महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्‍या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा अभिनव उपक्रम

सोमय्या कॉलेज येथे व्याख्यानाला उपस्थित विद्यार्थी

मुंबई – ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’मध्ये भारतीय ज्ञानपरंपरेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महर्षि अध्यात्म विश्व विद्यालयाच्या ‘भारतीय ज्ञान प्रणाली प्रसार शृंखले’च्या (इंडियन नॉलेज सिस्टम्स अर्थात् आय.के.एस्.च्या) ठिकठिकाणच्या महाविद्यालयांमध्ये ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आली ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ अभ्यासक्रमाची रचना

डॉ.(प्रा.) (सौ.) सायली यादव

‘भारतीय ज्ञान प्रणाली’ अभ्यासक्रमाची रचना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे सदस्य तथा एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळाचे संपादक श्री. शॉन क्लार्क आणि संशोधन समन्वयक सौ. श्वेता क्लार्क, तसेच मुंबई येथील साधिका डॉ.(प्रा.) (सौ.) सायली यादव यांनी केली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधील महाविद्यालयांमध्ये आयोजित व्याख्याने आणि उपस्थित विद्यार्थी

महाराष्ट्र

कर्नाटक

‘गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यशाळे’ची संकल्पना म्हणजे दैवी संकल्पाची प्रचीती !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने गुरु-शिष्य परंपरेची थोरवी आताच्या युवा पिढीला समजण्यासाठी महाविद्यालयांमध्ये या वर्षी ठिकठिकाणी व्याख्यानांचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे हा उपक्रऱ्म चालू होत असतांनाच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपरंपरेला वंदन करण्यासाठी मुंबई विद्यापिठाचा ‘सेंटर ऑफ हिंदु स्टडीज्’, ‘बोर्ड ऑफ स्टडीज् इन इंडियन नॉलेज सिस्टम’ आणि ‘पुरातत्त्व विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच २९ जुलै या दिवशी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त असा कार्यक्रम आयोजित करण्याची आधुनिक महाविद्यालयांच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने हा उपक्रम चालू करणे आणि त्याच वेळी मुंबई विद्यापिठानेही असा उपक्रम हाती घेणे, यातून दैवी नियोजनाची प्रचीती साधकांनी घेतली.

गुरुकुल शिक्षण पद्धतीमुळे कुटुंब आणि समाजव्यवस्था टिकून !

या वेळी व्याख्यान देणार्‍या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रतिनिधींनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले. ‘प्राचीन भारतात गुरुकुल शिक्षणपद्धतीत शिष्यांना विविध विद्या, कला आणि जीवनकौशल्ये शिकवली जात असत; मात्र त्या सर्वांचा केंद्रबिंदू आध्यात्मिक उन्नती हा होता. त्यामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांच्यात संतुलन टिकून राहत असे. आजही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासह  भावनिक आणि आध्यात्मिक विकासावर भर दिल्यास तणावमुक्त, सुसंस्कृत आणि जबाबदार पिढी घडवणे शक्य आहे’, असे त्यांनी सांगितले.