प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा !

शुल्क सुधारणेच्या नावाखाली विद्यार्थी आणि पालक यांची आर्थिक लूट व्हायला नको !

पुणे – राज्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा केली आहे. प्रवेश मिळूनही पुढील फेरीत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांना प्रत्येक फेरीसाठी १ सहस्र रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. विद्यार्थ्याला केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील चार फेर्‍यांमध्ये किती वेळा जागावाटप झाले त्यानुसार जागा स्वीकृती शुल्क आकारण्यात येईल. हे शुल्क ना परतावा प्रक्रिया शुल्क असून प्रत्येक जागा स्वीकृतीच्या वेळी स्वतंत्रपणे भरावे लागणार आहे. विद्यार्थ्याला प्रथम केंद्रीय फेरीत जागा मिळून त्यांनी ते स्वीकारले, तर १ सहस्र रुपये, पुढील फेरीमध्ये सुधारणा प्रक्रियेद्वारे नवीन जागा मिळाली तर त्या जागेसाठी २ सहस्र रुपये अशा पद्धतीने हे शुल्क भरावे लागेल असे सीईटी (सामाईक प्रवेश परीक्षा) कक्षाने स्पष्ट केले.

प्रवेश फेरीत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले आणि त्यांनी ती जागा राखून ठेवून पुढील फेरीत सहभाग घेतल्यास त्याला त्या जागेचे जागा स्वीकृती शुल्क भरावे लागेल असे सीईटी कक्षाचे दिलीप सरदेसाई यांनी सांगितले. स्वीकृती शुल्कात केलेली वाढ विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी अन्यायकारक आहे. विद्यार्थ्यांना अतिरिक्त शुल्क भरण्यास भाग पाडणे चुकीचे आहे. शिक्षणाच्या हक्कावर आर्थिक अडथळे निर्माण करणारा हा निर्णय मागे घ्यावा, असे ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’च्या शिक्षण विकास मंचाचे मुख्य समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी सांगितले. सीईटी कक्षाकडे १ लाख ७७ सहस्र ९८५ जागा आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचे ६ सहस्र याप्रमाणे १०६ कोटी ७९ लाख रुपये अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेत मिळतील, असे समुपदेशक योगेश गुट्टे यांनी सांगितले.