
वॉशिंग्टन (अमेरिका) – आम्ही लोकांना केवळ तणाव न्यून करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करू शकतो; परंतु आम्ही अशा युद्धात अडकणार नाही. मुळात जे आपले काम नाही, त्यावर नियंत्रण ठेवण्याशी अमेरिकेचा काहीही संबंध नाही, अशा शब्दांत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत भारत आणि पाक यांच्यातील संघर्षावर अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली.
आम्ही भारत किंवा पाक यांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही !
व्हान्स पुढे म्हणाले की, आम्ही भारत आणि पाकिस्तान यांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही; म्हणून आम्ही राजनैतिक माध्यमांद्वारे या गोष्टीचा पाठपुरावा करत राहू. या प्रादेशिक युद्धाचे आण्विक संघर्षात रूपांतर होणार नाही, अशी आशा आहे. जर असे घडले, तर ते विनाशकारी होईल; परंतु असे काही घडेल, असे सध्या तरी आम्हाला वाटत नाही.
व्हान्स यांच्या विधानाच्या एक दिवस आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावावर म्हटले होते की, माझी भूमिका स्पष्ट आहे, मी दोन्ही देशांसमवेत काम करतो. हा प्रश्न दोन्ही देशांनीच सोडवावा. ते एकमेकांच्या विरोधात आहेत; पण मला आशा आहे की, ते आता हा संघर्ष थांबवतील. त्यांना काही साहाय्य लागले, तर मी त्यासाठी उपलब्ध असेन.
आता पाकने ‘आम्ही पीडित आहोत’, असा राग आळवू नये ! – अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नेत्या निकी हॅले

आतंकवाद्यांनी आक्रमण करून निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. त्यानंतर प्रत्युत्तर देण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे. पाकिस्तानने आता ‘आम्ही आक्रमणातील पीडित आहोत’ वगैरे राग आळवू नये, उगाच कांगावा करू नये. आतंकवादी कारवायांना तुम्ही (पाकने) पाठिंबा दिला; म्हणून तुम्हाला कुणी अशीच क्षमा करणार नाही. भारताने जे केले, ते योग्यच आहे, अशा शब्दांत अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नेत्या निकी हॅले यांनी पाकिस्तानला फटकारले.