि अमेरिकेने त्याला धुडकावून लावल्याने ?) तो चीनच्या वळचणीला गेला. चीनकडून सर्व प्रकारचे लाभ पदरात पाडून घेत असतांना ऐन युद्धाच्या वेळी त्याने चीनकडे युद्ध थांबवण्यासाठी साहाय्य मागण्याऐवजी अमेरिकेसमोर लोटांगण घातल्याने चीनही संतप्त झाल्याचे म्हटले जात आहे. पाकला चीनची शस्त्रे वाचवू शकली नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष चीनही त्याला वाचवू शकणार नाही, हे त्याच्या लक्षात आल्याने त्याने अमेरिकेला हाक मारली आणि अमेरिकेने युद्ध थांबवले. ‘भारतानेही नेहमीप्रमाणेच अमेरिकेसमोर नांगी टाकली’, असे म्हटले जात आहे; मात्र यामागे भारताची कूटनीती आहे’, असेही सांगितले जात आहे. त्यातच भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ संपलेले नाही’, असे सांगितले आहे. त्यामुळे येणार्या काळात काय घडामोडी घडणार ? हे पहाणे रोचक ठरणार आहे. भविष्यात पाकची भूमिका काय असणार ? अमेरिका पाकचा वापर कसा करणार ? या स्थितीकडे चीन कसा पहाणार आणि कशी कृती करणार ? या सर्वांचा भारतावर काय परिणाम होणार ? हे आता पहावे लागणार आहे. सध्यातरी अमेरिका भारताच्या बाजूने आहे, असे दिसत असले, तरी ती पाकला तिच्या तालावर नाचवून तिचे हेतू साध्य करणार, यात शंका नाही. अमेरिका पाकच्या माध्यमातून इराणवर लक्ष ठेवेल, असे म्हटले जात आहे. जर असे झाले, तर इराणसाठी पाक हा शत्रू ठरेल आणि ते भारताच्या पथ्यावरच पडेल. भारताच्या एका ‘ऑपरेशन सिंदूर’चे हे सर्व परिणाम आहेत, हे भारतियांनी लक्षात घ्यायला हवे.
| प्रत्यक्ष युद्धासह भारताने व्यापार युद्ध लढून तुर्कीये आदी भारतद्वेषी देशांना अद्दल घडवणे आवश्यक ! |
संपादकीय : हिंदू जात्यात !
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
संपादकीय : हरवलेले समाधान !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russian President Putin