
भारतीय संरक्षण दलांनी ११ मे या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी मागील काही वर्षांमध्ये भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. प्रत्येक चलचित्र दाखवतांना भारतीय सैन्याने केलेले अचूक नियोजन आणि दाखवलेले शौर्य यांची झलक उपस्थित पत्रकारांना पहायला मिळाली. ही चलचित्रे दाखवतांना पार्श्वसंगीत म्हणून ‘शिव तांडव स्तोत्रा’ची धून वाजवण्यात आली. त्यामुळे पत्रकार परिषदेच्या सभागृहाचे वातावरण धीरगंभीर आणि क्षात्रतेजाने भारीत झाले. भारतीय सैन्याचा पराक्रम जगासमोर दाखवण्यासाठी ‘शिव तांडव स्तोत्रा’ची धून भारतीय सैन्याने का निवडली ? शिव ही लयाची देवता आहे. ध्यानस्थ शिव जेव्हा रौद्र रूप धारण करून तांडव नृत्य करतो, तेव्हा पृथ्वीच काय, अख्खे ब्रह्मांड थरथर कापू लागते. त्याचप्रमाणे शांतीप्रिय असणारा भारत जेव्हा शत्रूवर तुटून पडतो, तेव्हा शत्रूची त्रेधातिरपिट उडणारच ! भारत आता स्वस्थ बसणार नाही. भारताची सुरक्षाव्यवस्था ही शक्तीशाली आहे आणि ती कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी तत्पर आहे. ‘भारतीय सैन्य हा केवळ सैनिकांचा समूह नाही, तर भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि शिस्त ही भारतीय सैन्याची शक्ती आहे’, हा संदेश ‘शिव तांडव स्तोत्रा’ची धून वाजवून भारतीय सैन्याने जगाला दिला. या ‘शिव तांडव स्तोत्रा’चा प्रभाव एवढा होता की, दुसर्या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनीही ‘ही धून वाजवण्यामागे तुमचा उद्देश काय होता ?’, असा प्रश्न सैन्याधिकार्यांना विचारला. त्यांनीही ‘संदेश काय तो तुम्ही जाणता’, असे सांगत नंतर रामचरितमानसमधील ‘बिनय न मानत जलधि जड, गए तीनि दिन बीति । बोले राम सकोप तब, भय बिनु होइ न प्रीति ।’, या पंक्ती म्हणून दाखवल्या. ‘भीती निर्माण केल्याविना प्रेम निर्माण होऊ शकत नाही’, हा या पंक्तींचा अर्थ ! या पंक्ती म्हणून ‘आता याचना नाही, तर युद्ध होणार’, अशी गर्जनाही त्यांनी केली. या दोन्ही दिवसांच्या पत्रकार परिषदांमध्ये सैन्याधिकार्यांनी शब्दांद्वारे जे प्रहार केले, त्यातून प्रत्येक भारतियाला स्फुरण चढले असेलच; मात्र त्याहून अधिक ‘शिव तांडव स्तोत्रा’ची धून वाजवून जो शब्दातीत, तरीही गर्भित, सज्जड आणि आक्रमक संदेश शत्रूला दिला गेला, तो त्याच्या उरात नक्कीच धडकी भरवणारा आहे. भारताचा म्हणजे हिंदूंचा इतिहास हा पराक्रमाचा राहिला आहे. या पराक्रमाला साधनेचे, आध्यात्मिकतेचे कोंदण होते. त्यामुळेच त्या काळचे प्रत्येक राजे हे त्यांच्या इष्टदेवतेची आराधना करत असत. हिंदूंच्या प्रत्येक देवतेच्या हातात शस्त्र आहे. ही शस्त्रे दुष्टांच्या निर्दालनासाठी वापरली जात होती. भारतीय सैन्याच्या ताफ्यात अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत. पूर्वीच्या शासनकर्त्यांच्या काळात ‘ही शस्त्रास्त्रे केवळ संग्रहालयात ठेवण्यासाठी आहेत का ?’, असे विचारण्याची वेळ आली होती; मात्र आता हे चित्र पालटले आहे. भारतीय सैन्याने आता केवळ ‘शिव तांडव स्तोत्रा’ची धून वाजवली; मात्र ‘भविष्यात खरोखरच भगवान शिवाच्या तांडव नृत्याप्रमाणे शत्रूचा लय केला जाईल’, असा स्पष्ट संदेश शत्रूराष्ट्रांना गेला आहे.

भारतीय सैन्य आणि हिंदुत्व !
ज्या वेळी ‘राफेल’ ही लढाऊ विमाने भारतीय सैन्यात भरती झाली, तेव्हा त्यांची पूजा केली होती. त्या वेळीही अनेकांनी नाके मुरडली. ‘भारतीय सेना ‘निधर्मी’ आहे. त्यामुळे अशा प्रकारे विमानांची पूजा करून सैन्याची निधर्मी प्रतिमा पुसली जाणार’, असे भारतातील निधर्मीवाद्यांचे म्हणणे होते. या निधर्मीवादामुळे भारताची अपरिमित हानी झाली. त्याची फळे भारतीय आजही भोगत आहेत. ही निधर्मी प्रतिमा आता पुसली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सैन्याने शिवतांडव स्तोत्राची धून वाजवल्यामुळे कुणाला पोटशूळ निर्माण होण्याचे कारण नाही. मुळात ‘इस्लाम खतरे में’ची बांग देऊन जेव्हा पाकिस्तानी सैन्य भारताशी जिहाद करतो, त्या वेळी निधर्मीवादाचे पाईक असणारे कुठे असतात ? ‘पाकिस्तानी सैन्यामध्ये जिहादचा समावेश आहे’, असे पाकिस्तानी सैन्याने मान्य केले आहे. लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी ‘इमान’, ‘तकवा’ आणि ‘जिहाद’ (श्रद्धा, एकता आणि शिस्त) हे पाक सैन्याचा आधार आहेत, असे म्हणता येईल’, असे सांगितले होते. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य जर भारताच्या विरोधात जिहाद पुकारणार असेल, तर भारतीय सैन्यही ‘हर हर महादेव’ची गर्जना करत पाकिस्तानी सैनिकांवर तुटून पडले, तर ते स्वागतार्हच असणार आहे.

भारतीय सैन्यामध्ये असलेले अतुलनीय साहस जगाला ज्ञात आहे. भारतीय सैन्यातील अनेक बटालियनच्या युद्धाच्या वेगवेगळ्या घोषणा आहेत. या सर्व घोषणा उदा. ‘जय माता काली’, ‘श्रीरामचंद्र की जय’, ‘दुर्गामाता की जय’, या देवतांच्या जयजयकार करणार्या आहेत. भारतीय सैनिक पराक्रम गाजवण्यासाठी किंवा स्वतःत स्फुरण निर्माण होण्यासाठी देवतेला आळवतो. ही देवताच त्याच्यात ती शक्ती आणि आत्मबळ जागृत करते, ज्यामुळे सैनिक कितीही मोठ्या संकटाला सामोरे जाऊन विजयश्री खेचून आणू शकतात. भारतीय सैन्याला धर्माचे अधिष्ठान आहे. रामायणात वानरसेनेला धर्माचे अधिष्ठान होते, तसेच महाभारतात ते पांडवांना होते आणि आधुनिक युगात भारतीय सैन्यालाही ते आहे. इतकी वर्षे ते सुप्तावस्थेत होते. ते आता जागृत होत आहे. हे अधिष्ठान हीच भारतीय सैन्याची खरी ओळख आहे. सैन्याने ही ओळख कित्येक वर्षे जपली आहे. भारतीय सैन्याच्या ताफ्यात असलेल्या शस्त्रास्त्रांना संस्कृत नावे दिली आहेत. उदा. रॉकेट लाँचरला ‘पिनाका’ हे नाव देण्यात आले आहे. भगवान शिवाच्या धनुष्याचे नाव ‘पिनाक’ आहे. यासह ‘त्रिशूळ’, ‘रुद्रम’, ‘प्रलय’, ‘धनुष’, अशी शस्त्रास्त्रांना नावे देण्यात आली आहेत. प्राचीन काळात जसे देवतांच्या शस्त्रास्त्रांनी दानवांमध्ये हाहाकार माजवला, त्याप्रमाणे भारतीय सैन्याच्या ताफ्यातील या शस्त्रास्त्रांनी शत्रूचे निर्दालन करावे’, हा त्या शस्त्रास्त्रांना नावे देण्यामागे सैन्याचा विचार दिसून येतो. यातून भारतीय सैन्याची नाळ ही भारतीय संस्कृतीशी जोडल्याचे दिसून येते. हीच नाळ भारतीय सैन्याची शक्ती आहे आणि त्यामुळे भारतीय सैन्य हे जगातील अन्य सैन्यांपेक्षा वेगळे आहे ! त्यामुळे ही नाळ तोडण्याचे दुःसाहस कुणी करू नये.
सैन्य ही भारताची अस्मिता !
काही वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांवर दगडफेक करण्याचे चित्रीकरण असलेले, तसेच काही उन्मत्त मुसलमान जिहादी एका भारतीय सैनिकाचा अवमान करतांना, त्याला धक्काबुक्की करतांनाचे विविध व्हिडिओ प्रसारित झाले होते. यामुळे राष्ट्रप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. आता परिस्थिती पालटली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अनेक ठिकाणी भोजनासाठी थांबलेल्या सैनिकाचे जल्लोषात स्वागत करणारे, त्यांचा पराक्रम आणि त्याग दाखवणारे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. हे सर्व नक्कीच सुखावणारे आहे. कुठल्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लोकांना वाचवण्यासाठी प्राण पणाला लावणारे, सीमेवर डोळ्यांत तेल घालून पहारा करणारे हे सैनिक भारताची अस्मिता आहे. भविष्यात भगवान शिवाप्रमाणे या सैनिकांचे प्रलयंकारी रूप पहाण्यासाठी भारतीयही आतुर झाले आहेत !
| भविष्यात भारतीय सैनिक भगवान शिवाप्रमाणे प्रलयंकारी रूप धारण करून शत्रूवर तुटून पडल्यास आश्चर्य वाटणार नाही ! |
संपादकीय : हिंदू जात्यात !
संपादकीय : हरवलेले समाधान !
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !