थोडक्यात महत्त्वाचे (दि : २६.०७.२०२६)

विविध राज्यांमध्ये चोरी करणारा अटकेत !

प्रतीकात्मक छायाचित्र

पनवेल – पनवेल रेल्वेस्थानकातून पोलिसांनी रघु सुमन खोसला (वय ४१ वर्षे) याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या बॅगेची पडताळणी केली. त्यात मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने सापडले. त्याच्या विरोधात देशातील विविध राज्यांमध्ये चोरी आणि इतर गुन्हे यांप्रकरणी ३९ प्रकरणे प्रविष्ट आहेत. रेल्वेतून उतरल्यानंतर तो थेट विमानतळ गाठत असे. विमानाने दुसर्‍या राज्यात प्रवास करून पुन्हा तेथे चोरी करत असे.

संपादकीय भूमिका : ३९ प्रकरणे प्रविष्ट झाल्यावर आरोपी सापडत असेल, तर पोलीस करतात काय ? हा प्रश्न पडतो !


घोड्यांविषयीचा आराखडा सादर करण्याचे निर्देश !

अलीबाग – माथेरानमधील घोड्यांची संख्या, तबेल्यांचे स्थलांतर आणि विष्ठा व्यवस्थापन यांचा सविस्तर आराखडा सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने माथेरान नगर परिषदेला दिले. सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेच्या सुनावणीत हे आदेश देण्यात आले. माथेरानमधील घोड्यांची वाढती संख्या आणि त्यांचे मलमूत्र यांमुळे तेथील पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचा अहवाल पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन समितीने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर वरील आदेश देण्यात आले. पुढील सुनावणी १५ सप्टेंबरला होईल.


वातानुकूलित लोकलचा दरवाजा उघडेना !

घटनास्थळावर रेल्वे पोलिस चे जवान

कल्याण – कल्याण रेल्वेस्थानकातून सकाळी ८.५४ वाजता मुंबईच्या दिशेने निघणार्‍या वातानुकूलित लोकलच्या एका डब्याचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. एका दरवाजातूनच लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली. त्यामुळे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी दरवाजा बंद करण्यास साहाय्य केले. त्यानंतर लोकल मार्गस्थ झाली.


देहलीतील आंदोलनाला मुंबईतून निधीपुरवठा !

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – देहलीतील जंतरमंतर येथे चालू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देहली पोलिसांच्या विशेष शाखेने मुंबईत कारवाई केली आहे. या आंदोलनाच्या आडून काही यू ट्यूब वाहिन्यांद्वारे किंवा आंदोलन भडकवण्यासाठी मुंबईतून निधीपुरवठा झाल्याचे अन्वेषणात दिसून आले आहे. त्या अनुषंगाने देहली पोलीस मुंबईत आले होते. त्या दृष्टीने पोलिसांनी काही जणांना कह्यात घेतले आहे.