आईच्या अनुमतीविना झाले होते धर्मांतर

कुआलालंपूर (मलेशिया) – मलेशियाच्या न्यायालयाने २ हिंदु मुलांचे इस्लाममध्ये करण्यात आलेले धर्मांतर वैध करण्याची सरकारची मागणी फेटाळून लावली आहे. हे धर्मांतर मुलांच्या आईच्या संमतीविना करण्यात आले होते. न्यायालयाने म्हटले की, दोन्ही पालकांच्या संमतीविना धर्मांतर करणे कायदेशीर नाही.
लोह सीव हाँग या हिंदु महिलेने त्यांच्या मुलांचा ताबा मिळावा आणि त्यांचे इस्लाममध्ये झालेले धर्मांतर अवैध ठरवावे, यासाठी ८ वर्षांचा प्रदीर्घ लढा दिला. वर्ष २०२२ मध्ये हाँग उच्च न्यायालयात खटला हरल्या. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला फेडरल न्यायालयात आव्हान दिले. वरिष्ठ न्यायालयाने हे धर्मांतर अवैध ठरवले. मलेशियाच्या पेर्लिस राज्यात हे धर्मांतर झाले होते. सुनावणीच्या वेळी फेडरल न्यायालयाने पेर्लिस सरकारला फटकारले. ‘पेर्लिस सरकारच्या वतीने युक्तीवाद करण्यास अनुमती दिल्यास धर्मांतरासारख्या राज्यघटनाविरोधी कृत्याला प्रोत्साहन मिळेल’, असे फेडरल न्यायालयाने म्हटले होते.